सिंधुदुर्गातील साडेचारशे एसटीत वायफाय

तुषार सावंत
मंगळवार, 21 नोव्हेंबर 2017

जिल्ह्यातील सात आगारामधील ४५० बसगाड्यामध्ये ही सेवा मिळणार असून सध्या कणकवली आगारा अंतर्गत येणाऱ्या बसगाड्यामध्ये वायफाय सेवा सुरू झाली आहे. मात्र या वायफाय सेवेचा उपयोग केवळ प्रवाशांना चित्रपट पाहण्यासाठी होत आहे. 

कणकवली - शहरी भागात प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी आणि तोट्यात असलेल्या एसटीला आर्थिक सक्षम करण्यासाठी महामंडळाने राज्यभरात प्रवाशांसाठी बसगाड्यामध्ये मोफत वायफाय सेवा सुरू केली आहे. जिल्ह्यातील सात आगारामधील ४५० बसगाड्यामध्ये ही सेवा मिळणार असून सध्या कणकवली आगारा अंतर्गत येणाऱ्या बसगाड्यामध्ये वायफाय सेवा सुरू झाली आहे. मात्र या वायफाय सेवेचा उपयोग केवळ प्रवाशांना चित्रपट पाहण्यासाठी होत आहे. 

प्रवासामध्ये प्रवाशांचे मनोरंजन व्हावे आणि प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या मोबाइल इंटरनेटच्या वापरात अडथळा येऊ नये, यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी बसमध्ये इंटरनेटसाठी मोफत वाय-फाय सेवा सुरू केली. राज्यभरात ही सेवा प्रथम शिवाजीनगर व स्वारगेट आगारातील ५० शिवनेरी, हिरकणी आणि परिवर्तन गाड्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाली होती. आता वर्षभरात राज्यातील बहुतांशी विभागामधील बसगाड्यात मोफत वायफाय सेवा सुरू झाली आहे. महामंडळाने ‘यंत्र मीडिया सोल्युशन’ या कंपनीद्वारे गाड्यांमध्ये वायफायचे यंत्र बसविण्याचे काम सुरू केले आहे. 

वायफाय सुविधेच्या वापरासाठी प्रवाशांना प्रथम त्यांच्या मोबाइलमधील वायफायचा पर्याय सुरू करावा लागेल. त्यानंतर इंटनेट ब्राऊझर ॲप ओपन केल्यानंतर कंपनीने दिलेली यूआरएल टाकावी. त्यानंतर प्राथमिक वैयक्तिक माहिती विचारली जाईल. ती माहिती भरल्यानंतर वायफाय सेवेचा उपभोग घेता येईल. वायफाय सुरू झाल्यानंतर प्रवाशांना त्या मोबाइल ॲपद्वारे मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपट, गाणी, लहान मुलांसाठी कार्टून, टीव्ही वाहिन्यांवरील गाजलेल्या मालिका पाहता येणार आहेत. प्रवाशांना फक्त एकदाच त्यांचा मोबाइल वाय-फाय यंत्राशी जोडावा लागणार आहे. त्यानंतरच्या प्रत्येक प्रवासात त्यांच्या मोबाइलवर ही सुविधा नियमित उपलब्ध होईल. त्यासाठी पुन्हा सुरुवातीपासून कार्यवाही करावी लागणार नाही. अशी माहिती एसटी महामंडळाच्या सूत्रांनी दिली. 

एसएमएसद्वारेही सेवा 
प्रवाशाला चित्रपट, गाणे किंवा टीव्हीवरील मालिका पाहावयाची असेल, तर ते पाहण्यासाठी वायफाय मेन्यूद्वारे एसएमएस करता येणार आहे. तसेच आवडती, गाणी, चित्रपटांची मागणीही एसएमएसद्वारे करता येईल. संपूर्ण राज्यभरातील प्रत्येक एसटीमध्ये ही सेवा कार्यान्वित झाली असून सिंधुदुर्ग विभागातील ४५० बसगाड्यामध्ये मोफत वायफाय मिळणार आहे. जिल्ह्यातील ४१० मार्गावर ही सेवा लवकरच सुरू होत आहे. संपूर्ण गाड्यामध्ये ही सेवा मिळेल असे विभाग नियंत्रक चेतन बसबणीस यांनी सांगितले.

Web Title: Sindhudurg News WiFi in State transport