माकडतापाचा विळखा घट्ट 

प्रभाकर धुरी
सोमवार, 30 जानेवारी 2017

तीव्रता वाढली : माकडांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले; कुडासे, बांबर्डे, नेतर्डे, सटमटवाडीतही लक्षणे 

तीव्रता वाढली : माकडांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले; कुडासे, बांबर्डे, नेतर्डे, सटमटवाडीतही लक्षणे 

दोडामार्ग : कर्नाटक, केरळ, तामीळनाडू व गोव्यापाठोपाठ महाराष्ट्रात पोचलेल्या माकडतापाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सात जणांचा बळी घेतला. गेल्यावर्षी माकडतापाचा उपद्रव असलेल्या गावांच्या यादीत नव्या गावांची भर पडली आहे. माकडतापाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत माकडांच्या मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. एकूणच काय यावर्षी माकडतापाने नवी गावे आपल्या विळख्यात घेतली आहेत. किरकोळ असणारे माकड मृत्यूचे प्रमाण भीती व दहशत वाटण्याइतके वाढले आहे. त्यामुळे माकडतापाचे दुसरे वर्ष धोक्‍याची घंटा आहे, असेच म्हणावे लागेल. 

काय आहे माकडताप? 
माकडताप हे केएफडी आजाराचे स्थानिक अथवा प्रचलित नाव. 1957 मध्ये कर्नाटकमधील शिमोगाजवळच्या जंगलात माकडांचा मृत्यू मोठ्या प्रमाणावर होत होता. शिवाय तापाने आजारी पडण्याचे, रुग्ण दगावण्याचे प्रमाणही वाढले. त्यामुळे त्यावर संशोधन करण्यात आले, तेव्हा माकडांच्या अंगावर गोचीड व पिसवा आढळल्या. त्यांच्या रक्तात नवे विषाणूही आढळले. शिमोगाजवळच्या क्‍यासनूर जंगलात तो विषाणू व आजार आढळल्याने त्या आजाराचे क्‍यासनूर फॉरेस्ट डिसीज म्हणजेच केएफडी असे नाव ठेवण्यात आले. केएफडी पॉझिटिव्ह माकड व पिसवा यांचा एकमेकांशी संबंध येतो. अशा केएफडी पॉझिटिव्ह गोचीड किंवा पिसवा माणसाला चावल्या, केएफडी पॉझिटिव्ह रक्ताचा माणसाच्या रक्ताशी संबंध आला, की माणूस केएफडी पॉझिटिव्ह होतो. ज्याला आपण माकडतापाचा रुग्ण म्हणतो. साधारणपणे केएफडी पॉझिटिव्ह माकड मृत्यू पावल्यावर गोचीड त्या माकडाचे शरीर सोडून जातात. या वेळेला त्या अन्य प्राणी किंवा माणसाच्या शरीरावर गेल्या आणि चावल्या तर तो प्राणी किंवा व्यक्ती केएफडी पॉझिटिव्ह बनतो. ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे, अशांमध्ये हा आजार बळावतो; मात्र हा आजार संसर्गजन्य नाही. 

माकडतापाची लक्षणे 
माकडतापाच्या रुग्णाला साधारणपणे दोन टप्प्यांत ताप येतो. पहिल्यांदा ताप येऊन गेला, की मध्ये काही दिवसांचा खंड पडतो. रुग्ण बरा झाला असा वाटतो आणि पुन्हा काही दिवसांनी ताप येतो. त्याचबरोबर उलट्या होणे, रक्तदाब कमी होणे, शौचातून रक्त पडणे अशी लक्षणे दिसतात. सेकंड फेजची लक्षणे धोकादायक असतात. प्लेटलेट्‌स कमी होणे, मेंदू, किडनीमध्ये रक्तस्राव होणे, शौचातून रक्त पडणे अशी "सेकंड फेज'ची लक्षणे असतात. तथापि, योग्य उपचाराने रुग्ण बरा होऊ शकतो. 

मृत्यूदर पाच टक्के 
केएफडी अर्थात माकडतापाच्या रुग्णांमधील मृत्यूदर साधारणपणे पाच टक्के इतका आहे. गतवर्षी आपल्याकडील 850 रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासण्यात आले होते. त्यांतील 125 नमुने पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांतील 7 जणांचा मृत्यू झाला होता. 

माकडांचा मृत्यू धोक्‍याची घंटा 
गेल्यावर्षी 28 माकडांचा मृत्यू झाला होता. त्या सर्वांचेच शवविच्छेदन झाले नसले तरी एक माकड तपासणीअंती केएफडी पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. शिवाय आरोग्य विभागाने जमा केलेल्या गोचीडमधील एक गोचीड समूह केएफडी पॉझिटिव्ह आढळला होता. साधारणपणे ज्या भागात माकडांचा मृत्यू होतो त्या भागात केएफडीचा धोका जास्त असतो. 

नव्या गावांची भर 
गतवर्षी केएफडी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या व मृत्यू पावलेल्यांची संख्या पाहता साटेली भेडशी, तळकट व मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतील चौदा गावे जोखीमग्रस्त घोषित करण्यात आली होती. त्या गावामध्ये लसीकरणही झाले; मात्र यावर्षी त्या गावांच्या यादीत नव्या गावांची भर पडली आहे. यावर्षी कुडासे, बांबर्डे, नेतर्डे, सटमटवाडी या चार गावांची भर पडली आहे. 

