सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ४१ गावठाण क्षेत्रांचे आजपासून भूमापन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 ४१ गावठाण क्षेत्रांचे आजपासून भूमापन

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ४१ गावठाण क्षेत्रांचे आजपासून भूमापन

ओरोस: जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यात उद्यापासून (ता.४) ते १ जूनपर्यंत या दीर्घ कालावधीत गावठाण क्षेत्रांचा ड्रोनद्वारे भूमापन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील ४१ गावठाण क्षेत्रांचे भूमापन यावेळी करण्यात येणार आहे. त्या-त्या क्षेत्रातील नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख डॉ. विजय वीर यांनी केले आहे. यामध्ये १४ पुनर्वसित गावांचा समावेश आहे.

दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील आणखी १४ गावठाण लाभलेल्या गावांचा ड्रोनद्वारे भूमापन करण्यास सुरुवात केली होती. यासाठी ११ एप्रिलला जिल्ह्यात ड्रोन उपलब्ध झाला होता. दुसऱ्या टप्प्यात सावंतवाडी तालुक्यातील केगाद, नेणे, चौकुळ, दोडामार्ग तालुक्यातील घोडगेवाडी, मोर्ले, वझरे, कुडाळ तालुक्यातील अणाव, मालवण तालुक्यातील कट्टा, सडेवाडी, पिरावाडी, देवगड तालुक्यातील किंजवडे, तोरसोळे, लिंगडाळ, धालवली या गावांचा समावेश केला होता. या गावांमध्ये ड्रोन फ्लाईंगद्वारे मोजणी करण्यात येणार होती; परंतु तांत्रिक कारणाने ही मोजणी पूर्ण होऊ शकली नव्हती. त्यामुळे आता उद्यापासून (ता.४) पुन्हा मोजणी सुरू करण्यात येणार आहे. यासाठी शासनाने मालकीचा ड्रोन उपलब्ध करून दिला आहे.

सिंधुदुर्गात गावठाण जमीन वादातून मोजणीसाठी बरीच मागणी असते; मात्र इथल्या दुर्गम भौगोलिक स्थितीमुळे यात अडचणी येतात. यासाठी ड्रोनद्वारे भूमापनाची योजना येथे प्रभावी ठरत आहे. ड्रोनद्वारे गावठाण क्षेत्रातील भूमापन करण्याची योजना राज्याच्या ग्रामविकास विभाग, महसूल विभाग व भारतीय सर्व्हेक्षण विभागाने आणली आहे. याचा प्रारंभ कोल्हापुर, सांगली व सातारा या जिल्ह्यात सुरु झाला होता. त्याप्रमाणे तळकोकणात असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही अत्याधुनिक व पारदर्शी भूमापन पद्धत सुरू झाली आहे.

शासनाच्या स्वामित्व योजने अंतर्गत ड्रोनद्वारे हे भूमापन करण्यात येणार आहे. ज्या गावांमध्ये पूर्वीच नगर भूमापन झाले आहे. त्या गावांमध्ये तसेच पुनर्वसित गावात गावठाण असल्यास त्या गावांमध्ये ही ड्रोन फ्लाईंगद्वारे भूमोजणी करण्यात येणार आहे. मोजणी करताना चुना मार्किंग केली जाणार आहे. त्याचा नकाशा सर्व्हे ऑफ इंडियाला पाठविला जाणार आहे. याबाबतचे नियोजन जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे. कोणत्या दिवशी कोणत्या गावात भूमापन होणार हे त्याद्वारे निश्चित केले आहे.

Web Title: Sindhudurg Survey 41 Village Areas District Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top