esakal | Sindhudurga : संततधारेमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy Rain

Sindhudurga : संततधारेमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी : जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला. सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले तालुक्यांतील काही भागाला पावसाने झोडपून काढले. सततच्या पावसामुळे परिपक्व स्थितीतील भात कापणी रखडली. आता भात जमिनीवर कोसळू लागल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, आणखी दोन ते तीन दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

चार दिवसांपासून विविध भागांत विजांच्या कडकडाटांसह जोरदार सरी कोसळत आहे. मंगळवारी (ता.५) सायकांळीदेखील अनेक भागाला पावसाने झोडपून काढले. रात्री उशिरापर्यंत सरीवर सरी होत्या. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. चार दिवस सकाळी कडक ऊन आणि सायंकाळी विजांच्या कडकडाटांसह पाऊस असे चित्र होते, परंतु आज दुपारी साडेबारा वाजताच

पावसाने हजेरी लावली. सह्याद्री पट्ट्यात विजांच्या कडकडाटांसह पाऊस सुरू झाला. सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले, मालवण, वैभववाडी, कणकवली तालुक्याच्या काही भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अनेक ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता.

जिल्ह्यात सुमारे ३० ते ३५ टक्के भातपीक परिपक्व स्थितीत आहे. सात ते आठ दिवसांपूर्वी कापणी होणे आवश्यक होते; परंतु पावसामुळे कापणी रखडली. त्यातच पावसाचा जोर वाढत असल्यामुळे अनेक भागांतील भातशेती जमिनीवर कोसळत आहे. हवामान खात्याने १० ऑक्टोंबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तविल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. जिल्ह्यात काल सर्वाधिक पाऊस दोडामार्ग तालुक्यात ४१ तर कुडाळ तालुक्यात ४० मिलिमीटर झाला.

loading image
go to top