बुद्धिबळात हरलो तरी राजकारणात आम्ही एकत्र - खासदार विनायक राऊत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

सावंतवाडी - बुद्धिबळात जरी हरलो तरी राजकारणात आम्ही एकमेकांना हरविणार नाही, अशी कोटी आज येथे खासदार विनायक राऊत यांनी केली. माजी आमदार राजन तेली त्यांच्यासोबत खेळण्यासाठी बसले होते. त्यांच्या या विधानामुळे उपस्थितांत एकच हशा पिकला.

सावंतवाडी - बुद्धिबळात जरी हरलो तरी राजकारणात आम्ही एकमेकांना हरविणार नाही, अशी कोटी आज येथे खासदार विनायक राऊत यांनी केली. माजी आमदार राजन तेली त्यांच्यासोबत खेळण्यासाठी बसले होते. त्यांच्या या विधानामुळे उपस्थितांत एकच हशा पिकला.

जिल्ह्यात शिवसेना, भाजप पदाधिकाऱ्यांत गेले काही दिवस राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दोन्ही बाजूने टीकेची एकही संधी सोडली जात नाही. अशा परिस्थितीत आज येथे आयोजित इनडोअर जिल्हास्तरीय स्पर्धेच्या निमित्ताने हे दोन पक्षांचे पदाधिकारी एकत्र आले. मुख्य उद्‌घाटनाचा कार्यक्रम संपल्यानंतर अन्य खेळाचे उद्‌घाटन करण्यासाठी सर्व पदाधिकारी तेथील क्रीडा सभागृहात गेले. 

यावेळी बुद्धिबळ स्पर्धेचे ओपनिंग राऊत यांनी करावे, असा आग्रह नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी धरला. त्यानुसार एका बाजूला श्री. राऊत आणि दुसऱ्या बाजूला माजी आमदार तेली बसले. त्याच वेळी उपस्थितांतून आता नेमके कोण कोणाला हरवितो ते बघुया, असे विचारले. यावेळी श्री. राऊत यांनी आम्ही राजकारणात एकमेकाला हरविणार नाही, असे सांगत हजरजबाबी उत्तर दिले. श्री. तेली यांनी आम्हा सर्वांना एकत्र आणण्याची ताकद तुमच्यात आहे. तुम्ही आलात आणि बोलविलात तर आम्ही कोणत्याही कार्यक्रमाला येऊ शकतो, असे सांगून श्री. तेली यांनी त्या चर्चेला पूर्णविराम दिला. 

उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, वसंत केसरकर, रूपेश राऊळ, आनंद नेगवी, संजय पेडणेकर, नागेंद्र परब आदी उपस्थित होते.

Web Title: Sindhudurg News Vinayak Raut comment