वैभववाडीत नगरोत्थानमधून फक्त सत्ताधाऱ्यांचीच कामे झाल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

वैभववाडी - नगरोत्थानच्या निधीतुन फक्त सत्ताधाऱ्यांचीच विकासकामे होणार का असा सवाल करीत यापुर्वीच्या नगरोत्थानच्या 40 लाख निधीपैकी 32 लाख रूपयांचा निधी सत्ताधाऱ्यांच्या प्रभागात खर्च झाला, असा आरोप नगरसेवक संतोष पवार यांनी आजच्या सभेत केला. हे धोरण आतातरी बदलावे, अशी मागणी त्यांनी केली. 

वैभववाडी - नगरोत्थानच्या निधीतुन फक्त सत्ताधाऱ्यांचीच विकासकामे होणार का असा सवाल करीत यापुर्वीच्या नगरोत्थानच्या 40 लाख निधीपैकी 32 लाख रूपयांचा निधी सत्ताधाऱ्यांच्या प्रभागात खर्च झाला, असा आरोप नगरसेवक संतोष पवार यांनी आजच्या सभेत केला. हे धोरण आतातरी बदलावे, अशी मागणी त्यांनी केली. 

वाभवे वैभववाडी नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष संजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला उपनगराध्यक्ष संपदा राणे, बांधकाम सभापती समिता कुडाळकर, रवींद्र रावराणे, रोहन रावराणे, संतोष माईणकर, अक्षता जैतापकर, दीपा गजोबार, रवींद्र तांबे, सुचित्रा कदम, मुख्याधिकारी परितोष कंकाळ आदी उपस्थित होते. 

नगरोत्थानमधुन विकासकामे सुचविण्याची विनंती मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी सभागृहाला केली. यावेळी नगरसेवक पवार यांनी कामे सत्ताधाऱ्यांची होणार की विरोधकांची असा सवाल उपस्थित करीत विकासकामे करताना विरोधकांना डावलले जात असल्याचा आरोप केला. यापुढील काळातही आपले तेच धोरण राहणार असेल तर स्पष्टपणे सांगा.

यावेळी मुख्याधिकारी कंकाळ यांनी सभागृहाने प्राधान्यक्रम ठरवावा. त्यानुसार कामे केली जातील. बांधकाम सभापती सौ. कुडाळकर यांनी देखील विकासकामाचा प्राधान्यक्रम ठरवुन गरजेनुसारच कामे व्हायला हवीत, असे मत मांडले. 

नवीन बांधकामावर करआकारणी करताना दहा लाख रूपये किंमतीच्या घराला एक हजार रूपये तर त्यावरील किंमतीच्या बांधकामाला शासकीय दरानुसार करआकारणी करण्यात यावी, असा ठराव मागील सभेत झाला होता. हा ठराव आपण मांडला होता; परंतु ठरावाला सुचक कुणीच नसल्याचे इतिवृत्ताच्या नोंदीमध्ये दिसत आहे. हा काय प्रकार आहे, असे बांधकाम सभापती कुडाळकर यांनी विचारल्यानंतर नगराध्यक्ष चव्हाण आणि कंकाळ यांनी सौ. कुडाळकर यांच्या नावाचा सुचक म्हणुन उल्लेख करण्यात यावा, अशी सुचना कर्मचाऱ्यांना दिली. 

दलितवस्ती सुधार योजनेच्या निधीतुन दलित वस्तीतच कामे करण्यात यावीत. या निधीत कुणीही ढवळाढवळ करू नये असे मत नगरसेवक तांबे यांनी मांडले. सोळा प्रभागात विविध विकासकामे अन्य योजनांच्या माध्यमातुन होतात परंतु आम्हाला फक्त या निधीवरच अवलंबुन राहावे लागते असे त्यांनी सांगितले. 

