तंत्रज्ञानाच्या वेगात छायाचित्रण अडचणीत 

भूषण आरोसकर 
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

एकीकडे तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. त्याचा थेट परिणाम छायाचित्रण (फोटोग्राफी) क्षेत्रावर झाला आहे. हे बदल स्वीकारणारे छायाचित्रकार यामध्ये भक्कमपणे पाय रोवून उभे आहेत; मात्र पारंपरिक गर्तेत अडकलेले या व्यवसायापासून दूर फेकले जात आहेत. जिल्ह्यातील या क्षेत्रात होऊ घातलेल्या बदलांविषयी... 

छायाचित्रकलेचा उदय 
1838 मध्ये पहिले छायाचित्र खेचण्यात आले. त्यानंतर एका लेन्समधून पाहण्याचा कॅमेरा आला. त्यातून उलट चित्र दिसायचे त्यामुळे कॅमेऱ्यात उलट बघावे लागायचे. 1970 च्या काळात सिंगल लेन्स कॅमेऱ्याची इंण्ट्री झाली; मात्र या काळात कॅमेरे लोकांच्या दृष्टीने महाग असल्याने सर्वसामान्य याकडे वळताना जरा उशीर झाला. 1975 ला पॅण्टॅक्‍ट-के 1000 हा पहिला स्वस्तातला कॅमेरा उपलब्ध झाल्याने बऱ्याच जणांच्या हाताळण्यात तो आला. त्यानंतर निकॉन, कॅनॉन या कंपनीच्या कॅमेऱ्याच्या विविध प्रकाराने ग्राहकवर्ग त्याकडे खेचला गेला. याच कंपन्यांनी पहिले डिजिटल तंत्रज्ञान आणले. प्रथम यांना 2 मेगाफिक्‍सल एवढा कॅमेरा होता. 
 
सुरवातीचे डिजिटल कॅमेरे 
डिजिटल कॅमेरे हे जरी आकर्षित असले तरी या कॅमेऱ्यामध्ये चुका सुधारता येणे कठीण होते. यावर प्रक्रिया करताना अभ्यास करून करणे गरजेचे होते. पूर्वी सॉफ्टवेअर प्रणालीत काम करणे बरेच कठीण होत असे. आता व्हिडिओ क्वॉलिटी, फास्ट प्रोसेस, स्क्रीन टच, ऑटो फोकस असे विविध प्रकारचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. त्यामुळे हे कॅमेरे जरी महाग असले तरी वेळेचा विचार करता बऱ्याच छायाचित्रकारांनी त्यांची निवड आपल्या व्यवसायासाठी केली आहे. 

किमती आवाक्‍यात 
पूर्वी म्हणजेच डिजिटल कॅमेऱ्याचा शोध लागण्याआधी कॅमेऱ्यात फारसे सतत बदलणारे तंत्रज्ञान विकसित होत नव्हते, त्यामुळे छायाचित्राला एकंदरीत सर्वच बाबतीत एक वेगळे स्थान प्राप्त होते. वर्तमानपत्र, मासिके कोणत्याही सदरमध्ये छापील छायाचित्र चर्चेचा विषय ठरत असे. कारण छायाचित्र घेताना छायाचित्रकाराच्या कौशल्याचा कस लागायचा; मात्र जसजसे तंत्रज्ञान विकसित होत गेले तशी कॅमेऱ्याच्या छायाचित्राबद्दलची उत्सुकता कमी होत गेली. त्यामुळे छायाचित्राच्या किमतीत घट होत गेली; मात्र असे असले तरी वेगळे व आकर्षक असलेले सर्वाहून वेगळे मनात उतरणारी छायाचित्रे खेचून खऱ्या छायाचित्रकारांनी आपल्या कौशल्याने छायाचित्राचा आकर्षकपणा जीवंत ठेवला आहे. यामागे त्याची छायाचित्रकाकडे पहण्याची वेगळी नजर आहे. वृत्तपत्र क्षेत्रात एक बातमी साठी छायाचित्र सर्वात मोठी व महत्त्वाची भूमिका बजावते. वृत्ताला छायाचित्राचा आधार असल्यास ते वृत्त अधिक आकर्षक ठरते. वृत्तपत्रात मजकुरासाठी जागा नसल्यास संबधित वृत्तासंबधीचे छायाचित्रच अधिक माहिती देणारे ठरत असते. 

