सिंधुदुर्गात १ जूनपासून टोल धाड

दुचाकी, रिक्षाला सूट; मोटारींसाठी ९० रुपयांचा भुर्दंड
१ जूनपासून सिंधुदुर्गात टोलनाका सुरू होत आहे.
१ जूनपासून सिंधुदुर्गात टोलनाका सुरू होत आहे.sakal

कणकवली : झाराप ते खारेपाटणपर्यंतच्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्णत्‍वास आल्‍यावर १ जूनपासून सिंधुदुर्गात टोलनाका सुरू होत आहे. यात दुचाकी आणि तीनचाकी वाहनांना सवलत देण्यात आली. मात्र, छोट्या वाहनांच्या सिंगल एंट्रीसाठी ९० रुपये, तर एका दिवसात जा-ये करण्यासाठी १३५ रुपयांचा टोल द्यावा लागणार आहे.

ओसरगाव टोल नाक्‍यापासून २० किलोमीटर अंतरावरचे पत्ते नोंद असलेल्‍या वाहनांना या टोलनाक्‍यावर ५० टक्‍के सवलत असणार आहे. त्‍याचा फायदा कणकवली, कुडाळ आणि मालवण तालुक्‍यांतील काही गावांतील वाहनांना होईल; तर जिल्ह्यातील उर्वरित वाहनांना निश्‍चित केलेला टोल देणे भाग पडणार आहे. ओसरगाव येथील टोलनाक्‍याचे कंत्राट हैदराबाद येथील एमडी करिमुन्सा या कंपनीला देण्यात आले. या कंपनीकडून आज टोल नाक्‍यावर प्रात्‍यक्षिक सुरू करण्यात आले. मात्र, याचा अंदाज नसल्‍याने काही वाहनांच्या काचावर टोलची स्वयंचलित लाठी पडल्‍याने वाहनचालक आणि टोलवरील कर्मचाऱ्यांत जोरदार वादंग झाला होता. याखेरीज टोल कंपनीचे कर्मचारी गणवेशात नसल्याने टोल नाक्‍यावर संभ्रमावस्था होती. टोल नाक्‍यावर कर्मचाऱ्यांचे प्रात्‍यक्षिक सुरू असताना अनेक वाहनचालकांनी टोल सुरू झाल्‍याचे आदेश दाखवा, तुमचा गणवेश कुठे आहे? टोल वसुलीचा चार्ट का नाही? असे अनेकविध प्रश्‍न उपस्थित करून टोल नाक्‍यावरील कर्मचाऱ्यांना भंडावून सोडले होते.

ओसरगाव येथील टोलनाका कार्यान्वित होत असल्‍याचे वृत्त जाहीर झाल्‍यावर सिंधुदुर्गातील वाहनचालकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्‍या. सिंधुदुर्ग हद्दीत अजूनही चौपदरीकरणाचे काम अपूर्ण आहे. कणकवलीत गड नदी पूल ते गोपुरी आश्रमादरम्‍यान एकाच लेनवरून दुहेरी वाहतूक सुरू आहे. खचलेल्‍या उड्डाणपुलाची दुरुस्ती झालेली नाही. याखेरीज कुडाळ, खारेपाटण आदी भागांतही कामे अपूर्ण आहेत. यामुळे सातत्‍याने अपघात होत आहेत. ही कामे पूर्ण होण्याआधीच टोल वसुली सुरू होत असल्‍याने वाहनचालकांतून तीव्र नाराजी व्यक्‍त करण्यात आली. पुढील काही दिवसांत वाहनचालक आणि टोल नाक्‍यावरील कर्मचारी यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्‍यताही व्यक्‍त होत आहे.

टोल वसुलीसाठी आदेश जारी

राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १७ मेस ओसरगाव येथील टोल नाका सुरू करण्याबाबतचे आदेश काढले होते. त्‍यानुसार हैदराबाद येथील एमडी करिमुन्सा कंपनीचे कर्मचारी चार दिवसांपासून ओसरगाव टोल नाक्‍यावर कार्यरत झाले होते. या टोल वसुलीकरिता या कंपनीने ३५ कर्मचारी नियुक्‍त केले असून, यातील २५ जण स्थानिक आहेत.

आरसी बुकवरील पत्त्यावरून अंतर निश्‍चिती

टोल नाक्‍याच्या २० किलोमीटर परिसरातील खासगी वाहनांना टोलमधून ५० टक्‍के सवलत असणार आहे. त्‍यासाठी वाहनांच्या आरसी बुकवर असलेला पत्ता पाहून जीपीएस यंत्रणेद्वारे ते वाहन २० किलोमीटर परिघात येते की नाही, हे तपासले जाईल. त्‍यानंतरच या वाहनांना ५० टक्‍के सवलत दिली जाणार असल्‍याचेही टोल वसूल करणाऱ्या कंपनीकडून स्पष्‍ट करण्यात आले.

फास्टटॅग अनिवार्य

ज्‍या वाहनांना टोलमुक्‍ती नाही, त्‍या सर्व वाहनांना फास्ट टॅग काढणे अनिवार्य करण्यात आले आहे. तशी माहिती पत्रकातून सर्व वाहनांना देत असल्‍याची माहिती टोलवसुली कंपनीकडून देण्यात आली. ज्‍या वाहनांना फास्ट टॅग नसेल, त्‍या वाहनांकडून दुप्पट टोलवसुली होणार असल्‍याचेही कंपनीकडून स्पष्‍ट करण्यात आले.

या वाहनांना टोल नाही

ओसरगाव टोल नाक्‍यावर टोलवसुली करीत असताना या टोलमधून दुचाकी, तीनचाकी, ट्रॅक्टर, ट्रॉली आणि रुग्णवाहिका या वाहनांना टोलमुक्‍ती असल्‍याची माहिती कंपनीकडून आज देण्यात आली. टोल नाक्‍यापासून २० किलोमीटर परिघातील वाहनांना महिन्याचा पास दिला जाणार आहे. ३१५ रुपये किमतीचा हा पास असेल, तसेच कितीही वेळा या पासच्या माध्यमातून जा-ये करता येणार असल्‍याचे कंपनीकडून स्पष्‍ट करण्यात आले.

अशी होणार टोलवसुली

  • वाहन प्रकार * सिंगल एंट्री * डबल एंट्री * स्थानिकांसाठी सवलत दर *

  • कार, जीप * ९० * १३५ * ४५ *

  • मिनीबस *१४५ * २२० * ७५*

  • ट्रक/बस *३०५ * ४६० * १५५*

  • तीन ॲक्‍सल वाहने *३३५ * ५००*१६५ *

  • चार ते सहा ॲक्‍सल वाहने *४८० *७२०*२४० *

  • अवजड वाहने *५८५ *८७५* २९०*

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com