‘वैभववाडी-कोल्हापूर’चा वेग महाराष्ट्र ठरविणार

शिवप्रसाद देसाई
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

सावंतवाडी - वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे काम एसपीव्ही (सोशल पर्पज व्हेईकल) योजनेखाली असल्याने याच्या खर्चात महाराष्ट्राने निम्मा वाटा उचलणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारने यासाठी निधी द्यायची तयारी दाखवली असून, राज्याकडून किती वेगात निधी येतो यावर याच्या पूर्णत्वाचा कालावधी अवलंबून आहे. हा प्रकल्प उभारण्याची जबाबदारी कोकण रेल्वे महामंडळाकडे दिली जाण्याची शक्‍यता आहे. 

सावंतवाडी - वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे काम एसपीव्ही (सोशल पर्पज व्हेईकल) योजनेखाली असल्याने याच्या खर्चात महाराष्ट्राने निम्मा वाटा उचलणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारने यासाठी निधी द्यायची तयारी दाखवली असून, राज्याकडून किती वेगात निधी येतो यावर याच्या पूर्णत्वाचा कालावधी अवलंबून आहे. हा प्रकल्प उभारण्याची जबाबदारी कोकण रेल्वे महामंडळाकडे दिली जाण्याची शक्‍यता आहे. 

वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाले. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू प्रकल्पासाठी आग्रही होते. अलीकडे या प्रकल्पाबाबतच्या हालचाली थांबल्या होत्या. दिल्लीत दोन दिवसांपूर्वी श्री. प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर या प्रकल्पाच्या उभारणीच्या दृष्टीने पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत उच्चस्तरीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकल्प एसपीव्ही योजनेखाली आहे. यात रेल्वे मंत्रालय व महाराष्ट्र शासन यांनी संयुक्‍तपणे तयार केलेली कंपनी आणि केंद्र सरकार यांनी मिळून याची उभारणी करायची आहे. 

यात दोघांचाही निधीचा वाटा निम्मा-निम्मा असेल. या प्रस्तावित मार्गाचा तूर्तास प्राथमिक सर्व्हे झालेला आहे. यामुळे मार्गावर कोठे स्थानके असतील किंवा रेल्वे नेमकी कोणत्या भागातून जाणार आहे, याचे चित्र स्पष्ट झालेले नाही. 

प्रस्तावित मार्गाचा बराचसा भाग कोल्हापूर जिल्ह्यात येत असल्याने मध्य रेल्वेकडे याची जबाबदारी (लीड एजन्सी) असणार आहे. एसपीव्ही योजनेच्या धोरणानुसार या प्रकल्पाचे अध्यक्ष हे मध्यरेल्वेचे सरव्यवस्थापक (जीएम) असतील. 
दिल्लीत झालेल्या बैठकीत हा प्रकल्प पुढे नेण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. यात प्रकल्पासाठीचा केंद्राचा निधी लवकर उपलब्ध करण्याची तयारी असल्याचे स्पष्ट झाले. असे असले तरी महाराष्ट्राकडून तितकाच निधी मिळणे आवश्‍यक आहे. तो किती वेगात मिळतो यावर प्रकल्प कधी सुरू होईल व किती वेगात पूर्ण होईल हे ठरणार आहे.

कोकण रेल्वेकडे उभारणीचे काम
प्रकल्पाला कोकण रेल्वेच्या वैभववाडी स्थानक परिसरातून 
सुरवात होणार आहे. मात्र, पूर्ण प्रकल्प मध्य रेल्वेच्या ताब्यात असेल. कोकण रेल्वेकडे प्रतिकूल स्थितीत प्रकल्प उभारणीचा अनुभव आहे. कोकण रेल्वेसह जम्मू काश्‍मीर व इतर ठिकाणी 
अनेक आव्हानांवर मात करत त्यांनी प्रकल्प पूर्ण केले आहेत. 
यामुळे हा प्रकल्पही कोकण रेल्वेकडे दिला जाण्याची शक्‍यता
 वरिष्ठ सूत्रांनी वर्तवली.

संभाव्य रेल्वेमार्ग
कोल्हापूर ते वैभववाडी हे ७५ किलोमीटरचे अंतर आहे; मात्र घाटपायथा ते घाटमाथा यामध्ये सर्वसाधारण दोन हजार फूट उंचीचा फरक आहे. त्यामुळे रेल्वेमार्गाची लांबी वाढणार आहे. हा मार्ग ११५ किलोमीटरचा होईल, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Sindhudurg News Vaibhavwadi-Kolhapur Rail track special