वनखात्याने गांधारीची भूमिका सोडावी

वनखात्याने गांधारीची भूमिका सोडावी

दोडामार्ग -  राज्यभर आपत्ती निवारण कक्षाचा डांगोरा पिटणारे प्रशासन व जनसेवेसाठी व जैवविविधता टिकविण्यासाठी मोठमोठ्या योजनांची घोषणा करणारे वनखाते यांच्या नाकर्तेपणामुळे वीजघर केंद्रे पुनर्वसन येथील राज्यमार्ग पुन्हा कधीही बंद होऊ शकतो. नुसता राज्यमार्गच नाही तर वीजघर बांबर्डे येथील केंद्रे खुर्दच्या प्रकल्पग्रस्त ग्रामवासीयांनासुद्धा त्याचा जबर फटका बसू शकतो. याबाबत प्रशासन व ज्यांच्यामुळे ही आपत्ती ओढवली ‘त्या’ वनखात्याने गांधारीच्या भूमिकेतून बाहेर पडणे आवश्‍यक आहे, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली.

तालुक्‍यातील हेवाळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील तिलारी घाटाच्या पायथ्याशी बांबर्डे वीजघर येथे ढगफुटी सदृश्‍य पावसाने हाहाकार माजवला. नुसता पाऊस कोसळणे हे मुळ कारण नसून या पावसाचे डोंगरातून खाली नदीच्या दिशेने येणारे पाणी वनखात्याने हत्ती प्रतिबंधासाठी खोदलेले मोठे चर हेच मूळ कारण आहे. या चरामुळे कित्येक मीटर अंतरावरील पावसाच्या पाण्याने भल्या मोठ्या चरातील माती दगड गोठे प्रचंड वेगाने मुख्य राज्यमार्गावर वाहून आले. आणि तेथून पुढे नदीत जाण्यास मार्ग नसल्याने हे कित्येक डंपर मातीचे ढीग मुख्य राज्यमार्गावरच साचून राहिले. तब्बल १० ते १२ तास वाहतूक ठप्प राहिली.

रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य आणि नदीचे स्वरूप यामुळे केंद्रे गावठाण पर्यंत सुमारे अर्धा किलोमीटर हीच परिस्थिती झाली. हेवाळेचे कार्यतत्पर सरपंच यांनी मंत्रालय स्तरावरील आपत्ती निवारण कक्ष यांच्याशी संपर्क साधून केलेला पाठपुरावा व मीडियाने उठविलेला आवाज त्यामुळे बंद मार्ग एकेरी वाहातुकीने कार्यरत झाला; मात्र पुन्हा येथे तीच परिस्थिती ओढवणार आहे. याबाबत ना रस्ता सुरक्षेची जबाबदारी असलेल्या बांधकाम खात्याला फिकीर, ना ज्यांच्यामुळे हा माळीण सारखा डोंगर खचण्याचा सुरू झालेला प्रकार त्या वनखात्याला फिकीर. या दोघांच्या तू-तू मैं-मैंमध्ये नागरिक व हेवाळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील केंद्रे प्रकल्पग्रस्त यांना फटका बसणार आहे.

याच पार्श्‍वभूमीवर हेवाळेचे सरपंच संदीप देसाई यांनी तलाठी गोरे व केंद्रेचे पोलिस पाटील अंकुश गावडे स्थानिक ग्रामस्थ यांच्यासमवेत प्रत्यक्ष घटनास्थळाची पुन्हा एकदा पाहणी करत याबाबतचा अहवाल शासनास पाठविण्यात यावा, अशी मागणी केली आहे. बांधकामाचे उपविभागीय अभियंता विजय चव्हाण, वनविभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण व वनक्षेत्रपाल सचिन आठवले यांचे लक्ष वेधून त्याठिकाणी संभाव्य धोका टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com