हवामान बदलाचे सिंधुदुर्गावर नवे संकट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

कणकवली - जागतिक तापमान वाढीचे दुष्परिणाम जिल्ह्यातही तीव्रतेने जाणवू लागले आहेत. राज्यात उष्णतेचे तीन बळी गेले आहेत. कोकणातील रायगड जिल्ह्यात सर्वाधिक तापमान नोंदविले गेले आहे. सिंधुदुर्गातही या हवामान बदलाचे नवे संकट उभे राहिले असून कडाक्‍याच्या थंडीनंतर पूर्वेकडील वाऱ्यांमुळे उष्णता वाढली आहे; मात्र गेले चार दिवस वातावरणाने अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. या बदलाचा परिणाम थेट कोकणी मेव्यावर होत असून फळांना किडीचा आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. 

राज्यभरात मार्च महिन्यातच उष्णतेचा कहर जाणवू लागला आहे. गतवर्षी एप्रिलमध्ये सिंधुदुर्गाचा पारा 40 अंशांवर पोचला होता. यंदा समाधानकारक पाऊस, तसेच कडाक्‍याच्या थंडीमुळे पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू निसर्ग आणि मानवाला सहाय्य करणारे ठरले; मात्र महाशिवरात्रीपासून पूर्वेकडील वाऱ्यांच्या वेगाने उष्णतेत कमालीची वाढ झाली होती. त्या काळात दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा 4 अंश सेल्सिअसने वाढले होते. याउलट रात्रीच्या वेळी तापमानात कमालीची घट होऊन बोचऱ्या थंडीचा अनुभव आला. याचा काही प्रमाणात फळ पिकावर परिणाम झाला. हापूस आंब्याचे उत्पादन लांबले. आता मात्र चैत्र मासाच्या प्रारंभाला वातावरणातील बदलाची गती अनपेक्षितरीत्या असून ढगाळ वातावरणामुळे कोकणी मेव्याला दुष्परिणामाला सामोरे जावे लागणार आहे. सावंतवाडी, दोडामार्ग या भागांत माकड तापाच्या विषाणूजन्य साथीने हातपाय पसरले आहेत. वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य साथीच्या रोगांचा प्रभाव या क्षेत्रात वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

गेल्या चार वर्षांनंतर नियमितपणे पावसाला सुरवात झाल्याने गेल्यावर्षीचा पावसाळा समाधानकारक गेला. यंदा मात्र वातावरणातील बदलामुळे पावसाचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. चैत्राबरोबरच पुढील वैशाख वणवा अजूनही आला नसताना वातावरणातील होणारा हा बदल येत्या काळात अजून घातक ठरू शकतो. 

सिंधुदुर्गात गेले काही दिवस वातावरणात कमालीचा बदल झाला असून ढगाळ वातावरणामुळे फळ पिकावर किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. विशेषतः आंब्याला करपा रोग होण्याची शक्‍यता आहे. 
- डॉ. राजेश मुळे, हवामान विभाग, मुळदे. 
 
दृष्टिक्षेपात 
* डिसेंबर ते फेब्रुवारी कडक थंडी 
* मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव 
* दिवसा पारा वाढलेला, रात्री तापमानात घसरण 
* 26 मार्चपासून ढगाळ वातावरण 
* सध्या तापमान 33 ते 35 अंशांदरम्यान 

Web Title: Sindhudurga new crisis on climate change