आंबोलीत आता नाईट सफरसह साहसी पर्यटन

अमोल टेंबकर
शनिवार, 28 एप्रिल 2018

सावंतवाडी - वर्षा पर्यटन आणि उन्हाळी सुटीसाठी प्रसिद्ध असलेली आंबोली आता नाईट रायडिंग आणि साहसी खेळासाठी सज्ज झाली आहे, पर्यटकांची मागणी व वाढती संख्या लक्षात घेता स्थानिक तरुणांनी एकत्र येऊन यात पुढाकार घेतला आहे. 

सावंतवाडी - वर्षा पर्यटन आणि उन्हाळी सुटीसाठी प्रसिद्ध असलेली आंबोली आता नाईट रायडिंग आणि साहसी खेळासाठी सज्ज झाली आहे, पर्यटकांची मागणी व वाढती संख्या लक्षात घेता स्थानिक तरुणांनी एकत्र येऊन यात पुढाकार घेतला आहे. 

सह्याद्रीच्या कुशीत वसलेली आंबोली काही वर्षांपूर्वी फक्त धबधब्यासाठी प्रसिद्ध होती; मात्र आता काळ बदलला आहे. प्रतिमहाबळेश्‍वर म्हणून आता आंबोली जगाच्या नकाशावर कोरली जात आहे. आंबोली म्हटली की पुढे येते ते वर्षा पर्यटन आणि उन्हाळी पर्यटन; मात्र या दोन पारंपरिक गोष्टींना फाटा देत आता स्थानिक युवकांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणखी काही क्षेत्रे खुली केली आहेत. यात रात्रीच्यावेळी जंगलात विविध पक्षी, बेडूक, प्राणी थेट पाहण्यासाठी प्रवास त्याचबरोबर ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॅपलिंग, जंगल ट्रेकिंग, नाईट सफर, साईट सिन यासारखे थरार पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी कावळेसाद पॉईंट, आंबोली घाटातील काही भाग वापरात आणण्यात येणार आहे. या अनोख्या सोयी-सुविधा पर्यटकांना देण्यात येणार येणार असल्यामुळे त्या ठिकाणी पर्यटक नििश्‍चतच आकर्षित होतील आणि त्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार निर्माण होईल, असा विश्‍वास तेथील युवकांना आहे.

या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना साहसी खेळाबरोबर या ठिकाणचे चविष्ट मालवणी जेवण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यात गावठी कोंबडी, मासे, तांदळाची भाकरी, नाचणीची भाकरी, मोदक, शिरवाळे असे स्थानिक पदार्थ देण्यात येणार आहेत. किल्ले, समुद्र किनारे, प्रेक्षणीय स्थळाची माहिती देण्यात येणार आहे.
- निर्णय राऊत,
संचालक, आंबोली टुरिझम डॉटकॉम

आंबोलीत येणारे पर्यटक आता मौजमजेसोबत या ठिकाणी मिळणारे उडणारे बेडूक, विविध जातींचे साप, पाली यांची माहिती घेण्यासाठी येतात. त्याचबरोबर रात्रीच्यावेळी दिसणारे अनेक वन्यप्राणी पाहणाऱ्या प्राणीशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या पर्यटकांत वाढ होत आहे. त्यामुळे त्यांचा अभ्यास व्हावा आणि त्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी आम्हा स्थानिकांचा प्रयत्न आहे. 
- केदार जाधव,
वन्यप्राणी अभ्यासक, आंबोली

Web Title: Sindhudurg News Tourism in Amboli