
नांदगाव : नांदगाव ते फोंडा या देवगड-निपाणी राज्यमार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून रस्ता चिखलमय झाला आहे. या मार्गावर गणपतीपूर्वी करण्यात आलेली तात्पुरती डागडुजी पावसामुळे उखडून गेली आहे. याचमुळे या मार्गावर सर्वच ठिकाणी खड्ड्यांचे जाळे तयार झाले असून खड्ड्यांत पाणी साचून डबकी अपघातास कारणीभूत ठरत आहेत.
गेली कित्येक वर्षे रस्ताकामांच्या दर्जाबाबत तक्रारी आहेत. लोकप्रतिनिधी आंदोलन, कामबंद याबाबत निवेदन देतात. मात्र, दर्जात सुधारणा होताना दिसत नाहीच. या प्रकाराला वाहनचालक, नागरिक मात्र कंटाळून गेले आहेत. कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांना तसेच कर्नाटकाला जोडणारा महत्त्वाचा देवगड-निपाणी राज्यमार्ग व विजयदुर्ग-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग या दोन्ही मार्गांची अवस्था बिकट झाली आहे.
या मार्गावरून जाताना वाहनचालक, नागरिकांची दमछाक होत आहे. सध्या या दोन्ही मार्गांवर खड्डेमय मार्गातूनच वाहनचालक व प्रवाशांना प्रवास करावा लागत असल्याने नाराजीचे सूर उमटत आहेत. त्यातच या मार्गासाठी अनेक वेळा टप्प्याटप्प्यात निविदा प्रक्रिया होत असल्याने नवा रस्ता होईपर्यंत पुढील जुना रस्ता खराब होतो. नवा रस्ता झाल्यानंतर पुढील पावसाळ्यात न झालेल्या रस्त्यावर निकृष्ट काम झाल्याने पुन्हा खड्डेमय मार्ग निर्माण होत आहेत.
मलमपट्टी नको, दर्जेदार मार्ग हवा
सध्या देवगड-निपाणी राज्यमार्गावर नांदगावपासून फोंडाघाटपर्यंत रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे असून तात्पुरती केलेली मलमपट्टी सध्या संततधार पावसाने निकामी होत आहे. त्यामुळे हा मार्ग चिखलमय झाला आहे. यात या मार्गावर अवजड वाहतूक करणारी वाहने, तसेच प्रवासी वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असल्याने या राज्यमार्गावरील वाहनाचे भारमान पाहून त्या दर्जाचा मार्ग येत्या काळात होणे गरजेचे आहे.
रस्ता सिमेंट काँक्रिटचा व्हावा
देवगड ते नांदगाव व नांदगाव ते फोंडाघाटपासून कोल्हापूरपर्यंत जोडणारा हा मार्ग सिमेंट काँक्रिटचा व्हावा, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे. सध्यातरी पाऊस कमी झाल्यावर या मार्गावरील खड्डे डांबरीकरणाने अथवा पावसाळी डांबराने भरावेत, अशी मागणी होत आहे.