मंदिर जीर्णोद्धारासाठी २५ लाख खंडाचा ठराव घेणार

मंदिर जीर्णोद्धारासाठी २५ लाख खंडाचा ठराव घेणार

कुडाळ - मानकरी, सेवेकरी, बलुतेदार यांनी एकत्र येऊन देवस्थानची कमिटी करायची आहे. हातात हात घालून काम करायचे आहे. यापुढे कुठलीही समिती कोणत्याही मंदिरात असणार नाही. आपण निवडलेली उपसमिती काम करेल. त्याला आम्ही मंजुरी देणार आहोत. यात तहसीलदार, तलाठी असणार नाहीत. मंदिर जीर्णोद्धारासाठी पाच लाखांऐवजी २५ लाख खंड देण्याचा प्रस्ताव मंजूर केला जाईल’’, असे प्रतिपादन पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी आज केले. कोकणातील देवालयांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सिंधुदुर्गात १९९ देवालये आहेत. त्याचे मानकरी, सेवेकरी, गावरहाटी आदी विविध प्रश्‍न कित्येक वर्षे प्रलंबित आहेत. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वादही आहेत. येथील प्रश्‍न, अंतर्गत वाद या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे सहविचार सभेचे आयोजन श्री. जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.

व्यासपीठावर पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे बी. एन. पाटील, संगीता खाडे, विजय पोवार, शिवाजी साळवी, शीतल इंगवले, माजी आमदार राजन तेली, पुष्पसेन सावंत, विनय नातू, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माड्याचीवाडी मठाचे मठाधिपती गावडेकाका महाराज, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, सभापती राजन जाधव, नगराध्यक्ष विनायक राणे, पोलिस निरीक्षक अविनाश भोसले, धीरज परब, प्रशांत राणे, चारुदत्त देसाई, प्रभाकर सावंत, बंड्या सावंत, नीलेश तेंडुलकर, जयदेव कदम, राजू राऊळ, मिलिंद केळुसकर, प्रसन्न कुबल, अभिषेक चव्हाण, तसेच कुडाळ, वेंगुर्ले, मालवण तालुक्‍यांतील मानकरी, सेवेकरी, सदस्य आदी उपस्थित होते.

सहविचार सभेत उपस्थितांनी विविध प्रश्‍न उपस्थित केले. त्या प्रत्येक प्रश्‍नाला श्री. जाधव यांनी समर्पक उत्तरे दिली. ते म्हणाले, की मंदिराचे अनेक प्रश्‍न आहेत. यापूर्वी ते सोडविले गेले नाहीत. आता माझ्याकडे आलेल्या जबाबदारीनुसार सर्व प्रश्‍न मी मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमच्याकडून समितीची कागदपत्रे पूर्ण केल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांत समिती केली जाईल. यापुढे कुठलीही उत्सव समिती कोणत्याही मंदिरात असणार नाही. आपण निवडलेली उपसमिती काम करेल. आम्ही मंजुरी देऊ. मानकरी, सेवेकरी, बलुतेदार यांनी एकत्र येऊन कमिटी करावी. यात तहसीलदार, तलाठी असणार नाहीत. हजारो वर्षे मंदिरांचे जतन केले, त्याचे पावित्र्य राखले गेले अशा ठिकाणी राजकारण असता कामा नये. श्रेयवाद कोणी घेऊ नये. देवालयांमधून दोन गटांत वाद निर्माण झाले तर त्याचा निवाडा करण्यासाठी आम्ही येऊ. हे वादविवाद का होतात, याच्या मुळाशी गेले पाहिजे.

कोकणातील लोकांचा देवालयांबाबत असणारा भक्तिभाव, श्रद्धा आजच्या सहविचार सभेच्या निमित्ताने दिसून आली. त्यामुळे पारदर्शी कारभार करताना वेळप्रसंगी कोकणातील देवालयांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने ताशेरे ओढले तरी या ठिकाणी काम करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन. नेहमीच मी चांगल्या कामासाठी तुमच्याबरोबर राहीन. देवस्थान समितीच्या अधिपत्याखाली सद्यस्थितीत तीन हजार ४२ मंदिरे आहेत.

कोकणातील देवालये पाहता ती अतिशय सुंदर व देखणी असून, सुमारे एक ते दोन कोटींची असतील. मंदिर जीर्णोद्धार करण्यासाठी खंड किती द्यावा, याला मर्यादा आहेत. सध्या पाच लाख देता येतात. मात्र, माझ्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत २५ लाख देण्याचा ठराव मंजूर करून घेण्यासाठी कार्यरत राहीन. तीन ते चार महिन्यांनी निश्‍चितच सिंधुदुर्गात येईल. त्या वेळी झालेली कामे, सुरू कामे व प्रलंबित कामे याबाबत निश्‍चितच चर्चा करून भविष्यात कोकणातील देवालयांसाठी समाधानकारक निर्णय घेतले जातील. यापुढे सर्वांना मंदिरात प्रवेश असेल, असेही त्यांनी सांगितले.

समितीचे सचिव सचिन पोवार यांनी तांत्रिक मुद्यांबाबत बोलताना ८० जीबाबत मार्गदर्शन केले. माजी आमदार विनय नातू, राजन तेली, पुष्पसेन सावंत, गावडेकाका महाराज, सतीश सावंत यांनी विचार मांडले. अतुल काळसेकर यांनी प्रास्ताविक केले. या वेळी श्री. जाधव यांचा सर्वांतर्फे सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com