हळद लागवडीतून आर्थिक सुबत्ता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

दोडामार्ग - कोनाळकट्टा येथील ओमसाई स्वयंसहायता महिला बचत गटाने केरळीयन हळदीची लागवड करून कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पन्न कसे घ्यावे, याचा आदर्शपाठच घालून दिला आहे. 

दोडामार्ग - कोनाळकट्टा येथील ओमसाई स्वयंसहायता महिला बचत गटाने केरळीयन हळदीची लागवड करून कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पन्न कसे घ्यावे, याचा आदर्शपाठच घालून दिला आहे. 

केरळीयन हळदीबरोबरच आंबे हळद, लोणच्याची हळद आणि गावठी हळदही त्यांनी लावली आहे. बचत गटाच्या अध्यक्ष विनिता देसाई आणि त्यांच्या सहकारी सखी ज्योती गावडे, वैशाली मासरणकर, पूजा गावडे, सुवर्णा आरोलकर, सुवर्णा प्रभावळकर, सिंधू शेटके, शीतल गवस, मिताजी कर्पे, शैलजा सावंत या वेगवेगळ्या उपक्रमातून अर्थार्जन करतात.

या बचत गटाने गतवर्षी सिंधुसरसमध्ये प्रदर्शनात सहभाग घेतला होता. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या बचत गटप्रदर्शन व विक्री उपक्रमांतर्गत स्टॉल लावला होता. त्यांना राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता. तेच कोकण सरसमध्येही विभागस्तरीय प्रथम क्रमांकांचे पारितोषिक मिळाले होते.

सौ. देसाई बचत गटाद्वारे पर्यावरणपूरक विविध प्रकारच्या बॅगा बनवतात. गोधड्या 
बनविण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यातून त्यांना चांगल्या प्रकारे आर्थिक लाभ होतो. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून त्यांना फिरते भांडवल आणि कर्जही दिले. शेती आणि व्यवसायात नवनवीन प्रयोग केले. बचत गटातील महिलांकडून केले जाते. त्यांना तालुका समन्वयक कृष्णा जाधव आणि पत्रकार प्रभाकर धुरी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते.

हळद लागवडीवर भर
सध्या या महिलांनी हळद लागवडीकडे लक्ष केंद्रित केले आहे. केरळीयन हळदीचा उपयोग सौंदर्यवृद्धीसाठी आणि त्वचेची कांती खुलविण्यासाठी केला जातो. त्यामुळे त्याला मोठी मागणी आहे. आंबेहळद औषधी गुणधर्मयुक्त आहे. गावठी हळद रोजच्या जेवणात वापरली जाते तर लोणच्यासाठी म्हणून असलेली खास हळदही त्यांनी लावली आहे. एकूणच काय जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत उमेद अभियानाच्या माध्यमातून महिला आर्थिक, सामाजिक आणि भावनिकदृष्ट्या सक्षम होत आहेत हेच खरे!

Web Title: sindhudurg news Turmeric plantation by Mahila Bachat Gat