‘स्वाभिमान’ची राष्ट्रवादीशी कणकवलीमध्‍ये युती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 मार्च 2018

कणकवली - ‘‘येथील नगरपंचायत निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे लढविणार आहे. यातील जागावाटप आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार रविवारी (ता. १८) निश्‍चित होईल,’’ अशी माहिती महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी येथे दिली.

कणकवली - ‘‘येथील नगरपंचायत निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे लढविणार आहे. यातील जागावाटप आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार रविवारी (ता. १८) निश्‍चित होईल,’’ अशी माहिती महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी येथे दिली.

सद्यःस्थितीत भाजपबरोबर युती करण्याचा कोणताही विचार नाही; परंतु अंतिम टप्प्यात राजकीय समीकरणे काय असतील याची नेमकी माहिती आम्हालाही नाही. नगराध्यक्षांसह सर्वच प्रभागांत आमचे उमेदवार निश्‍चित झाले आहेत. पुढील दोन दिवसांत त्या सर्वांची नावे जाहीर करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
येथील ओम गणेश बंगल्यावर श्री. सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी ‘राष्ट्रवादी’चे जिल्हाध्यक्ष व्हिक्‍टर डॉन्टस यांच्यासह प्रवीण भोसले, प्रसाद रेगे, विलास रेगे, सुरेश सावंत, प्रणिता पाताडे, समीर नलावडे, विलास गावकर, संदीप मेस्त्री आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि भाजप यांच्यात आघाडी होण्याबाबत आम्हाला काहीही माहिती नाही. आमची तशी चर्चाही झालेली नाही. आमचे सर्वच उमेदवार निश्‍चित झाले आहेत; मात्र राजकीय समीकरणे बदलत आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत काहीही घडू शकते.’’

प्रवीण भोसले म्हणाले, ‘‘आम्ही विकासाच्या मुद्‌द्‌यावर एकत्र आलो आहोत. त्यामुळे स्वाभिमान आणि राष्ट्रवादीच्या युतीची सत्ता निश्‍चितपणे कणकवली नगरपंचायतीवर येईल. शहराला विकासाची गरज आहे आणि जेथे नारायण राणे आहेत, तेथे विकास निश्‍चित आहे.’’

श्री. डॉन्टस म्हणाले, ‘‘राणेसाहेब आणि आमचे संबंध पूर्वीपासून सलोख्याचे आहेत. त्यामुळे आघाडी करून निवडणूक लढविण्याचा निर्णय आम्ही घेतला. काँग्रेसकडूनही आघाडीचा प्रस्ताव आला होता; मात्र नंतर ती चर्चा फिस्कटली. तसेच, काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरूनही आघाडी करण्याबाबत कसलीच चर्चा झाली नाही.’’

नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी ५७ उमेदवार, तर नगराध्यक्षपदासाठी चार जणांनी अर्ज भरले आहेत, अशीही माहिती श्री. सामंत यांनी दिली. तसेच, पुढील काळात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात शिवसेना, भाजपमधील अनेक दिग्गजांचे प्रवेश होतील, असे श्री. सामंत यांनी सांगितले.

पवार, तटकरेंसह राणेंसोबत चर्चेनंतर निर्णय
दत्ता सामंत म्हणाले, ‘‘कणकवली नगरपंचायत निवडणूक आघाडी करून लढविण्याचा निर्णय ‘राष्ट्रवादी’चे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि माजी मुख्यमंत्री तथा ‘स्वाभिमान’चे संस्थापक नारायण राणे यांनी चर्चा करून घेतला आहे. त्यानुसार आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्‍चित झाला आहे. दोन्ही पक्षांच्या एकत्रित उमेदवारांची यादी १८ ला जाहीर करणार आहोत.’’

Web Title: Sindhudurg News Swabhiman - NCP Alliance in Kankavali