सिंधुदुर्गाच्या बुरुजांना झाडांनी वेढले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

मालवण - येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गच्या तट, बुरुजांना झाडांच्या मुळांनी वेढा घातला आहे. तट, बुरुजांच्या सुरक्षिततेकडे राज्य शासन तसेच पुरातत्त्व विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने शिवप्रेमींसह  पर्यटकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. झाडाच्या मुळांनी तट, बुरुज पोखरले जात आहेत. शासनाने आपली उदासीनता दूर ठेवत किल्ला सुस्थितीत राहावा व शिवकालीन ऐतिहासिक अनमोल ठेवा जतन होण्यासाठी तट, बुरुजावर वाढलेली झाडे व मुळे समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे. 

येथील कुरटे बेटावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी साकारलेल्या सागरी राजधानी किल्ले सिंधुदुर्गला सध्या मोठ्या प्रमाणात झाडाच्या मुळांनी वेढा घातल्याचे चित्र दिसून येत आहे. या झाडांबरोबरच त्यांच्या मुळांचा समूळ नाश होण्यासाठी शासन किंवा पुरातत्त्व विभागाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना राबविण्यात आलेल्या नाहीत. परिणामी या किल्ल्याचे तट, बुरुज यांना या झाडाच्या मुळांमुळे धोका निर्माण झाला आहे. तट, बुरुज पाळा-मुळांमुळे कमकुवत होत आहेत. ही झाडे अशीच वर्षानुवर्षे वाढत गेली तर किल्ले सिंधुदुर्गचे शिवकालीन वैभव नष्ट होण्याची भीती आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा राज्य शासनाने पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला. त्यात सिंधुदुर्ग किल्ला हा इतिहासाच्या जोडीने पर्यटकांचे प्रेरणास्रोत बनला आहे. देश-विदेशातील पर्यटक शिवप्रेमी व किल्लेप्रेमी याच्या पसंतीस उतरणाऱ्या या किल्ले सिंधुदुर्गाला पर्यटन हंगामात लाखो पर्यटक भेट देतात, तर हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे; मात्र किल्ले सिंधुदुर्गाच्या देखभाल दुरुस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. 

उपायांची गरज
किल्ले सिंधुदुर्गावर भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या किल्ल्याची देखभाल दुरुस्ती व संवर्धनासाठी शासन, पुरातत्त्व विभाग, सामाजिक संस्था, किल्लाप्रेमी यांनी एकत्रित येत प्रयत्न करावेत, तरच संपूर्ण जगाला भारताचा देदीप्यमान इतिहास सांगणारा किल्ला, भारताचा इतिहास व स्वाभिमान सांगण्यासाठी अविरत उभा राहील आणि महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा किल्ले सिंधुदुर्ग दिमाखात उजळून निघेल.

Web Title: Sindhudurga has surrounded the tower trees