सिंधुदुर्गातील रस्त्यांसाठी ५० कोटींचा निधी येणार - वैभव नाईक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

कुडाळ - जिल्ह्यातील राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्ग यांच्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी ५० कोटींचा निधी देण्याचे मान्य केले आहे. ही माहिती आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कुडाळ - जिल्ह्यातील राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्ग यांच्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी ५० कोटींचा निधी देण्याचे मान्य केले आहे. ही माहिती आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. या संदर्भात श्री. पाटील ३० ला ओरोस येथे बैठक घेणार असल्याचेही श्री. नाईक म्हणाले.

ते म्हणाले, ‘‘महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. त्याबद्दल जिल्हावासीयांच्या वतीने आपण आभाराचे पत्र श्री. पाटील यांना दिले आहे; मात्र राज्य महामार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांचीही दुरवस्था झाली असून, त्या रस्त्यांसाठी ५० कोटी रुपये देण्याचे श्री. पाटील यांनी मान्य केले आहे. ओरोस येथे ते ३० ला सकाळी साडेआठ ते साडेनऊ या वेळेत यासंदर्भात बैठक घेणार आहेत. शहरातील मुख्य रस्ता नगरपंचायतीच्या ताब्यात घेतला आहे; परंतु त्यांच्याकडे निधी नाही. हा रस्ता नगरपंचायतीने ठराव घेऊन रिनोटिफाय केला तर सार्वजनिक बांधकाम विभाग तो पुन्हा ताब्यात घेऊन त्यावर खर्च करण्याबाबतही श्री. पाटील यांच्याशी चर्चा झाली. नगरपंचायतीकडे निधी नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे.’’

या वेळी नगरसेवक सचिन काळप, बबन बोभाटे, बाळ म्हाडगूत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Sindhudurg News Vaibhav Naik press