राणेंना सिंधुदुर्ग भाजपचा विरोध 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

कणकवली - नारायण राणेंसारखे व्यक्तिमत्त्व प्रत्येक पक्षाला हवे हवेसे वाटते, असे सूचक वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी करून राणेंना भाजपमध्ये प्रवेशाचे आवताण दिले होते; परंतु सिंधुदुर्गातील भाजप नेत्यांनी मात्र राणेंच्या संभाव्य प्रवेशाला विरोध केला आहे. तशा भावनादेखील जिल्हाध्यक्षांसह इतर नेत्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे पोचविल्या आहेत. 

कणकवली - नारायण राणेंसारखे व्यक्तिमत्त्व प्रत्येक पक्षाला हवे हवेसे वाटते, असे सूचक वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी करून राणेंना भाजपमध्ये प्रवेशाचे आवताण दिले होते; परंतु सिंधुदुर्गातील भाजप नेत्यांनी मात्र राणेंच्या संभाव्य प्रवेशाला विरोध केला आहे. तशा भावनादेखील जिल्हाध्यक्षांसह इतर नेत्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे पोचविल्या आहेत. 

राणेंनी नुकतीच दिल्लीवारी केली. या वेळी त्यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आदींची भेट घेतल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. प्रत्यक्षात राणे यांनी आपण कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे या आधीच स्पष्ट केले आहे. आमदार नितेश राणे यांनीही राणे व्यक्तीगत कामासाठी दिल्लीत गेल्याचे सांगून आम्ही कॉंग्रेसमध्येच असल्याचे स्पष्ट केले होते; मात्र राणे भाजपमध्ये येतील, या चर्चेने सिंधुदुर्गातील भाजपचे नेते अस्वस्थ आहेत. त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत राणेंच्या संभाव्य भाजप प्रवेशाला विरोधाची भूमिका मांडली आहे. भाजपच्या जिल्हा आणि राज्यस्तरीय नेत्यांनी मात्र राणेंची भाजपच्या कुठल्याच नेत्यांची भेट अगर चर्चा झाल्याचा इन्कार केला आहे. राणेंना पक्षात घेण्याचा प्रश्‍नच नसल्याने भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी, मंत्र्यांच्या भेटीचा प्रश्‍नच येत नसल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी स्पष्ट केले आहे. 

कॉंग्रेस सत्तेत असताना राणेंकडे सर्वांत शेवटी उद्योगमंत्रिपद होते. त्यामुळे त्या समकक्ष पद देऊन त्यांना भाजपत घेण्याबाबतची चर्चा गेल्या महिन्यापासून सुरू होती. मुंबई महापालिकेची निवडणूक आणि त्यानंतरच्या काळातही शिवसेना आणि भाजपचे संबंध ताणले आहेत. त्यामुळे स्वबळाच्या दृष्टीने भाजपकडूनही चाचपणी केली जात आहे. या राजकीय उलथापालथीमध्ये राणे भाजपमध्ये येणार, अशी अटकळ बांधली जात होती, परंतु नारायण राणे यांच्या भाजप पक्षातील प्रवेशाला आमचा पाठिंबा नाही. उलट राणे भाजपमध्ये नकोतच अशीच भूमिका प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय पातळीवर मांडल्याचे श्री. जठार यांनी "सकाळ'शी संपर्क साधून सांगितले. 

श्री. जठार म्हणाले, ""श्री. राणे हे भाजपमध्ये आले, तर सिंधुदुर्गात भाजप क्रमांक 1 चा पक्ष निश्‍चितपणे बनेल, पण राणेंना आता जनाधार राहिलेला नाही. याखेरीज भाजप नेतृत्वाकडून दिलेली आश्‍वासने पूर्ण न झाल्यास राणे भाजपच्या कुठल्याही नेत्यावर तोंडसुख घेऊ शकतात. यापूर्वी त्यांनी शिवसेना आणि कॉंग्रेस नेत्यांवर वारंवार टीका केली आहे. त्याची पुनरावृत्ती ते भाजपमध्ये आल्यावर होऊ शकते. याखेरीज भाजपची संस्कृती, ध्येय धोरणे, संघटनात्मक रचनादेखील वेगळी आहे. या धाटणीत राणे बसू शकत नाहीत. तेवढा संयम ते बाळगू शकत नाहीत. राणे भाजपमध्ये आले तर सध्या भाजपमध्ये असलेले अनेक नेते आणि पदाधिकारी यांचेही मार्ग वेगळे होऊ शकतात. याबाबीदेखील प्रदेश आणि केंद्रीय पातळीवरील नेत्यांकडे मांडल्या आहेत.'' 

कॉंग्रेस नेते नारायण राणेंना भाजपत निश्‍चितपणे यावेसे वाटत आहे; पण ते आम्हाला नको आहेत. ते भाजपमध्ये आले आणि त्यांनी त्यांच्या मूळ स्वभावाप्रमाणे पुन्हा पक्षश्रेष्ठींवर तोफ डागली, तर भाजपची प्रतिमा डागाळेल. त्यापेक्षा सिंधुदुर्गात भाजपची जी काही ताकद आहे, ती आम्ही निश्‍चितपणे वाढवू; पण राणेंना घेऊ नका. 
- प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष-भाजप 

Web Title: Sindhudurg opposition BJP to rane