आचिर्णेतील वैदू आजी नाबाद १०३!

एकनाथ पवार
सोमवार, 23 जुलै 2018

वैभववाडी - औषधी वनस्पतीच्या माध्यमातून लोकांची प्रकृती ठणठणीत करणाऱ्या आचिर्णेतील वैदू आजी गंगूबाई जनू बोडके यांनी वयाची १०३ वर्ष पार केली आहेत. औषधी वनस्पतीचा आहारातील वापर आणि शेतातील काबाडकष्ट हेच त्यांच्या उत्तम आर्युमानाचे गमक आहे.

वैभववाडी - औषधी वनस्पतीच्या माध्यमातून लोकांची प्रकृती ठणठणीत करणाऱ्या आचिर्णेतील वैदू आजी गंगूबाई जनू बोडके यांनी वयाची १०३ वर्ष पार केली आहेत. औषधी वनस्पतीचा आहारातील वापर आणि शेतातील काबाडकष्ट हेच त्यांच्या उत्तम आर्युमानाचे गमक आहे.

गंगूबाई यांनी १०३ वर्ष पूर्ण केल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. आचिर्णे धनगरवाडा येथे गंगूबाई या एकत्र कुटुंबात राहतात. त्यांचे माहेर उंबर्डे. लग्नानंतर गेली ८८ वर्ष त्यांचे येथेच वास्तव्य आहे. कुटुंबाचा शेळ्यामेढ्यांचा पारंपरिक व्यवसाय असल्यामुळे त्यांचे सतत जंगलात फिरणे असायचे. आई, वडील आणि त्यानंतर सासऱ्यांकडून त्यांना जंगलातील औषधी वनस्पतीची माहिती मिळाली. विविध वनस्पतींची पूर्वजांकडुन मिळालेली माहिती त्यांनी अमुल्य ठेवा म्हणीन स्मरणात ठेवली. त्यांचा वापर त्या आजतागायत करत होत्या. डोळ्यातील दोष, अर्धशिरषी (डोकेदुखी) पोटदुखी, कावीळ यासह विविध आजार त्या रामबाण औषध देत असत.

गरजवंताला मागणीनुसार त्यांनी मोफत औषध  दिले.
आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकांची प्रकृती ठणठणीत राहावी, याकरीता सतत प्रयत्न करणाऱ्या या वैदु आजीची प्रकृती कायमच चांगली राहिली. औषधी वनस्पतीचा आहारात वापर आणि सतत शेतात काबाडकष्ट करण्याची तयारी यामुळे त्यांची प्रकृती कधीही बिघडली नाही. वैदु आजींना एक मुलगा, एक मुलगी, तीन नातू आणि सात पणतू, सुना, नातसुना असा मोठा परिवार आहे.

Web Title: Sindhudurg News Vaidu Grandmother from Archine 103