युवक वर्गाचे आकर्षण 
डिजिटल कॅमेरामुळे युवक-युवतीमध्ये छायाचित्रणाविषयी ओढ निर्माण झाली आहे. चार-पाच हजारांपासून ते चार-पाच लाखांपर्यंत सहज हे कॅमेरे उपलब्ध होतात. कॅमेरा विश्‍वात डिजिटलने इंन्ट्री केली आणि युवक-युवती त्याकडे आकर्षित झाले. तरुण वयात छायाचित्राचे वेड लागणे एकप्रकारे चांगलेच आहे. इतर अनावश्‍यक गोष्टीकडे वेळ वाया घालविण्यापेक्षा छायाचित्रण छंदामुळे वेळेचा सदुपयोग होत असल्याचे युवक सांगतात. 

मोबाईल कॅमेरा आला हातात 
डिजिटल कॅमेऱ्याच्या दमदार इंण्ट्रीनंतर बदलत्या काळात मोबाईल कॅमेऱ्याने छाप उमटविली. डिजिटल कॅमेरे जरी आता सहज उपलब्ध होत गेले तरी मोबाईल तंत्रज्ञानात लागलेले छायाचित्रण क्षेत्रातील नवनवीन शोध आणि त्याचा मोबाईलमध्ये वापर यांमुळे डिजिटल कॅमेऱ्याचे विश्‍व मागे पडू लागले. आज शहरीसह ग्रामीण भागात प्रत्येकाच्या हातात कॅमेऱ्यासह मोबाईल दिसून येऊ लागला आहे. अलीकडेच तर सेल्फिची क्रेझ आहे. मोबाईलधून समोरच्या दृश्‍याबरोबरच स्वतःचेच छायाचित्र काढण्याच्या तंत्रज्ञानामुळे सेल्फी असलेल्या कॅमेऱ्याला पसंती मिळत आहे. 

सर्वदूर संचार 
ग्रामीण भागात बऱ्याच नागरिकांनी मोबाईल कॅमेरा आल्यापासून कमी खर्चिक म्हणून मोबाईल कॅमेऱ्याचा वापर फोटो काढण्यास सुरवात केली आहे. ही संकल्पना रुजण्याचे कारण म्हणजे ग्रामीण भागात होत असलेले लग्न समारंभ, वाढदिवस, बारसे तसेच विविध आवश्‍यक कार्यक्रमात छायाचित्र काढण्यासाठी दिलेला खऱ्च परवडत नसतो. त्यासाठी विविध प्रकारच्या मोबाईल मध्ये छायाचित्रे काढून नंतर ते प्रिंट देण्याचे अनुभव आता काही फोटोग्राफरना येत आहेत. हल्ली लग्न समारंभ, बारसे, रिसेप्शन, वाढदिवस अशा कार्यक्रमांना येणारा खर्च लक्षात घेता बऱ्याच नागरिकांनी नातेवाईक किंवा सवतःच्या मोबाईलमधून छायाचित्र काढण्यात येतात. आजवर आपल्याकडे असलेल्या महागड्या मोबाईलचे दर्शन इतरांना करण्याची हौस असते; मात्र एखादे 2 क्षणांचेही छायाचित्र काढण्यासाठी 100 लोक गर्दी करताना सर्रास पाहण्यास येतात. अशावेळी धड छायाचित्रही काढता येत नाही. असे काही किरकोळ तांत्रिक विषयही छायाचित्रकारास अडथळे निर्माण करणारे ठरत आहेत. 

दर्जावर परिणाम. 
पैसे वाचविण्याच्या नादात काही जण मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढून फोटोग्राफरकडे प्रिंटिंगसाठी फोटो देतात; मात्र अशा मुळे छायाचित्रावर तांत्रिक प्रक्रिया करणे बऱ्याच वेळा अडचणीची ठरते. त्यामुळे फोटोचा दर्जा राखता येत नाही. त्यामुळे चांगले छायाचित्र काढूनही त्याचा काही उपयोगच होत नाही. बऱ्याचवेळा छायाचित्र खराब होते. अशा गोष्टीमध्ये छायाचित्रकारांचा बराच वेळ वाया जातो. 