ज्या भागात स्ट्रीट लाईटचे काम झालेले नाही त्या भागाचा नव्याने सर्व्हे करण्यात यावा, अशी मागणी बहुतांशी नगरसेवकांनी केली. यावेळी नगरसेवक संजय सावंत यांनी नवीन स्ट्रीट लाईट बसवा; परंतु पुर्वी बसविलेल्या ज्या लाईट बंद आहेत त्या सुरू करा अशी सुचना मांडली. 

बाजारपेठ वगळुन शहराच्या अन्य भागात स्वच्छता केली जात नाही, असा आरोप नगरसेवक सज्जन रावराणे यांनी केला. यावेळी कंकाळ यांनी यापुढे स्वच्छता आणि घनकचरा विषयी शासनाने महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. घनकचरा प्रकिया प्रकल्पासाठी दहा गुंठे जागा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, असे कंकाळ यांनी सांगितले. कचऱ्यांचे वर्गीकरणासाठी प्रत्येक कुटुंबाला दोन डसबीन देण्याचे निश्‍चित केले. 

टाटा कंपनीने दत्तमंदीर परिसरात बसविलेला पाणी जलशुद्धीकरण यंत्र सुरू होणार आहे का असे विचारीत सध्या शहरात शुदध पाण्याची लोकांना गरज होती असा मुद्दा सावंत यांनी उपस्थित केल्यानंतर नगराध्यक्ष चव्हाण यांनी पाईप नादुरूस्त आहे त्यासंदर्भात कंपनीला कळविण्यात आल्याचे सांगितले. 

प्रभाग तीनमध्ये नळपाणी योजनेचे पाणी जात नाही. तेथील पाण्याचा प्रश्‍न तातडीने सोडवावा. याशिवाय शहरात काही ग्राहकांकडे एक इंचाचे कनेक्‍शन आहेत ते बंद करावेत, अशी मागणी अक्षता जैतापकर यांनी केली. डाटा ऑपरेटर आणि स्वच्छतेचा ठेका रद्द करावा, अशी मागणी देखील त्यांनी केली. या मागणीला नगरसेवक संतोष पवार यांनी विरोध दर्शविला. 

थकबाकीदारांची नावे लावा... 
नगरपंचायतीची घरपट्टी आणि पाणीपट्टी मोठ्या प्रमाणात थकीत आहे. काहींनी तर ग्रामपंचायतीपासुन कर भरलेला नाही. त्यामुळे या थकबाकीदारांची नावे नगरपंचायत कार्यालयाबाहेर व सार्वजनिक ठिकाणी ठळकपणे लावण्यात यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. याशिवाय थकबाकीदारांना नगरपंचायतीचा कोणताही दाखला देण्यात येवु नये. जर कुणी कर्मचाऱ्यांने दाखला दिला तर त्याच्याकडुन थकीतांची वसुली केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले. 

पदाधिकाऱ्यांत जुपंली... 
खासदार नारायण राणे यांच्या अभिनंदन ठराव मांडण्यावरून नगराध्यक्ष सजंय चव्हाण आणि माजी नगराध्यक्ष रवींद्र रावराणे यांच्यात जुंपली. सभेच्या सुरूवातीस श्री. चव्हाण बोलण्यास उठत असताना माजी नगराध्यक्ष रावराणे यांनी त्यांना थांबविले. त्यानंतर ते स्वतः उठले आणि त्यांनी खासदार राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. यावेळी नगराध्यक्ष श्री. चव्हाण यांनी हा ठराव मांडण्यासाठी मी उभा राहीलो होतो; परंतु आपण मला थांबण्यास सांगितले. त्यामुळे ठरावाला सुचक म्हणुन माझे नाव घ्यावे. त्यावेळी रावराणे यांनी ठराव मी मांडला आहे त्यामुळे सुचक मीच आहे. यावरून दोघांमध्ये चांगलीच जुंपली. 

Web Title: Sindhudurg News Vaibhavwadi Panchayat Development issue