मालवण "हाउसफुल्ल' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

मालवण - जिल्ह्याची पर्यटन राजधानी असलेल्या येथील किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासह तालुक्‍यातील विविध धार्मिक तसेच अन्य पर्यटन स्थळांवर दिवाळीच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे तालुक्‍यातील पर्यटन पर्यटकांनी बहरून गेल्याचे चित्र आहे.

मालवण - जिल्ह्याची पर्यटन राजधानी असलेल्या येथील किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासह तालुक्‍यातील विविध धार्मिक तसेच अन्य पर्यटन स्थळांवर दिवाळीच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे तालुक्‍यातील पर्यटन पर्यटकांनी बहरून गेल्याचे चित्र आहे.

तारकर्ली येथील पर्यटन केंद्रासह बहुसंख्य हॉटेलमधील बुकिंग 29 पर्यंत हाउसफुल्ल झाले आहे. सुरवातीला पर्यटन हंगाम तेजीत नसला तरी आता दिवाळी सुटीच्या पार्श्‍वभूमीवर येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाल्याने बाजारपेठेतील आर्थिक उलाढालही वाढली आहे. 

दिवाळी सुटीच्या पार्श्‍वभूमीवर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले येथे वळत आहेत. पर्यटकांच्या वर्दळीने शहरासह तालुक्‍यातील धार्मिक, पर्यटनस्थळे व समुद्रकिनारे गजबजून गेले आहेत. शहर, देवबाग, तारकर्ली, आचरा याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. पर्यटनासाठी महाराष्ट्रासह देश, विदेशांतील असंख्य पर्यटक येथे दाखल झाले आहेत. यात मुंबई, ठाणे, कोल्हापूर, पुणे यासह अन्य पर्यटकांचा येथे पर्यटनासाठी ओघ दिसत आहे. दिवाळी सुटीमुळे पर्यटकांनी पर्यटन सफरीसाठी चांगला बेत आखल्याचे या गर्दीमुळे दिसून येत आहे.

समुद्रकिनारे, धार्मिक पर्यटन, किल्ले सिंधुदुर्ग दर्शन, स्नॉर्कलिंग, डॉल्फिन दर्शन, स्कूबा डायव्हिंग, पॅरासेलिंग या क्रीडा प्रकाराकडे पर्यटकांचा ओघ असल्याचे दिसून येत आहे. चिवला बीच, तोंडवळी, तळाशील, देवबाग, तारकर्ली, वायरी, आचरा या स्वच्छ सुंदर निळाशार समुद्र, रूपेरी वाळू अशा निसर्गरम्य परिसरास पर्यटकांनी आपली पसंती दर्शविली आहे. ग्रामीण भागातील कृषी पर्यटनाकडेही मोठ्या प्रमाणात पर्यटक आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे. यात घुमडे, हडी येथील कृषी पर्यटन केंद्राच्या ठिकाणी सध्या पर्यटकांचा ओघ वाढला आहे.

पर्यटन व्यावसायिकही चांगली सेवा देण्यासाठी सज्ज झाले आहेत. नवनवीन जलक्रीडा प्रकार अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी दिसत आहे. हॉटेल, न्याहारी निवास सध्या फुल्ल झाली आहेत. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे येथील हॉटेल व्यवसाय, पर्यटन केंद्र, लॉजिंग व्यवसायही तेजीत आहे. येथील पर्यटन हंगामास दिवाळीपासून सुरवात होते. यावर्षी या पर्यटन हंगामाची दमदार सुरवात झाली आहे. 

Web Title: Sindhudurg News Tourism in Malvan