स्टुडिओ फोडणारा चोरटा जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यातील फोटो स्टुडिओ फोडणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. सुकळी (ता. रोहा, जि. रायगड) येथून त्याला साडेपाच लाखांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्याला उद्या (ता. ३१) मालवण न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यातील फोटो स्टुडिओ फोडणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. सुकळी (ता. रोहा, जि. रायगड) येथून त्याला साडेपाच लाखांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्याला उद्या (ता. ३१) मालवण न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यात जानेवारी ते मे २०१८ या कालावधीत देवगड, कुडाळ, मालवण व बांदा येथील फोटो स्टुडिओ फोडून किमती कॅमेरे, लेन्स, लॅपटॉप चोरीस गेले होते. कुडाळ येथील रेणुका स्वीट मार्टमध्येही चोरी झाली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोटो स्टुडिओ मालकांसह व्यापारी वर्गात घबराट पसरली होती. गेल्या महिन्यात विविध ठिकाणी चोरी करून सुमारे साडेआठ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. 

सिंधुदुर्ग पोलिस चोरट्याच्या मागावर होते. अनेक गुन्हेगारांची माहिती गोळा करून संशयित निश्‍चित करण्यात आला होता. जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या चोऱ्या करण्याची पद्धत ही एकच असल्याने सदर चोऱ्यांमध्ये एकाच टोळीचा किंवा एकाच व्यक्‍तीचा सहभाग असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलेला होता.
या चोरट्याचा शोध घेण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागावर सोपविण्यात आली होती.

त्यानुसार पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात पथके पाठवून तपास सुरू होता. अखेर मिळालेल्या माहितीनुसार चोरट्याला रायगड जिल्ह्यातील सुकेळी येथून ताब्यात घेतले. पोलिस आल्याची चाहूल लागताच त्याने रात्रीत जंगलामध्ये पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पथकानेही रात्री अकराच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक प्रल्हाद पाटील, सुधीर सावंत, अशिष गंगावणे, संतोष सावंत, अनुपकुमार खंडे, कृष्णा केसरकर, सत्यजित पाटील, प्रथमेश गावडे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त
तीन हॅंडीकॅम कॅमेरे, निकॉनचे दोन कॅमेरे, दोन लेन्स, एक लॅपटॉप, काजूगर, चार घडयाळे, पेन ड्राईव्ह, दोन मेमरीकार्ड व इतर ब्युटी पार्लरमध्ये वापरण्यात येणारे साहित्य व चोरी करण्यासाठी वापरलेली हत्यारे व इतर चोरीचे साहित्य असा एकूण साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Web Title: Sindhudurg News theft arrested in Roha