‘स्कायवॉक’मुळे सौंदर्य वाढणार की घटणार?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

मालवण -  धामापूर तलाव निसर्गसंपन्न आणि प्राचीन वारसा सांगणारा आहे; मात्र या तलावात स्कायवॉकच्या नावाखाली सुरू असलेले काँक्रिटीकरण या तलावाचे सौंदर्य वाढविण्यासाठी आहे की घटवण्यासाठी? असा सवाल पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे.

मालवण -  धामापूर तलाव निसर्गसंपन्न आणि प्राचीन वारसा सांगणारा आहे; मात्र या तलावात स्कायवॉकच्या नावाखाली सुरू असलेले काँक्रिटीकरण या तलावाचे सौंदर्य वाढविण्यासाठी आहे की घटवण्यासाठी? असा सवाल पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे.

धामापूर हे निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. इथला तलाव हा या सौंदर्याचा आत्मा आहे. विजयनगर राजघराण्यातील मंडलिक याने १५३० मध्ये हा तलाव बांधल्याचा उल्लेख आढळतो. या तलावाच्या एका बाजूला राखीव जंगल आहे. हा तलाव सिंधुदुर्ग सिंचन विभागाच्या ताब्यात आहे. काही महिन्यांपूर्वी या तलावाभोवती पर्यटकांच्या सुविधेसाठी १८३०० चौरस मीटर स्कायवॉक बांधण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यापैकी ३७२ चौरस मीटर स्कायवॉक आता बांधून पूर्ण झाला आहे. यासाठी तब्बल ३५ काँक्रीटचे कॉलम तलावात उभारले गेले. हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा या प्राचीन तलावात तब्बल १७१८ काँक्रीट कॉलम उभे राहणार आहेत. 

धामापूरपासून काही अंतरावर असलेल्या नेरुरपारमध्ये खाडीवर काही वर्षापूर्वी नेरुरपार पूल बांधण्यात आला. यावरुन अवजड वाहतूक चालते. यासाठी अवघे सहा पिलर उभारले गेले. मग या स्कायवॉकमधून धामापूर तलावाचे सौंदर्य वाढवायचे आहे की कमी करायचे असा सवाल येथील पर्यावरण प्रेमी तसेच सजग नागरीक मंचाने उपस्थित केला आहे. तलावात पेट्रोल बोटीमधून पर्यटन सुरु असल्याचा दावा करुन त्यालाही त्यांनी विरोध केला आहे. येथील निसर्गसौंदर्य आणि जैवविविधता जपल्यास इथले सौंदर्य वाढेल आणि त्यामुळे ‘क्‍लास पर्यटक’ येथे येतील. त्याचा इथल्या विकासाला फायदा होईल, असे या पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. धामापूर तलावाच्या नैसर्गिक सौंदर्याची जपणूक व्हावी म्हणून पर्यावरण प्रेमी नागरिकांनी जागृती मोहिमही सुरु केली आहे.

म्युझियमसाठी प्रयत्न
धामापूरमध्ये जैवविविधता समिती स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. याबरोबरच तलावाच्या बाजूला म्युझियम सुरु करण्याचेही प्रयत्न आहेत. यात धामापूर तलावाशी संबंधीत विविध गोष्टींचा समावेश असणार आहे. या दोन्ही संकल्पनांसाठी डॉ. हरिश्‍चंद्र नातू आणि बी. एन. सावंत यांनी ग्रामस्थांच्या मदतीने प्रयत्न चालविले आहेत.

सिंधुदुर्गातील सगळ्यात मोठ्या धामापूर तलावाला वेटलॅंड म्हणून राज्य शासनाने नोंद करावी आणि रामसार केव्हेंन्शननुसार धामापूर तलाव ही आंतरराष्ट्रीय रामसार साईट म्हणून नोंद व्हावी, अशी आमची मागणी आहे. त्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. खरेतर हा तलाव ताजमहालच्याही ८० वर्षे आधी बांधला गेला. हा तलाव निसर्गसंपन्न आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे; मात्र आतापर्यंत त्याची अपेक्षित दखल घेतली गेली नाही. खरेतर ही नॅशनल हेरिटेज साईट आहे.
- सचिन देसाई, सामाजिक कार्यकर्ते, धामापूर

Web Title: Sindhudurg News Sky walk issue