रोडावलेले मालवण परिसरातील पर्यटन पुन्हा रुळावर 

प्रशांत हिंदळेकर
शुक्रवार, 18 मे 2018

मालवण - उन्हाळी सुटीत येथील पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी शहरासह तारकर्ली, देवबाग किनारा, चिवला वेळासह ग्रामीण भागातील कृषी पर्यटनस्थळांना पसंती दर्शविली आहे.

मालवण - उन्हाळी सुटीत येथील पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी शहरासह तारकर्ली, देवबाग किनारा, चिवला वेळासह ग्रामीण भागातील कृषी पर्यटनस्थळांना पसंती दर्शविली आहे. मेच्या सुरवातीस रोडावलेला पर्यटन हंगाम शेवटच्या टप्प्यात मात्र बहरात आल्याचे चित्र आहे. वॉटर स्पोर्टस्‌, स्कूबा, स्नॉर्कलिंगसह अन्य जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटण्याबरोबरच धार्मिक पर्यटन स्थळांवरही पर्यटकांची सध्या गर्दी उसळली आहे. 

मे मध्ये चाकरमान्यांसह राज्याच्या विविध भागांतील पर्यटक पर्यटनाचा बेत आखतात. यावर्षी एप्रिलसह मेच्या पंधरवड्यात पर्यटकांची संख्या रोडावल्याचे दिसत होते. उष्णतेतील वाढ, आंब्याचे कमी झालेले पीक, समुद्रातील वादळसदृश परिस्थिती या कारणांमुळे येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले; मात्र गेल्या दोन, तीन दिवसांत येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

हॉटेल व्यवसाय, रिसॉर्ट, लॉजिंग व्यवसाय तेजीत आहेत. किल्ले दर्शनास येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. 
पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, सांगली, सोलापूरसह राज्याच्या अन्य भागांतील पर्यटकांच्या वाहनांनी येथील किनारपट्टी फुलून गेली आहे. किल्ले सिंधुदुर्ग दर्शन, वॉटर स्पोर्टस्‌, स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंगसाठी बंदर जेटी, राजकोट परिसर, चिवला वेळा, तारकर्ली, देवबाग येथे पर्यटकांची गर्दी झाली आहे. कृषी पर्यटन स्थळांवरही पर्यटकांचा ओघ वाढला आहे.

पर्यटनाचा ओघ वाढत असला तरी बंदर जेटीच्या ठिकाणी भुयारी गटार योजनेचे काम करण्यासाठी सुरू असलेल्या खोदकामामुळे वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील अरुंद रस्ते, वाहतूक कोंडीच्या समस्यांनी पर्यटक, स्थानिक हैराण झाले आहेत. तालुक्‍यातील आचरा, तोंडवळी, तळाशील किनारपट्टी भागालाही पर्यटकांनी पसंती दिली आहे. किनारपट्टी भागात समुद्रीस्नानाचा आनंदही पर्यटकांकडून लुटला जात आहे. 

Web Title: Sindhudurg News Tourism in Konkan Malvan