सेल्फीच्या नादात मुंबईचे पर्यटक पडले समुद्रात

प्रशांत हिंदळेकर
रविवार, 27 मे 2018

मालवण - रॉकगार्डन येथील समुद्रालगत छायाचित्र काढत असताना अचानक आलेल्या समुद्राच्या लाटेमुळे तिघे पर्यटक समुद्रात फेकले गेले. हे तिघेही समुद्रात बुडत असल्याचे दिसताच त्यांच्यासोबत असलेल्या दोन नातेवाइकांनी समुद्रात उडी घेत या तिघांनाही वाचविले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. ही घटना आज दुपारी दोनच्या सुमारास घडली.

मालवण - रॉकगार्डन येथील समुद्रालगत छायाचित्र काढत असताना अचानक आलेल्या समुद्राच्या लाटेमुळे तिघे पर्यटक समुद्रात फेकले गेले. हे तिघेही समुद्रात बुडत असल्याचे दिसताच त्यांच्यासोबत असलेल्या दोन नातेवाइकांनी समुद्रात उडी घेत या तिघांनाही वाचविले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. ही घटना आज दुपारी दोनच्या सुमारास घडली. 

दरम्यान यात जखमी झालेल्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

याबाबतची माहिती अशी- ठाणे- मुंबई येथील विजय कृष्णा चव्हाण यांची पत्नी गीता, मुलगी मानसी, दिशा, मेहुणे प्रदीप प्रकाश कदम, पत्नी मेघना, सासू, सासरे असे सात जणांचे कुटुंबीय 23 मे रोजी पर्यटन सफरीसाठी निघाले होते. दहा दिवसांची त्यांची पर्यटन सफर होती. यात दाजगाव महाड, मार्लेश्‍वर, गणपतीपुळे, रत्नागिरी, लांजा हा दौरा पूर्ण करून ते काल चौके येथील नातेवाइकांकडे आले. आज हे सर्वजण दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान रॉकगार्डन येथे पर्यटनाचा आनंद लुटण्यास आले होते. 

रॉक गार्डन परिसरात समुद्रापासून काही अंतरावर असलेल्या खडकाळ भागात विजय चव्हाण यांच्या मुली मानसी (वय-19) व दिशा (वय-13), प्रदीप कदम (वय-38) हे छायाचित्र काढत होते. छायाचित्रांसाठी समुद्री लाटेची वाट पाहत असताना अचानक समुद्राची उंच लाट खडकावर आदळली. या लाटेमुळे मानसी, दिशा व प्रदीप कदम हे समुद्रात फेकले गेले. हे तिघेही बुडत असल्याचे दिसताच त्यांच्या कुटुंबीयांनी तसेच अन्य पर्यटकांनी आरडाओरड करण्यास सुरवात केली. आपल्या मुली बुडत असल्याचे दिसताच विजय चव्हाण व त्यांचे नातेवाईक राज चौकेकर यांनी आपला जीव धोक्यात घालत समुद्रात उडी मारली आणि तिघांनाही पाण्याबाहेर काढले. त्यामुळे सुर्देवाने मोठी दुर्घटना टळली. यात विजय चव्हाण यांच्या हाताला दुखापत झाली. समुद्रात पडलेल्या तिघांनाही येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी त्यांच्यावर उपचार केले. 

सेल्फीचा मोह आवरा..!

अंदमानमध्ये मॉन्सून दाखल झाल्यानंतर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात मान्सूनपूर्व पावसाच्या हालचालींनी जोर पकडला आहे. समुद्र खवळला असल्याने सर्वत्र खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत रॉकगार्डन परिसरात दाखल झालेल्या पर्यटकांकडून समुद्राच्या लाटा अंगावर घेण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली जात आहे. अशीच छायाचित्रे काढत असताना लाटांच्या मार्‍यात तीन पर्यटक समुद्रात फेकले गेल्याची घटना घडली. सुर्देवाने यात जीवितहानी झाली नसली तरी समुद्र खवळलेला असताना सेल्फी काढण्याचा मोह पर्यटकांनी आवरायला हवा. 

 

Web Title: Sindhudurg News three tourist fall in Sea due to Selfie