गुंतवणूक गुंतागुंतीची. 
छायाचित्रकार कोणताही असो चांगल्या प्रतीचे छायाचित्रण देणे हे आज महत्त्वाचे आव्हान आहे. त्यानुसार चांगल्या प्रतीच्या छायाचित्राला तंत्रज्ञानाधिष्ठीत कॅमेऱ्याची आवश्‍यकता आहे. पारंपरिक छायाचित्रकाराला चांगले छायाचित्र देणे अगदी सहज असल्याने त्यांना ही आव्हानात्मक बाजू नसते. चांगल्या छायाचित्रासाठी तशा डिजिटल व पूर्ण तंत्रज्ञानयुक्त कॅमेरे बाळगणे महत्त्वाचे असते. या व्यवसायात उतरणाऱ्या सर्वच छायाचित्रकारांना हे परवडणारे नसल्यामुळे गुंतवणूक क्षमता, कॅमेऱ्याची किंमती, त्याचा वापर अशा एकूण सर्वच गोष्टीचा विचार करावा लागतो. चांगल्या तंत्रज्ञानाचा विचार करून उत्तम प्रकारचे कॅमेरे आजच्या छायाचित्रकारांना घेताना आधी पैशाचा विचार करण्याची वेळ येते. बचत व फायद्यासाठी पूर्व नियोजन तसेच ताळमेळ साधणे आवश्‍यक झाले आहे. बऱ्याचदा दर्जेदार कामासाठी व्यावसायिक छायाचित्रकार मोठी गुंतवणूक करतो. मात्र त्या कॅमेऱ्याचा पुरेसा वापर करण्याआधीच नव्या तंत्रज्ञानाचा वापर केलेला कॅमेरा त्याच्या स्पर्धकाने घेतलेला असतो. ही स्पर्धा आणि या क्षेत्रातून सातत्याने घटणारे उत्पन्न याचा ताळमेळ घालणे छायाचित्रकारांना कठिण बनले आहे. 

कौशल्य हीच ताकद 
अलीकडे डिजिटल कॅमेऱ्यानंतर छायाचित्रण व्यवसायास वेग आला आहे. पूर्वी छायाचित्रण घेण्यापासून त्यावर प्रक्रिया करण्यापर्यंतच्या अनेक घडामोडीसाठी वेळ लागायचा. त्यामुळेही यात स्पर्धा निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. कार्यक्रमाच्या लहान ऑर्डरसाठी किमान 10 हजार रुपये सांगण्यात येतात; मात्र असे असले तरी छायाचित्रणाची आपली छाप तसेच आपल्या कौशल्याची ओळख असेल छायाचित्रकार स्वतःला हवी असेल तेवढी चांगली किंमत आकारू शकतो. याचा विचार आजच्या छायाचित्रकाराने करणे आवश्‍यक आहे. 

कॅमेऱ्याच्या सेन्सरवर परिणाम 
छायाचित्रणाचा छंद जोपासणाऱ्यांनी अलीकडेच बरेच जण मोबाईलचा वापर करीत आहे. याच बरोबरच कमी किमतीत उपलब्ध होणारे डिजिटल कॅमेऱ्याचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या दोन्ही साधनाद्वारे कोणीही हवे तेवढे छायाचित्र आपल्या साधनात टिपतो. याला अपवाद पाहता मूळचा कौशल्यप्राप्त असलेला छायाचित्रकार एक ते दोन किवा काही मोजक्‍या संख्येत अपेक्षित छायाचित्र टिपतो. अनेक छायाचित्रे घेतल्यामुळे किंवा एकामागोमाग अनेकवेळा क्‍लिक केल्यामुळे त्या मोबाईल किंवा कॅमेऱ्याच्या सेन्सरवर परिणाम होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येते. अशा कॅमेऱ्याचे आयुष्यही लवकरच संपुष्टात येते. 

व्यवसायाचे नवे रूप 
अलीकडे सायबर कॅफे, माहिती केंद्रे, अर्ज भरण्याची केंद्रे अशांची भरणा शहराबरोबरच ग्रामीण भागातही मूळ धरू लागली आहे. पासपोर्ट छायाचित्र बऱ्याच ठिकाणी माहिती किंवा अर्जासाठी लागत असते. अशावेळी तेथेच कॅमेरा घेऊन हा व्यवसाय करणारे तेथेच छायाचित्र घेण्यात येते. अलीकडेच याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिक अर्ज एकीकडे व छायाचित्र एकीकडे असे न करता वेळ वाचण्याच्या उद्देशाने तेथेच पासपोर्ट छायाचित्र काढण्यासाठी देतात. यामुळे हा व्यवसाय करणाऱ्यानाही हाताबरोबरच चार पैसे मिळतात. याचा परिणाम छायाचित्र व्यवसाय करणाऱ्यावर अलीकडेच दिसून येत आहे. त्यामुळे पासपोर्ट छायाचित्र काढणाऱ्यांची काही ठिकाणी कमतरता जाणवत आहे. 
 
