सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी कोणाची वर्णी ?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 डिसेंबर 2019

अध्यक्षपदासाठी कॉंग्रेसचे गटनेते संजय आंग्रे यांनी कॉंग्रेस तिकीटावर निवडून आलेल्या 25 सदस्यांना व्हिप बजावला आहे. तर सत्ताधारी भाजपचे गटनेते रणजीत देसाई यांनी आपल्या गटाच्या 24 सदस्यांना व्हीप बजावला आहे.

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक उद्या (ता.30) होणार आहे. यासाठी दुपारी 3 वाजता जिल्हा परिषदेच्या खास सभेचे आयोजन केले आहे. अध्यक्षपदासाठी समिधा नाईक व उन्नती धुरी इच्छुक आहेत; मात्र विद्यमान अध्यक्षा संजना सावंत यांनाच पुन्हा संधी देवून त्यांना कायम करण्यात येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अध्यक्षपदासाठी कॉंग्रेसचे गटनेते संजय आंग्रे यांनी कॉंग्रेस तिकीटावर निवडून आलेल्या 25 सदस्यांना व्हिप बजावला आहे. तर सत्ताधारी भाजपचे गटनेते रणजीत देसाई यांनी आपल्या गटाच्या 24 सदस्यांना व्हीप बजावला आहे. त्यामुळे व्हीप कोण पाळणार? कोण धुडकावणार ? निवडीवेळी स्पष्ट होणार आहे. 
पहिली अडीच वर्षे जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव होते. त्याची मुदत 21 सप्टेंबरला संपली होती; परंतु तत्कालीन राज्य सरकारने विधानसभा निवडणुका असल्याने चार महीने ही मुदत वाढवत 21 जानेवारी पर्यंत केली होती; परंतु अलीकडेच राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत झाली. जिल्हाधिकारी डॉ पांढरपट्टे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडीसाठी जिल्हा परिषद सदस्यांची खास सभा 30 डिसेंबरला दुपारी 3 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित केली आहे. यावेळी बिनविरोध अथवा मतदानाने ही निवड प्रक्रिया होईल. 

हेही वाचा - भाजपच्या हातून सत्ता हस्तगत करण्यासाठी राष्ट्रवादीचा येथे  ऍक्‍शन प्लॅन 
 

हे तीन सदस्य वगळता...

सत्ताधारी खासदार नारायण राणे गटाचे 27 सदस्य कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडून आले आहेत. त्यांच्या गटात राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेल्या डॉ. अनिशा दळवी यांचा समावेश आहे. एकूण 28 सदस्य या गटाचे होते. विधानसभा निवडणुकीवेळी या गटाचे गटनेते सतीश सावंत यांनी जिल्हा परिषद सदस्यपदाचा राजीनामा देत शिवसेनेकडून विधानसभा लढविली. यावेळी संजय आंग्रे, स्वरूपा विखाळे, राजलक्ष्मी डिचवलकर यांनी साथ केली. या निवडणुकीनंतर सत्ताधारी गटाने रणजित देसाई यांची गटनेतेपदी नव्याने नियुक्ती केली. यावेळी झालेल्या बैठकीला हे तीन सदस्य सोडले तर सर्वांची उपस्थिती होती. याचवेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी नवीन गटनेता निवडीसाठी व्हीप बजावत बैठक बोलावली होती. या बैठकीला हे तीन सदस्य वगळता सर्वच सदस्यांनी अनुपस्थिती दर्शविली. या तीन सदस्यांतून संजय आंग्रे यांची कॉंग्रेसने गटनेते म्हणून निवड केली. 

कोण व्हीप धुडकावणार ?

