मालवण बंदर जेटीतील गाळ काढण्यास प्रारंभ

कृष्णकांत साळगांवकर, प्रशांत हिंदळेकर
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

मालवण - येथील बंदर जेटी परिसरात मोठ्या प्रमाणात साचलेल्या गाळाचा प्रश्‍न अखेर मार्गी लागला आहे. आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते गाळ काढण्याच्या कामास सुरुवात झाली. महिनाभर गाळ काढण्याचे काम सुरू राहणार आहे. 

मालवण - येथील बंदर जेटी परिसरात मोठ्या प्रमाणात साचलेल्या गाळाचा प्रश्‍न अखेर मार्गी लागला आहे. आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते गाळ काढण्याच्या कामास सुरुवात झाली. महिनाभर गाळ काढण्याचे काम सुरू राहणार आहे.

बंदर जेटी येथील समुद्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. ओहोटीच्या वेळी किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्या होड्या जेटीस लागत नसल्याने किल्ले दर्शनास येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होत होती. त्यामुळे गेल्या महिन्यात किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेने किल्ला प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याचा इशारा दिला. संघटनेने आमदार वैभव नाईक यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत नुकतीच मेरीटाईम बोर्डाची बैठक झाली. या बैठकीत गाळ काढण्याचे काम तत्काळ हाती घेतले जाईल असे आश्‍वासन किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.

काही दिवसांपूर्वी गाळ उपसा करण्याचे साहित्य बंदर जेटी येथे दाखल झाले. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक पंकज सादये, गणेश कुडाळकर, तपस्वी मयेकर, तृप्ती मयेकर, सेजल परब, किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत, राजू पराडकर, प्रसाद सरकारे, चंदू सरकारे, बाळू तारी, प्रशांत पराडकर, संजय नार्वेकर, विल्सन फर्नांडिस, फ्रॅन्चू फर्नांडिस आदी उपस्थित होते. 

गेली अनेक वर्षे किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्यावतीने गाळ काढण्याची मागणी करण्यात येत होती. आमदार वैभव नाईक यांनी तत्काळ हे काम मार्गी लावल्याने किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले.

Web Title: Sindhudurg News Start to remove sludge in Malvan Bandar Jetty