सोनुर्ली जत्रोत्सवाची तयारी सुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

सावंतवाडी - सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा प्रसिद्ध जत्रोत्सव येत्या ५ नोव्हेंबरला होत आहे. या जत्रोत्सवासाठी भाविकांची होणारी गर्दी व वाहनांची संख्या लक्षात घेता पार्किंग संदर्भात येथील पोलिसांकडून मंदिर परीसराची व मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची पाहणी करण्यात आली.

सावंतवाडी - सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा प्रसिद्ध जत्रोत्सव येत्या ५ नोव्हेंबरला होत आहे. या जत्रोत्सवासाठी भाविकांची होणारी गर्दी व वाहनांची संख्या लक्षात घेता पार्किंग संदर्भात येथील पोलिसांकडून मंदिर परीसराची व मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची पाहणी करण्यात आली.

लोटांगणाची जत्रा म्हणून सोनुर्ली माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव प्रसिद्ध आहे. दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर म्हणूनही ख्याती आहे. जत्रोत्सवाच्या तयारीला कोजागरी पौर्णिमेपासून गावकरी मंडळी लागली आहेत. मंदिर परिसर साफसफाईपासून इतर आवश्‍यक गोष्टीसाठी नियोजन झाले आहे. 
पोलिस प्रशासनानेही भाविकांची गर्दी व वाहतुक कोंडीबाबत नियोजन केले असून पोलिस निरीक्षक सुनिल धनावडे यांच्यासह कर्मचाऱ्यांकडून मंदिर परिसर व आजूबाजूच्या रस्त्याची पाहणी करण्यात आली. दरवर्षी योग्य नियोजन करूनही रात्री उशिरा वाहतुक कोंडीची समस्या उद्‌भवते त्याकरिता यावर उपाय काढण्यासाठी धनावडे यांनी स्वत: मंदिरास भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली.

माऊली मंदिराकडे जाण्यासाठी न्हावेली मार्गे सोनुर्ली, निरवडे मार्गे सोनुर्ली व वेत्ये मार्गे सोनुर्ली अशा तीन ठिकाणावरून मार्ग आहेत; मात्र तिनही मार्ग अरूंद असल्याने व आजूबाजूला जागा नसल्याने समोरासमोर दोन वाहने आल्यास मोठी समस्या निर्माण होते. गेल्यावर्षी पोलिस निरिक्षक शंकर पाटील यांनी योग्य नियोजन केल्यामुळे काही अंशी वाहतूक कोंडीवर लगाम लावला होता. न्हावेली मार्गे सोनुर्ली मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून फक्त एसटी बसेस सोडता इतर चार चाकी वाहनावर बंदी घातली पाहिजे. इतर मॅजिक रिक्षा व मोटारींना निरवडे मार्गे सोनुर्ली असे पाठविले पाहीजे जेणेकरून मधल्या रस्त्यावर होणारी वाहतुक कोंडी यामुळे टळू शकते व निरवडे व वेत्ये रस्त्यावर जादा पोलिस कर्मचारी तैनात करणे आवश्‍यक आहे.

पार्किंग बाबत यावर्षी प्रश्न निर्माण होणार असून गेल्यावर्षी ज्या मोकळ्या जागेतून वाहतुक पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती त्या जागा मालकाने यावर्षी त्याठिकाणी काजू लावल्याने पार्किंगचा प्रश्न जटील बनला आहे. त्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करणे सोईचे होणार आहे. पार्किंगसाठी जागा उपलब्ध झाल्यास वाहतुक कोंडीचा प्रश्‍न सोडवू शकतो, असे धनावडे म्हणाले.

सहकार्याचे आवाहन...
मंदिराकडे जाणारे अरुंद रस्ते व होणारी वाहतूक कोंडी हा प्रश्‍न जटिल आहे. तीनही रस्त्यांच्या बाजूंनी मोठी पार्किंगसाठी जागा उपलब्ध होत नसल्याने वाहतूक कोंडी होणार आहे. ती होऊ नये यासाठी आमचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी गावकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलिस निरीक्षक धनावडे यांनी केले आहे.

Web Title: Sindhudurg News Sonurli fair