तेरवणवासीयांची परवड थांबणार

प्रभाकर धुरी
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

तेरवण मेढे आणि तेरवण जोडणारा जवळचा मार्ग दोन्ही गावांच्या गावकऱ्यांनी श्रमदानाने तयार केला असला तरी तो पूर्णत्वास येण्यासाठी शासकीय निधीची गरज आहे. अनेक पिढ्यांनी पाहिलेले रस्त्याचे स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या सकारात्मक प्रयत्नांची आवश्‍यकता आहे.

दोडामार्ग -  अव्वाच्या सव्वा पदरमोड करून आणि अख्खा दिवस वाया घालवून सरकारी कामासाठी तालुक्‍यातील कार्यालयात हेलपाटे मारणाऱ्या आणि पाच-दहा लिटर रॉकेलसाठी दीड-दोनशे रुपये प्रवासावर खर्च करावे लागणाऱ्या तेरवणवासीयांची परवड आता थांबेल, अशी चिन्हे आहेत.

तेरवण मेढे आणि तेरवण जोडणारा जवळचा मार्ग दोन्ही गावांच्या गावकऱ्यांनी श्रमदानाने तयार केला असला तरी तो पूर्णत्वास येण्यासाठी शासकीय निधीची गरज आहे. अनेक पिढ्यांनी पाहिलेले रस्त्याचे स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या सकारात्मक प्रयत्नांची आवश्‍यकता आहे.

तेरवण मेढे ग्रुप ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील तेरवण हा महसुली गाव. तेरवण मेढेतून तेरवणला जायचे किंवा याचचे झाल्यास दोडामार्ग ते मोटणवाडी फाट्यापर्यंत एक गाडी तर तेथून तेरवणला जाणारी दुसरी गाडी धरावी लागते. दोन गाड्यांमधील टायमिंग चुकले की रात्र कुणाच्या तरी वळचळणीला काढायची नाही तर पंधरा किलोमीटरची पायपीट करायची अशी सगळी अवस्था. तिलारी घाटमार्गाचा तो प्रवास. तेरवण मेढे ते तेरवण असा जवळपास छत्तीस किलोमीटरचा. पण तेच अंतर मधल्या नव्या रस्त्याने कमी होणार आहे. केवळ सहा किलोमीटर अंतर पार करून तेरवण मेढेतून तेरवण गाठता येणार आहे. दोन्ही गावच्या गावकऱ्यांनी गेल्यावर्षी श्रमदान आणि स्वखर्चाने तो रस्ता तयार केला आणि अनेकांनी तो जवळचा मार्ग प्रवासासाठी निवडला.

खरे तर सामान पाठीवर घेऊन तीव्र चढ-उतार मागे टाकत गाव गाठणे तसे जिकीरीचे काम पण ‘रामेश्‍वराला’ फेरा मारून वेळ आणि पैसा खर्च करण्यापेक्षा जवळचा पण कष्टमय रस्ता प्रवाशांना आपलासा वाटतो. त्यामुळे या मार्गाने सध्या अनेकजण ये-जा करत आहेत.

सावंतवाडी तालुक्‍यातील चौकुळजवळ बोरी या धनगरवस्तीतील अनेकजण कामासाठी दोडामार्गमध्ये येतात. त्यांनाही आता सावंतवाडी अथवा मोटणवाडीमार्ग दोडामार्गमध्ये येण्यापेक्षा तेरवणहून येणारा मधला रस्ता जवळचा आणि सोयीचा ठरतो आहे.  तेरवण मेढे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण गवस, तेरवणमधील अनेक जागरुक नागरिक यांनी अनेक सरकारी कार्यालयांकडे, लोकप्रतिनिधींकडे या रस्त्यासाठी निधी मिळावा म्हणून पत्रव्यवहार केला आहे.

तेरवणमेढे ग्रामपंचायत सह्याद्रीच्या पायथ्याशी तर तेरवण गाव सह्याद्रीच्या माथ्यावर, पारगडसारखा ऐतिहासीक किल्ला तेरवणपासून अगदी जवळ. तेरवण मेढेतू तेरवणकडे जाताना तर निसर्गाची अनेक रुपे आपल्याला मोहवून टाकतात. निसर्गसंपन्न गावांचे वेड आणि भुरळ पर्यटकांना नक्कीच पडेल. त्यामुळे या रस्त्याची मजबूत बांधणी करून सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक, पर्यावरण आणि नैसर्गिक ठेवा जतन करण्याची खरी गरज आहे. तेरवण मेढे ते तेरवण रस्ता झाला तर तो अनेक अंगांनी महत्वाची ठरणार आहे.

Web Title: Sindhudurg News Tervan Medhe Road