प्रिंट मीडियाचे स्थान अबाधित - विनायक राऊत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

सावंतवाडी - सावंतवाडीची पत्रकारीता जिल्ह्यातील इतर पत्रकारांना आदर्शवत आहे. अभ्यासू व समाजाची जाण असणारे पत्रकार इथे आहेत. सोशल मिडीया आधुनिक युगात कितीही अपडेट झाला तरी प्रिंट मिडीयाचे वाचकांच्या मनातील स्थान आजही भक्कम आहे, असे मत  येथे खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले.

सावंतवाडी - सावंतवाडीची पत्रकारीता जिल्ह्यातील इतर पत्रकारांना आदर्शवत आहे. अभ्यासू व समाजाची जाण असणारे पत्रकार इथे आहेत. सोशल मिडीया आधुनिक युगात कितीही अपडेट झाला तरी प्रिंट मिडीयाचे वाचकांच्या मनातील स्थान आजही भक्कम आहे, असे मत  येथे खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले. येथील तालुका पत्रकार समितीच्या पुरस्कारांचे वितरण शिल्पग्राम येथे झाले. यावेळी ते बोलत होते. 

स्टेट बॅंकेच्या निवृत्त अधिकारी मैथिली प्रधान म्हणाल्या,  ‘‘मे. द. शिरोडकर यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येतो. त्यांची मी नात असल्याचा मला अभिमान आहे. त्यांच्या विचारांची व नीतीमुल्यांची अमुल्य भेट आज सर्वाना मिळाली आहे.’’

पुरस्कार विजेते 
या वेळी वैनतेयकार मे. द शिरोडकर आदर्श पत्रकार छायाचित्रकार अनिल भिसे, जेष्ठ पत्रकार जयानंद मठकर पुरस्कार अशोक करंबळेकर, बाप्पा धारणकर अष्टपैलु व्यक्तीमत्व पुरस्कार दैनिक सकाळचे आंबोली बातमीदार अनिल चव्हाण, (कै.) चंदू वाडीकर समाजसेवा पुरस्कार दत्तप्रसाद पोकळे आणि मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार (कै.) चंद्रशेखर उर्फ चंदु सावंत यांच्या नातेवाईकांनी स्वीकारला.

वसंत केसरकर यांनी पुर्वीच्या काळी समाजाच्या अनेक प्रश्‍न ज्या पत्रकारांनी सोडविले त्यांच्या कार्याची जाणीव आज ठेवून पत्रकारीता करणे आवश्‍यक आहे असे सांगितले. नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, ‘‘आज देश आणिबाणी सदृश्‍य  विचित्र स्थितीकडे जात असताना या देशात पुन्हा लोकशाही रुजविण्याचे काम पत्रकारांनी करणे आवश्‍यक आहे.’’ 

श्री. करंबळेकर म्हणाले, ‘‘आजची पत्रकारीता चांगल्या प्रकारे काम करते का याचे आत्मपरीक्षण सर्वांनी करावे. सर्वसामान्याच्या परिस्थितीत बदल करण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. मानापमान बाजुला ठेवून एकसंघ पत्रकारीतेचे काम करणे गरजेचे आहे.’’ अनिल चव्हाण म्हणाले, ‘‘साखळी करुन भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यामुळे पत्रकारितेवर मर्यादा निर्माण होत आहेत, त्याच्याविरोधात समाजाभिमुख भूमिका घ्यायला हवी.’’

या वेळी व्यासपीठावर रिझर्व्ह बॅंकेचे असिस्टंट मॅनेजर प्रशांत मठकर, पंचायत समिती सभापती रविंद्र मडगावकर, माजी आमदार राजन तेली, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक, अरविंद शिरसाठ, अभिमन्यू लोंढे, तालुका पत्रकार संघ अध्यक्ष विजय देसाई, प्रा. मिलिंद भोसले, डॉ. जयेंद्र परुळेकर आदी उपस्थित होते. 

सूत्रसंचालन संतोष सावंत यांनी केले. आभार हरिश्‍चंद्र पवार यांनी मानले. यावेळी पालिकेचे सर्व नगरसेवक-सेविका, विक्रांत सावंत, सागर नाणोसकर, रुपेश राऊळ, राजू मसुरकर, पत्रकार व नागरिक उपस्थित होते.

Web Title: Sindhudurg News Vinayak Raut comment