तळेरे-कोल्हापूर रस्ता ‘टकाटक’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

वैभववाडी - राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच तळेरे-कोल्हापूर रस्त्याचे दुरुस्ती काम हाती घेण्यात आले आहे. दोन टप्प्यांत एकूण ८ कोटींचे काम होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत करूळ घाटातून कोल्हापूरकडे जाणारा रस्ता टकाटक होणार आहे. गेली दोन वर्षे हा रस्ता खड्ड्यांत हरवला होता.

वैभववाडी - राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच तळेरे-कोल्हापूर रस्त्याचे दुरुस्ती काम हाती घेण्यात आले आहे. दोन टप्प्यांत एकूण ८ कोटींचे काम होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत करूळ घाटातून कोल्हापूरकडे जाणारा रस्ता टकाटक होणार आहे. गेली दोन वर्षे हा रस्ता खड्ड्यांत हरवला होता.

विजयदुर्ग-कोल्हापूर या राज्यमार्गाचे तळेरे-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाले आहे. राज्यमार्गाचा दर्जा असताना तळेरे ते वैभववाडी आणि वैभववाडी ते गगनबावडा हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला होता. गेल्या दोन वर्षांत तर नाधवडे ते वैभववाडी हा संपूर्ण मार्ग खड्डेमय बनला होता.

दृष्टिक्षेप..

  •  तळेरे-कोल्हापूर राज्य मार्ग हस्तांतरांची प्रक्रिया पूर्ण
  •  तळेरे ते करूळ घाटापर्यंतचा रस्ता नूतनीकरणाकरिता ४ कोटी
  •  तळेरे-कोल्हापूर वाहतूक होणार सुकर
  •  खड्ड्यांमुळे वाहनचालक होते त्रस्त
  •  पंधरा दिवसांत काम पूर्ण होणार

पावसाळ्यात वाहतूक करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यातच गेल्यावर्षी शासनाने या राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करीत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता नूतनीकरणाकडे लक्ष दिले नाही. घोषणा आधी झाली असली तरी काही दिवसांपूर्वीच हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली.

आता महामार्ग प्राधिकरणाने तळेरे ते गगनबावडा मार्गासाठी आणि गगनबावडा ते कोल्हापूर मार्गावरील नूतनीकरणासाठी प्रत्येकी ४ कोटी रूपये मंजूर केले आहेत. याची निवीदा प्रकिया पूर्ण होऊन आजपासून नाधवडे येथून रस्ता कामाला प्रारंभ झाला.

येत्या पंधरा दिवसांत तळेरे ते करूळ घाट रस्तानूतनीकरण करण्याचा महामार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न आहे. याशिवाय गगनबावडा ते कोल्हापूर मार्गावरील रस्ता काम जलदगतीने पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे वाहनचालकांची गैरसोय थांबेल.

तळेरे-कोल्हापूर हा मार्गाचे दोन टप्प्यांत नूतनीकरण केले जाईल. तळेरे ते करूळ घाट मार्गावरील नादुरुस्त रस्ता नूतनीकरणाकरिता ४ कोटींचा निधी मंजूर आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल.
- व्ही. आर. कांडगावे,
कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, कोल्हापूर

 

 

Web Title: Sindhudurg News Talere - Kolhapur Road renovation