सिंधुदुर्ग पाऊलखुणा; महिला सबलीकरणासाठी क्रांतिकारक पावले

अनुभवावर आधारीत असलेली ही व्यवस्था होती
महिला सबलीकरणासाठी क्रांतिकारक पावले
महिला सबलीकरणासाठी क्रांतिकारक पावलेsakal

ब्रि टिशांनी सावंतवाडी संस्थानात आरोग्य सुविधा उभारण्यासाठी प्रयत्न केले होते. सावंतवाडीत १८८८ मध्ये वेस्ट्रॉप सिव्हील हॉस्पिटल सुरू केले होते. पुढे ते विस्तारले गेले; मात्र यात प्रामुख्याने मलेरीया, इतर आजार, शस्त्रक्रिया चालायच्या. प्रसुतीसाठी रूग्णालयामध्ये फारशी व्यवस्थाही नव्हती आणि बाळंतपणासाठी रूग्णालयात येण्याची मानसिकताही कमी होती. गावोगाव असलेल्या सुईणी बाळंतपण करायच्या. अनुभवावर आधारीत असलेली ही व्यवस्था होती. त्यांना कोणत्याही पद्धतीचे वैद्यकीय प्रशिक्षण दिले जात नसे. नवजात बालकांच्या आरोग्याबाबतही पारंपरिक व्यवस्थाच सगळीकडे होती. त्यामुळे बाळंतपणात माता मृत्यू आणि नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त होते.

१९२५ मध्ये संस्थानातील काही डॉक्टरांनी एकत्र येत ‘बेबी विक मुव्हमेंट’ सुरू केली. यासाठी निधी गोळा केला होता. हा निधी २००० इतका झाला. यातून आरोग्य प्रदर्शन, व्याख्याने आदी उपक्रम राबवले गेले. हे सगळे करून काही रक्कम शिल्लक राहिली. या दरम्यान या सगळ्या मंडळींना येथे प्रसूतीसाठी सुतिकागृहाची गरज अधिक ठळकपणे जाणवली. ती लक्षात घेऊन सावंतवाडीतील काही समाजसेवक आणि डॉक्टरांनी मिळून १९२५ मध्ये चार खाटांचे छोटेसे सुतिकागृह सुरू केले; मात्र निधी अभावी ते पुढे चालवणे कठीण बनले; मात्र गरज तर होतीच. सुतिकागृह सुरू करणाऱ्या मंडळींनी ही गोष्ट महाराजांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी या चळवळीला बळ दिले.

महाराजांच्या मातोश्री जानकीबाई यांचे स्मारक सुतिकागृहाच्या रूपाने उभे करण्याचा निर्णय झाला. यासाठी त्या काळातील सरकारी रूग्णालयाच्या जवळ असलेल्या जागेत दरबारातर्फे चांगली इमारत बांधण्याचा निर्णय झाला. ३ नोव्हेंबर १९२७ ला मुंबईचे गर्व्हनर ने. ना. सर लेस्ली विल्सन यांच्या हस्ते याचे भूमिपूजन झाले. २० हजार रूपये खर्चून इमारत उभी राहिली. कायम फंड म्हणून ४० हजाराची देणगी देण्यात आली. याशिवाय सुतिकागृह उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या त्या काळातील डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आणखी ४० हजाराची लोकवर्गनी जमा केली. यात प्रामुख्याने डॉ. हरि शिवराम उर्फ भाऊसाहेब परुळेकर, मंगेशराव सबनीस यांचा मोलाचा सहभाग होता.

यातील डॉ. परुळेकर १९२१ मध्ये एमबीबीएस होवून सावंतवाडीत आले. त्यांची आणि महाराजांची मैत्री होती. भाऊसाहेब सामाजीक बांधीलकी जपून वैद्यकीय व्यवसाय करायचे. सुतिकागृह उभारणीसाठी ते सक्रिय होते. स्वतः इमारत बांधणीच्यावेळी ते देखरेख करायचे. १९६६ पर्यंत ते या रूग्णालयामध्ये कार्यरत होते. त्यांची बहीण कमाताई प्रभू-आजगावकर यांनाही त्यांनी या रूग्णसेवेत सामावून घेतले. कमाताई या बालविधवा होत्या. त्यांना भाऊसाहेबांनी नर्सिंगचे शिक्षण दिले. नंतर त्या येथे दीर्घकाळ मेट्रन म्हणून कार्यरत होत्या. एकूण अशी समाजासाठी परिश्रम घेणारी माणसे आणि बापूसाहेब महाराजांसारखा लोकहीतवादी राजा यांच्या एकत्र प्रयत्नातून सुतिकागृहाची वास्तू उभी राहिली. ५ जून १९३१ ला जुने सुतिकागृह नव्या इमारतीत स्थलांतरीत झाले. याठिकाणी केवळ प्रसुतीच नाही तर सुईणींसाठी शास्त्रीय पद्धतीचे शिक्षण देणारे वर्ग सुरू करण्यात आले.