त्यानंतर प्रथमच जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक होत आहे. या अध्यक्ष निवडीसाठी कॉंग्रेस गटनेते संजय आंग्रे यांनी आपल्या फोंडाघाट येथील कार्यालयात बैठक बोलाविली होती. यासाठी व्हीप बजावला होता. यात सत्ताधारी गटाचे गटनेते रणजीत देसाई, विद्यमान अध्यक्षा संजना सावंत यांच्यासह 25 सदस्यांची नावे आहेत. त्यांना नोटिसही बजावली आहे; मात्र मिळालेल्या माहितीनुसार स्वरूपा विखाळे, राजलक्ष्मी डिचवलकर यांच्या व्यतिरिक्त अन्य कोण सदस्य या बैठकीला गेले नाहीत. तर सत्ताधारी गटाचे गटनेते रणजीत देसाई यांनीही 27 जणांना व्हिप बजावला आहे. यात कॉंग्रेसचे गटनेते संजय आंग्रे यांच्यासह सौ डिचवलकर, सौ विखाळे यांचाही समावेश आहे. यात कोणते सदस्य कोणत्या गतनेत्याचा व्हिप मानतात? कोण व्हीप धुडकावते? हे प्रत्यक्ष निवडीवेळी स्पष्ट होईल. 

हेही वाचा - PHOTOS : सुखद ! अन् 118 कासवांची पिल्ले सुखरूप समुद्रात 

आमच्याकडे 31 सदस्य - देसाई 

सत्ताधारी गटाचे गटनेते रणजीत देसाई यांच्या कॉंग्रेसने बजावालेल्या व्हिप बाबत विचारले असता आमचा स्वतंत्र गट असून त्याचा गटनेता आपण आहोत. कॉंग्रेसचा व्हिप मानन्याचा सबंधच नाही. गटनेता म्हणून सर्व 27 सदस्यांना व्हिप बजावला आहे. यातील तीन सदस्य पूर्वीच फुटले आहेत. त्यामुळे यातील 24 सदस्य आमच्याकडे आहेत. भाजपचे पहिले निवडून आलेले सहा व नव्याने निवडून आलेले एक, असे भाजपचे सात सदस्य सोबत असल्याने एकूण 31 सदस्य आमचे आहेत. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष आमच्या गटाचाच निवडून येणार असल्याचा दावा देसाई यांनी केला. 

राजेंद्र म्हापसेकर उपाध्यक्ष? 

अध्यक्ष पदासाठी विद्यमान अध्यक्षा संजना सावंत यांचेच नाव आघाडीवर असताना उपाध्यक्ष म्हणून तुम्ही कायम राहण्यास इच्छुक आहात का ? असे रणजीत देसाई यांना विचारले असता त्यांनी नाही म्हणून सांगितले. मला तब्येतीच्या कारणामुळे यापुढे हे पद सांभाळणे शक्‍य नसल्याचे आपण खासदार नारायण राणे यांना भेटून सांगितले आहे, असे सांगितले. त्यामुळे नवीन उपाध्यक्ष निवड होणार हे निश्‍चित. भाजपचे मुळ सदस्य हे शिवसेनेच्या नोंदणीकृत गटात नाहीत. त्यामुळे हे सदस्य सत्ताधारी गटाला पाठिंबा देणार आहेत. तालुका सभापती, उपसभापती निवडीवेळी मुळ भाजप व राणे समर्थक असा समन्वय साधण्यात आला आहे. त्यामुळे उपाध्यक्षपदी मुळ भाजप सदस्याला संधी मिळण्याची शक्‍यता आहे. भाजप सदस्यात दोडामार्ग मधील राजेंद्र म्हापसेकर जेष्ठ सदस्य असल्याने त्यांना ही संधी प्राप्त होवू शकते. 

 सौ डिचवलकर कॉंग्रेसच्या उमेदवार ? 

कॉंग्रेस गटनेते संजय आंग्रे यांनी व्हीप बजावत कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. याचा अर्थ कॉंग्रेस अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक लढविणार हे निश्‍चित. अध्यक्षपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव आहे. यासाठी त्यांच्याकडे राजलक्ष्मी डिचवलकर या एकमेव उमेदवार आहेत. त्यामुळे त्याच उमेदवार असण्याची शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg ZP President Election Marathi News