ट्रॉलर्सला जलसमाधी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

मालवण - येथील बाळू तारी आणि आप्पा मोरजकर यांच्या मालकीच्या ‘रामेश्‍वर कृपा’ या मच्छीमारी ट्रॉलरला विजयदुर्ग समुद्रात आज सकाळी सहाच्या सुमारास जलसमाधी मिळाली. जोरदार वारा आणि अजस्र लाटांमुळे ट्रॉलरच्या नाळीच्या फळ्या निघाल्याने त्यातून समुद्राचे पाणी ट्रॉलरमध्ये घुसले. काही वेळातच ट्रॉलर बुडू लागला.

मालवण - येथील बाळू तारी आणि आप्पा मोरजकर यांच्या मालकीच्या ‘रामेश्‍वर कृपा’ या मच्छीमारी ट्रॉलरला विजयदुर्ग समुद्रात आज सकाळी सहाच्या सुमारास जलसमाधी मिळाली. जोरदार वारा आणि अजस्र लाटांमुळे ट्रॉलरच्या नाळीच्या फळ्या निघाल्याने त्यातून समुद्राचे पाणी ट्रॉलरमध्ये घुसले. काही वेळातच ट्रॉलर बुडू लागला. त्यामुळे अन्य ट्रॉलरवरील खलाशांनी बुडणाऱ्या ट्रॉलरमधील खलाशांना सुखरूप बाहेर काढले; मात्र ट्रॉलर बुडाला. या दुर्घटनेची माहिती मत्स्य व्यवसाय विभाग, बंदर विभाग, सागरी पोलिस ठाण्यास देण्यात आली आहे. 

येथील बंदरातील आज सकाळी मासेमारीसाठी जाळी मारण्याच्या तयारीत असताना अचानकपणे नाळीच्या फळ्यांतून पाणी ट्रॉलरमध्ये घुसू लागले. ट्रॉलरवरील तांडेल व खलाशांनी पाणी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र पाणी इंजिनात जाऊन इंजिन बंद पडले. त्यानंतर तांडेल यशवंत तुळाजी आडविरकर यांनी सहकारी ट्रॉलर्सना ट्रॉलरमध्ये बोलाविले.

मालवणातील जगदीश चंद्रकांत येरम यांचा ट्रॉलर जाळी वर घेत मदतीसाठी धाव घेतला. आपल्या ट्रॉलरचा स्पीड वाढवून तांडेल सुधाकर गंगाराम वडककर याने रामेश्‍वर कृपा मधील तांडेलसह सातही कामगारांना सुखरूपपणे आपल्या ट्रॉलरवर घेतले. काही मिनीटातच रामेश्‍वर कृपा ट्रॉलर समुद्रात पूर्णपणे बुडाला. यामुळे साहित्यासह सुमारे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या दुर्घटनेची माहिती मत्स्य व्यवसाय विभागाला देण्यात आली. ट्रॉलर बुडालेल्या ठिकाणी बोया नांगरून ठेवण्यात आला आहे. 

दरम्यान, बोटीचे मालक हे मुंबईत असल्याने ते उद्या येथे येणार आहेत. त्यानंतर स्कुबा डायर्व्हसच्या मदतीने ट्रॉलरवरील सामान कमी करून त्यानंतर इतर ट्रॉलर्संच्या मदतीने हा ट्रॉलर समुद्रातून बाहेर काढण्यासाठी बचावकार्य राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. हा ट्रॉलर समुद्रातून बाहेर काढणे आवश्‍यक आहे. त्याठिकाणाहून इतर मच्छीमार नौका मासेमारीसाठी जात असल्याने त्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी हा ट्रॉलर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

Web Title: Sindhudurg News trailer boat Water borne