लाकडी खेळणी आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊ - मंत्री सुरेश प्रभू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 डिसेंबर 2017

सावंतवाडी -‘‘येथील लाकडी खेळण्याला जागतिक स्तरावर ओळख मिळावी, यासाठी ‘जियोग्राफीकल इंडिकेशन’मध्ये त्यांचा समावेश होणे गरजेचे आहे. तसा प्रस्ताव पालिकेने दिल्यास त्याचा पाठपुरावा आपण नक्कीच करू,’’ अशी ग्वाही केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे दिली.

सावंतवाडी -‘‘येथील लाकडी खेळण्याला जागतिक स्तरावर ओळख मिळावी, यासाठी ‘जियोग्राफीकल इंडिकेशन’मध्ये त्यांचा समावेश होणे गरजेचे आहे. तसा प्रस्ताव पालिकेने दिल्यास त्याचा पाठपुरावा आपण नक्कीच करू,’’ अशी ग्वाही केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे दिली.

सावंतवाडी पर्यटन महोत्सवाच्या चौथ्या दिवशी श्री. प्रभू यांनी भेट दिली. या वेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते श्री. प्रभू यांचे स्वागत करण्यात आले.

या वेळी प्रभू म्हणाले, ‘‘आज शहर लग्नाला नटते तसे नटले आहे. महोत्सवाला शुभेच्छा देतो. पालिकेने सातत्याने हा महोत्सव राबविला. त्यामुळे तो राज्याचे लक्ष वेधून घेतो. 

आता यांची व्याप्ती देशभर होईल, यात काही शंका नाही. मी पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर मोठा निधी शहरासाठी दिला होता. लाकडी खेळण्यांसारख्या ३०० वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आम्ही शोधून काढल्या. त्यात आग्र्याचा पेठा, बनारसी शालू आदींचा समावेश आहे. याचा ऐतिहासिक आणि जागतिक बाजारपेठेत समावेश करूया. जागतिक पातळीवर याचे कारागीर आणि खेळण्यांना ओळख निर्माण करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसा पालिकेने प्रस्ताव द्यावा. कोकणाने मला आजपर्यंत प्रेम दिले. त्यामुळेच मी राजकीय जीवनात यशस्वी होऊ शकलो. आजपर्यंत मला नववे खाते मिळाले आहे. या काळात कोकणचा विकास होईल, हे पाहिले आहे. यापुढेही तसाच प्रयत्न करेन.’’ श्री. प्रभू म्हणाले, ‘‘सावंतवाडी येथे आयोजित महोत्सवाचा आनंद सर्वांनी घ्यावा. त्यासाठी आणि नव्या वर्षासाठी माझ्या शुभेच्छा आहेत.’’

या वेळी बाळ पुराणिक, ओंकार सावंत, संजय विर्नोडकर आदींचा विविध योगदानाबाबत सत्कार करण्यात आला. या वेळी आदीज क्रिएशन प्रस्तुत रंगादी रंग हा कार्यक्रम सादर करण्यात आला. या वेळी मानव साधन विकास संस्थेच्या उमा प्रभू, भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली, माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे, नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, सुरेंद्र बांदेकर, राजू बेग, बाबू कुतडरकर, अनारोजीन लोबो, सुधीर आरिवडेकर, परिमल नाईक, उदय नाईक, दीपाली भालेकर, दीपाली सावंत, समृद्धी विर्नोडकर, भारती मोरे आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg News Suresh Prabhu comment