"आरोग्य'कडून लसीकरण 
पहिल्या व दुसऱ्या टप्प्याचे लसीकरण आरोग्य विभागाने जवळजवळ पूर्ण केले आहे. तालुक्‍यात 2963 जणांना लसीकरण करण्यात आले आहे. जुलै-ऑगस्टच्या दरम्यान तिसरा टप्पा पूर्ण करण्यात येईल. बांदा परिसरातही लसीकरणाला सुरवात झाली आहे. सुमारे 130 जणांना लस देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 5000 डोस प्राप्त झाले आहेत. आणखी अडीच हजार डोस लवकरच प्राप्त होणार आहेत. लसीकरणातून 6 ते 15 वयोगट वगळला आहे. 15 ते 65 वयोगटांतील व्यक्तींना लस देण्यात आली आहे. 

लसीकरणाची टक्केवारी समाधानकारक 
लस त्वचेखाली देण्यात येते. लस दिल्यानंतर जळजळणे, पू येणे असे प्रकार घडतात. त्यामुळे केरळ वगळता कर्नाटक, गोवा, तामीळनाडूमध्ये फारसा प्रतिसाद मिळत नाही; पण सिंधुदुर्गातील लसीकरणाला मात्र लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. तालुक्‍यात पहिल्या टप्प्यात 14 गावांतील निवडलेल्या लाभार्थ्यांमधील नव्वद टक्के लाभार्थ्यांनी लस घेतली. दुसऱ्या टप्प्यात त्या 90 टक्‍क्‍यांमधील 85 ते 87 टक्के लोकांनी लस घेतली. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात लसीकरणाला खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आरोग्य विभाग सुखावला आहे. 2983 पैकी 2700 लोकांनी लस घेतली. त्यांतील केवळ 27 लोकांनाच थोडीशी जळजळ व किरकोळ साईड इफेक्‍टस जाणवले. 

लसीकरणाचे "शेड्यूल' 
केएफडीवरील लस केवळ एक वर्षच राहते. त्यामुळे गरज असतानाच ती मागवून घ्यावी लागते. कर्नाटकातील शिमोगामध्येच ती तयार होते. एका वर्षात तीन डोस दिले जातात. साधारणपणे पाच वर्षे ती लस घ्यावी लागते. पहिल्यांदा ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात पहिला डोस, त्यानंतर एका महिन्याने दुसरा डोस, तर 6 ते 9 महिन्यांनी तिसरा डोस दिला जातो. त्यानंतर दरवर्षी एक बुस्टर डोस असे पाच वर्षे लसीकरणाचे डोस दिले जातात. 

काय काळजी घ्यावी? 
आपला परिसर, घर, गोठे स्वच्छ ठेवावेत. जंगल परिसरात, गायी गुरे यांच्यामध्ये वावरणाऱ्यांना केएफडीचा धोका अधिक असतो. आपल्या घराच्या आजूबाजूला मेलॅयिऑन पावडरची फवारणी करावी. जंगलात जाताना अंगभर कपडे वापरावेत. चेहरा, हात, पाय यांना डीएमपी ऑईल लावावे. त्याचा प्रभाव चार तास राहतो व गोचीडींपासून संरक्षण होते. घरी आल्यावर गरम पाण्याने हात-पाय धुवावेत, गरम अन्न खावे. आपली प्रतिकार क्षमता चांगली राहील असे पाहावे. 

सावंतवाडी, दोडामार्गात विशेष कक्ष 
मणिपाल येथील संशोधन संस्थेची दोन वैद्यकीय पथके केएफडीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्यावर्षीपासून दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय व सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात तैनात आहेत. तापसरीच्या रुग्णांच्या रक्ताची तेथे तपासणी होते. तेथील खास कक्षात केवळ केएफडीच नव्हे, तर डेंगी, चिकनगुनिया, लेप्लोस्पायरोसीस, स्कूब टायफससारख्या आजारांच्याही तपासण्या मोफत केल्या जातात. शिवाय तापसरीच्या रुग्णांची तपासणी करून तापाचे मूळ कारण शोधण्यासाठी संशोधनही केले जाते. रुग्णालयातून रुग्णाला सोडल्यानंतरही 2 महिने त्या रुग्णाचा फॉलोअप घेतला जातो. फॉलोअपसाठी आलेल्या रुग्णांना प्रवास खर्च देण्याबरोबरच त्या कक्षामध्ये खासगी रुग्णालयातही होणार नाहीत अशा कल्चर सेन्सिटिव्हिटीसारख्या दुर्मिळ व महागड्या चाचण्याही केल्या जातात. ज्यामुळे तापसरीच्या अचूक निदानास मदत होते. तापसरीच्या रुग्णांनी त्यांचाही लाभ घेण्याची गरज आहे. 

शीघ्र कृती दल कार्यरत होणे आवश्‍यक 
बांदा परिसरातील दोन गावांमध्ये शंभरहून अधिक माकडांचा मृत्यू झालाय. केएफडी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळे भविष्यात रुग्ण दगावण्याची भीती आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची नेमकी माहिती मिळत नाही. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी विशेष पथकाची गरज होती. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी शीघ्र कृती दल स्थापन करण्याची सूचना केली. ती प्रत्यक्षात येऊन केएफडीचा प्रसार व धोका वाढू नये यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. 
 

Web Title: Sindhudurga monkey fever