जीएसटीचा परिणाम 
केंद्रशासनाने जीएसटी करप्रणाली लागू करून नागरिकांच्या खिशांतून करवसुली केली; मात्र त्याचा फारसा परिणाम छायाचित्रण व्यवसायावर जाणवत नसल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही छायाचित्र काढल्यावर त्याचा अल्बम बनविणे, छायाचित्र प्रिटिंग करणे अशा प्रक्रिया करताना त्यासंबधात काही कार्ये येतात त्यामध्ये 18 टक्के जीएसटीचा संबध येतो. ही नवी अडचण छायाचित्रकारांसमोर उभी राहिली आहे. 

काळ जसा बदलत जातो तसा काळही बदलत जातो. हा नियमच आहे. या बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर छायाचित्रणच्या व्यवसायातही बदल होत गेले आहेत. आज जरी अनेक शोध कॅमेऱ्यात लागत असले तरी त्यातील कौशल्याला तेवढेच महत्त्व कायम आहे आणि पुढेही राहणार आहे. आपले कौशल्यच आज नागरिकांना छायाचित्रणाकडे खेचून घेत आहेत. हेच खरे छायाचित्रणाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
- राजेश पारधी, अध्यक्ष फोटो ऍण्ड व्हिडिओग्राफर असोसिएशन सिंधुदुर्ग. 

क्षणिक फायद्यासाठी आजचे काही छायाचित्रकार छायाचित्रणातील दूरदृष्टीचा विचार करायला विसरून गेले आहेत. यात मोबाईलच्या किमतीचा घसाराही भरून निघत नाही अशी परिस्थिती आहे. कमी पैशासाठी दुसऱ्याचे काम खेचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मोबाईलमुळे काही प्रमाणात जे व्यावसायिक फोटोग्राफर आहेत. त्याची संख्या कमी होत चालली आहे. छायाचित्रकारांनी एकतर चांगले कौशल्य सादर करायला हवे अन्यथा आहे त्यात समाधान मानायला हवे. 
-जयंत पेडणेकर, सिने स्थिर छायाचित्रकार 

बदल हा नक्कीच होणार आणि बदलाला सामोरे गेलेच पाहिजे. तंत्रज्ञान हे उत्कर्षासाठी असते. अधोगतीसाठी नाही. तंत्रज्ञानाबरोबरेच जाणे गरजेचे आहे. त्याचा बाऊ करू नका. मोबाईल फोटोग्राफी आली याचा अर्थ फोटोग्राफीला नुकसान होणार किंवा ते नेस्तनाबूत होणार हे विचार काढून टाकणे आवश्‍यक आहे. छायाचित्रकारांची गरज ही लोकांना भासणारच. त्यामुळे तंत्रज्ञानाचा अचूक उपयोग करून व्यवसायामध्ये त्याचा उत्कर्ष करून घ्या. 
-सुनील कोरगावकर, सचिव, युनायटेड फोटो फेडरेशन 

आनंदाने छायाचित्रण करणे म्हणजेच छायाचित्रणावर प्रेमाची भावना होय. छायाचित्रकाराने कायम सतर्क राहणे आवश्‍यक असते. मोबाईलमुळे छायाचित्रण व्यवसायावर तसा फारसा परिणाम नाही. डीएसएलआरमध्ये चांगले छायाचित्र घेऊ शकतो. मात्र एकाचवेळी अधिक छायाचित्रे घेतल्यामुळे त्याचा विपरित परिणामही होऊ शकतो. छायाचित्रणाचा व्यवसाय करताना त्यावर योग्य मागदर्शन घेऊन व्यवसाय करावा, अन्यथा तोटा होण्याचाही संभव असतो. 
-समीर म्हाडगुत, खजिनदार, फोटो अँड व्हिडिओग्राफर असोसिएशन सिंधुदुर्ग 

बदलत्या काळात बदलत असलेल्या तंत्रज्ञानाचा विचार करून जुळवून घ्यायला हवे. छायाचित्र ही नंतरची गोष्ट आहे. मात्र या व्यवसायात आपल्या कौशल्याने टिकून राहणे आवश्‍यक आहे. शक्‍यतो आपल्या कलेद्वारे आपले वेगळेपण सादर करण्याचा प्रयत्न करायला हवा. छायाचित्रण व्यवसायात पैसा आहे मात्र त्यासाठी आपले कौशल्य पणाला लावून कसे काम करावे हे छायाचित्रकाराने जाणणे खूप महत्त्वाचे आहे. 
-चेतन म्हापणकर, सचिव, फोटो अँड व्हिडिओग्राफर असोसिएशन सिंधुदुर्ग 

Web Title: Sindhudurg news technology change in photography