नव्या इमारतीत १४ खाटांची व्यवस्था होती. स्त्रीयांच्या आरोग्याविषयी येथे विविध उपक्रम घेतले जावू लागले. पुढे कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्या जावू लागल्या. हळूहळू याची व्याप्ती वाढत गेली. आजही हे सुतिकागृह सक्षमपणे चालू असून आयुर्वेद महाविद्यालय यालाच जोडून आहे. त्या काळात ज्युबिली अ‍ॅन्टी मॅटर्निटी केअर अ‍ॅण्ड बेबी वेल्फेअर सोसायटी या सुतिकागृहाची सलग्न संस्था होती. राजे पंचम जॉर्ज यांच्या राज्यारोहणाच्या रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने सावंतवाडीत जमा झालेल्या निधीपैकी शिल्लक रक्कम या संस्थेकडे देण्यात आली होती. सुतिकागृहाचे पदाधिकारी हेच या संस्थेचे पदाधिकारी असायचे. या निधीच्या व्याजाचा विनियोग गर्भवती मातांची तपासणी व गरिबांना मोफत औषधे देण्यासाठी केला जात असे. सावंतवाडी नगरपालिकेकडूनही यासाठी काही अनुदान दिले जायचे.

देवदासी प्रतिबंधक कायदा ही आणखी एक मोठी सुधारणा बापूसाहेब महाराजांनी केली. देवदासीच्या नावाखाली धार्मिकतेचे नाव सांगून अनैतिक गोष्टी चालायच्या. दीर्घकाळ सुरू असलेल्या या अनिष्ट प्रथेचे स्तोम माजले होते. देवदासी असलेल्या महिलांचे आयुष्य भयानक असायचे. ही अनिष्ट प्रथा ६ ऑगस्ट १९३१ ला कायदा आणून महाराजांनी बंद केली. या सामाजीक सुधारणेच्या कायद्यात म्हटले होते की, “हिंदू देवळांच्या आवारात (देऊळ याचा अर्थ कोणतीही खासगी किंवा सार्वजनिक उपासनेची जागा) अगर बाहेर एखाद्या हिंदू स्त्रीच्या संबंधीत, तिच्या कबुलीने अगर कबुलीशिवाय कोणताही विधी करणे, त्यांचे नाव किंवा वर्णन कोणतेही असो, ज्याचा उद्देश अगर परिणाम तिला हिंदू देवळात देवदासी म्हणून अर्पण करण्याचा असेल तो कायद्याने बेकायदेशीर ठरविण्यात आला. यात नमुद कोणताही निधी करू दिला किंवा नंतर केलेले लग्न रद्द आहे असे ठरविणारा कोणताही कायदा किंवा रूढी असली तरी कोणत्याही देवदासीला तिच्या बाबतीत लागू असलेल्या इतर कायद्याच्या कलमास पात्र राहून लग्न करता येईल व ते कायदेशिर मानण्यात येईल. या कायद्यात नमुद केलेला विधी जो करेल, करण्यास परवानगी देईल, किंवा करायला भाग पाडेल किंवा मदत करेल, तो १ वर्षाच्या मुदतीपेक्षा जास्त नाही इतक्या शिक्षेस पात्र असेल. त्या काळातील धार्मिक परांपरांचे अवडंबर लक्षात घेता हा क्रांतीकारक निर्णय म्हणावा लागेल.

असेही औदार्य

सामाजिक कार्यकर्ते व सेवाभावी डॉक्टरांनी सुरूवातीला सुरू केलेले सुतिकागृह पुढे चालवणे कठीण बनले आहे. हा प्रश्‍न डॉ. भाऊसाहेब परुळेकर व इतरांनी बापूसाहेब महारांजांकडे मांडला. महाराजांनी सर्व ऐकुन घेत ‘आपले कार्य नेटाने चालवत’ असे सांगितले; मात्र पुढे आर्थिक समस्या वाढतच गेल्या. नोकरचाकरांचे चार महिन्याचे वेतन तुंबले. त्यामुळे या सगळ्या मंडळींनी महाराजांची पुन्हा भेट घेतली. त्यांना परिस्थिती सांगितली. महारांजांनी मात्र या भेटीत कोणतेच आश्‍वासन दिले नाही. त्यामुळे भेटणाऱ्यांची निराशा झाली. राजवाड्यातून डॉ. परुळेकर घरी पोहोचले आणि दुपारचे जेवण घेऊन ताटावरून उठले. इतक्यातच राजवाड्यातील शिपाई बंद पाकिट घेऊन त्यांच्याकडे आला. या पाकिटात पंधराशे रूपये होते. आपली ही देणगी कुठेही प्रसिद्ध करू नका, असा निरोपही महाराजांनी दिला होता. यामुळे त्या वेळेचे आर्थिक संकट टळले. पुढे महाराजांनी सुतिकागृहाच्या विस्तारात सहभाग घेऊन हे स्वप्न पूर्णत्वाला नेले. डॉ. परुळेकर यांनी या आठवणी लिहून ठेवल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com