corona vaccination
corona vaccinationEsakal

आम्हाला कुणाचा राजकीय वरदहस्त नाही; कुणी लस देता का लस?

सर्वसामान्यांचा प्रश्‍न; कोरोना प्रतिबंधात्मक लस वितरणात गोंधळ

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : ‘‘होय, आम्हाला कुणाचा राजकीय वरदहस्त नाही आणि कुणी वरिष्ठ अधिकारीही आम्हाला ओळखत नाही; पण आम्ही देखील मतदानाचा हक्क असलेली माणसंच आहोत. आम्हाला देखील कोरोनाचा धोका आहे. त्यामुळे आम्हा गोरगरीब, भोळाभाबड्यांना कुणी लस देता का लस?’’ अशीच विचारणा आता सर्वसामान्य करत आहेत. लसीकरणात वाढलेला राजकीय हस्तक्षेप आणि त्याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष यामुळे लसीकरण वितरणात गोंधळ आणि संभ्रमाची स्थिती आहे.

कोरोनाची पहिली लाट ओसरली आणि अवघ्या काही महिन्यांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग झपाट्याने वाढु लागला. पहिल्या लाटेपेक्षा कितीतरी पटीने दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण कित्येक पटीने वाढले. शहरीभागाप्रमाणेच दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणुने ग्रामीण भागात शिरकाव केला. अनेक गावांनी पहिल्या लाटेला गाव सीमेबाहेर रोखले होते; परंतु दुसऱ्या लाटेत गावागावात रूग्ण सापडले. वैभववाडी तालुक्यातील दिगशी सारख्या पावणे चारशे लोकसंख्या असलेल्या लहान गावातील १२५ लोक कोरोनाबाधीत झाले. अशी कित्येक गावे बाधीत झाली. मृत्यूचे प्रमाण वाढले त्यामुळे सुरूवातीला लसीकरण करण्यापासून लांब पळणारे लोक लसीकरणासाठी केंद्रांवर गर्दी करू लागले. त्यातच सुरूवातीला फक्त ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण सुरू होते; परंतु त्यानंतर शहरात, गावांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू झाली. त्यातुनच लसीकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढत गेले.

भविष्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन राजकीय पदाधिकारी लसीकरणाच्या एक दोन दिवस अगोदर आणि लसीकरणादिवशी सकाळपासुन डोस संपल्याची खात्री होईपर्यत लसीकरण केंद्रावर ठाण मांडुन बसत असल्याचे दिसुन येत आहे. लसीकरणासाठी इतकी झुंबड उडत आहे कि अनेक लोकांना लसीकरण न होताच माघारी परतावे लागत आहे. काही ठिकाणी तर पहाटे पाच वाजताच लोक रांगा लावत आहेत; परंतु अनेकदा पाच वाजता रांग लावुन देखील डोस मिळत नाही; मात्र त्याच ठिकाणी रेंगाळत असलेले राजकीय पदाधिकारी आपआपल्या नातेवाईकांना डोस उपलब्ध करून देतात. हे वास्तव आता लपुन राहीलेले नाही. ज्या लोकांना राजकीय वरदहस्त नाही. कुणी अधिकारी ओळखत नाही असे अनेक लोक सध्या आपल्याला लस कधी मिळणार या प्रतिक्षेत आहे. त्या लोकांमधुन लसीकरण केंद्रावर उमटणाऱ्या प्रतिक्रिया खुपच बोलक्या आणि वास्तवाशी निगडीत आहेत. आम्हाला कुणी राजकीय वरदहस्त नाही, आमचा कुणी अधिकारी सेवेत नाही. त्यामुळे आम्हाला लस कशी मिळेल. त्यामुळे तालुक्यात आम्हा गरीब भोळाभाबड्यांना कोरोना प्रतिबंधक लस मिळेल का लस अशी विचारणा केली जात आहे.

 corona vaccination
सिंधुदुर्गात जिल्हाधिकाऱ्यांचे नवे आदेश; असे आहेत नियम
Summary

लसीकरणासाठी सकाळी पाच वाजल्यापासून नागरिक केंद्रांवर हजेरी लावतात.

जोपर्यंत ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण सुरू होते. तोपर्यंत राजकीय हस्तक्षेप नव्हता. त्यानंतर अन्य ठिकाणी केंद्रे सुरू झाल्यानंतर हस्तक्षेप वाढल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यादृष्टीने टोकण पद्धतीचा अवलंब करण्यास सुरूवात केली आहे. भविष्यात हीच पद्धत सर्वत्र राबविण्यात येणार आहे.

- डॉ. अनिल पवार, तालुका आरोग्य अधिकारी, वैभववाडी.

पहाटे पाचपासून केंद्रावर

लसीकरणासाठी सकाळी पाच वाजल्यापासून नागरिक केंद्रांवर हजेरी लावतात. शाळेचे कर्मचारी सात वाजता शाळेत येतात. त्यानंतर वर्गखोल्यांमध्ये प्रवेश मिळतो. तोपर्यंत लोकांना व्हरांड्यातच उभे राहावे लागते. सकाळी साडेआठ वाजता आरोग्य विभागाचे कर्मचारी येतात आणि नऊ वाजता लसीकरणाला प्रत्यक्षात सुरूवात होते. ही वस्तुस्थिती आहे.

काय आहेत मागण्या?

*लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचारी वगळता इतरांना प्रवेशबंदीची करा

* टोकण पद्धतीचा अवलंब करावा

* लसीकरणासाठी येणाऱ्यांच्या बैठकीची व्यवस्था करावी

* प्रशासनातील वरिष्ठांनी केंद्रांचा अचानक आढावा घ्यावा

* लसीकरण डोसचा कोटा वाढवुन द्यावा

तालुक्यातील लसीकरण

४५ वर्षांवरील

पहिला डोस......८४५०

दुसरा डोस........२३४७

१८ वर्षांवरील

पहिला डोस........३१९५

दुसरा डोस........९३७

एकुण........१४९२९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com