भारनियमन विरुद्ध ‘स्वाभिमान’आक्रमक

भारनियमन विरुद्ध ‘स्वाभिमान’आक्रमक

मालवण - संपूर्ण जिल्ह्यात महावितरण कंपनीने सुरू केलेले भारनियमन, वीजपुरवठ्याच्या विविध समस्यांवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आक्रमक झाला आहे. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी देऊळवाडा येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. भारनियमन तत्काळ बंद व्हायला हवे तसेच अन्य समस्या येत्या पंधरा दिवसांत दूर न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी दिला. 

दरम्यान, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी आजपासूनच भारनियमन बंद केले जाईल, असे जाहीर केल्याची माहिती श्री. सावंत यांनी या वेळी दिली.

दिवाळी तोंडावर आहे. शिवाय पर्यटन हंगामासही सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात सध्या भारनियमन सुरू केले आहे. भारनियमनाबरोबरच शहरात तसेच तालुक्‍यात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यावसायिकांचे तसेच गृहिणींचे हाल झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, तालुकाध्यक्ष मंदार केणी यांच्यासह बाबा परब, बाळू कोळंबकर, सभापती मनीषा वराडकर, उपसभापती अशोक बागवे, दीपक पाटकर, जगदीश गावकर, महेश जावकर, उदय परब, मोहन वराडकर, ममता वराडकर, अभय कदम, राजू बिडये, विजय चव्हाण, सुभाष लाड यांच्यासह अन्य कार्यकर्ते तसेच नागरिकांनी आज येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी उपस्थित अधिकारी श्री. भुजबळ यांच्याशी चर्चा केली. 

जिल्ह्यात कोठेही वीजचोरी नाही. नियमित वीजबिले भरली जात असताना जिल्ह्यात भारनियमन का केले जात आहे अशी विचारणा श्री. सावंत, श्री. आचरेकर यांनी केली. यावर अधिकाऱ्यांनी वीजपुरवठ्याच्या निर्मितीसाठी कोळशाची कमतरता असल्यानेच भारनियमन केल्याचे स्पष्ट केले. यावर ज्या जिल्ह्यात वीजचोरी सुरू आहे

त्याचठिकाणी भारनियमन करो. दिवाळी सण जवळ आला असून भारनियमनामुळे व्यावसायिकांचे हजारो रुपयांचे नुकसान होत आहे. ही नुकसान भरपाई महावितरण कंपनी देणार का? असा जाब विचारला. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत वीजपुरवठ्याच्या समस्येची माहिती दिली.

जिल्ह्यातील भारनियमन तत्काळ बंद करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. त्यावर अधिकाऱ्यांनी आजपासूनच भारनियमन बंद केले जाईल असे आश्‍वासन दिले. महावितरण कार्यालयात कायमस्वरूपी सहायक अभियंता पद रिक्त आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याच्या समस्या सुटलेल्या नाहीत. हे रिक्त पद तत्काळ भरण्याची कार्यवाही करा तसेच ग्राहकांकडून वीजमीटरचे पैसे घेण्याबरोबर अन्य साहित्य त्यांनाच आणण्यास सांगितले जाते. त्यामुळे येथील कार्यालयात सर्व्हिस वायर तसेच अन्य साहित्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली.

या समस्या येत्या पंधरा दिवसात न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
ही तर गरिबांची पिळवणूक शहरासह तालुक्‍याच्या ग्रामीण भागात दिवसाही पथदिवे सुरू असतात. पथदिव्यांसाठी जे कनेक्‍शन दिले आहे ते घरगुती ग्राहकांना दिले जात असलेल्या वीजवाहिनीस जोडले आहे. त्यामुळेच ग्राहकांची घरगुती बिले पाचपट येत आहेत. ही गरिबांची पिळवणूक असून ती तत्काळ बंद झाली पाहिजे. महावितरणकडून वीजबिलाबरोबर कराची आकारणी होते.

कराच्या बदल्यात ग्राहकांना कोणतीही सेवा दिली जात नसल्याने हे सर्व कर रद्द करावेत. पूर्वी ग्राहकांना तीन महिन्यांनी वीजबिले दिले जात होते त्यानुसार एका महिन्याचे वीज बिल न देता तीन महिन्यांचे वीजबिल द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.

पहिल्याच आंदोलनाला मोठे यश
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेनंतर जिल्ह्यात सुरू झालेले भारनियमन तसेच वीजपुरवठ्याच्या समस्यांसंदर्भात पक्षातर्फे झालेल्या या पहिल्याच आंदोलनात अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. त्यात वरिष्ठांशी संपर्क साधून भारनियमनाच्या समस्येवर लक्ष वेधले असता त्यांनी आजपासूनच भारनियमन बंद केले जाईल, असे जाहीर केल्याने पक्षाच्या पहिल्याच आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com