सावंतवाडीत स्वाभिमानचा वीज अधिकाऱ्यांना घेराओ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

सावंतवाडी - शहरात गेले दोन दिवस विजेचा खेळखंडोबा सुरु असल्याने स्वाभिमान पक्षाच्या वतीने आज विज वितरणच्या अधिकाऱ्यांना घेराओ घालण्यात आला.

सावंतवाडी - शहरात गेले दोन दिवस विजेचा खेळखंडोबा सुरु असल्याने स्वाभिमान पक्षाच्या वतीने आज विज वितरणच्या अधिकाऱ्यांना घेराओ घालण्यात आला. या वेळी भूमिगत वीजवाहिन्यासाठी शहराला दहा कोटीचा निधी मंजूर झाला आहे; मात्र पालिकेकडुन पुढील गोष्टीची पुर्तता न झाल्यामुळे हे काम रेंगाळले आहे, अशी माहिती येथील वीज वितरण कंपनीचे अधिकारी अमोल राजे यांनी दिली. 

यावेळी झालेल्या चर्चेत भूमिगत वीजवाहीन्यांचा विषय आला. वारंवार वीज काढली जात असल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे, असा मुद्दा उपस्थित करत वीज अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. या वेळी तालुकाध्यक्ष संजू परब, शहरअध्यक्ष सुधीर आडीवरेकर, मंदार नार्वेकर, राजू बेग, दिपाली भालेकर, उत्कर्षा सासोलकर, समृध्दी विर्नोडकर, केतन आजगावकर, प्रसन्न गोंधावळे आदी उपस्थित होते. 

ठेकेदारांकडुन निकृष्ट दर्जाच्या वायर तसेच अन्य साहित्य वापरले जात असल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे वापरण्यात येणाऱ्या सामानाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी शहरात काही जीर्ण झालेल्या वाहिन्या बदलण्याचे काम सुरू असल्यामुळे वारंवार पुरवठा खंडीत करावा लागत असल्याचे श्री. राजे यांनी सांगितले. 

श्री. बेग यांनी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी भूमिगत विजवाहीन्यांच्या कामासाठी निधी मंजूर झाला आहे. आता लवकरात लवकर काम सुरू करण्यात येणार आहे, असे सहा महिन्यापुर्वी जाहीर केले होते; मात्र अद्याप हे काम पुर्ण झालेले नाही. याला जबाबदार कोण? असा सवाल केला. श्री. राजे यांनी आवश्‍यक निधी मंजूर आहे; परंतु रस्ता खोदण्यासाठी तसेच अन्य काही तांत्रिक गोष्टी पालिकेकडुन पुर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, असे सांगितले. 

शहरातील वीजवाहीन्या अंगावर पडुन दोन व्यक्ती मृत झाल्या होत्या. त्याठिकाणी धोकादायक पोल अद्याप बदललेले नाहीत. ते तत्काळ बदलावेत, अशी मागणी श्री. आडीवरेकर यांनी केली. 

भूमिगतवाहीन्यांसाठी नऊ कोटी मंजूर 
श्री. राजे म्हणाले, ""वीज कंपनीच्या माध्यमातून सावंतवाडी शहरातील तब्बल 27 किलोमिटर लांबीच्या वीजवाहीन्या भूमिगत करण्यासाठी आवश्‍यक निधी मंजूर झाला आहे. पालिकेकडून याबाबत आवश्‍यक ती मंजूरी मिळाल्यानंतर हे काम पुर्ण होण्याची शक्‍यता आहे. त्याबाबत तत्काळ योग्य सहकार्य झाल्यास दोन महिन्यात काम सुरू करता येवू शकते.'' 

Web Title: Sindhudurg News Swabhiman agitation in Mahavitaran Office