जिल्हा नियोजनची जुलैमध्ये निवडणूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

सिंधुदुर्गनगरी - जिल्हा नियोजन मंडळाची निवडणूक जुलै अखेर घेण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन कार्यालयाने शासनाकडे पाठविला आहे. त्यादृष्टीने मतदार याद्या अद्यावत करणे यासह पूर्वतयारी नियोजन कार्यालयाने सुरू केली आहे.

सिंधुदुर्गनगरी - जिल्हा नियोजन मंडळाची निवडणूक जुलै अखेर घेण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन कार्यालयाने शासनाकडे पाठविला आहे. त्यादृष्टीने मतदार याद्या अद्यावत करणे यासह पूर्वतयारी नियोजन कार्यालयाने सुरू केली आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीतून निवडून आलेल्या सदस्यामधून २१ सदस्य तर पालिकामधून ३ सदस्य अशा एकूण २४ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या निवडणुकीबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन कार्यालयाने राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. शासनाची मंजुरी मिळताच जुलै अखेर या निवडणूका होण्याची दाट शक्‍यता आहे. या निवडणुकीसाठीची तयारी जिल्हा नियोजन कार्यालयाने सुरु केली आहे. या पार्श्‍वभूमीवर मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

जिल्हा नियोजन मंडळाची निवडणूक एकूण २४ जागांसाठी होणार असून ग्रामीण आणि शहरी विभागातून लोकनियुक्त प्रतिनिधीमधून हे सदस्य जिल्हा नियोजन मंडळावर पाठविले जाणार आहेत. 
 

एकूण २४ जागांसाठी १४९ मतदार मतदान करणार आहेत. जिल्हा परिषद सदस्यामधून २१ सदस्य निवडून द्यावे लागणार आहेत. त्यामध्ये विविध प्रवर्गाला स्थान द्याव लागणार आहे. महिला प्रवर्गासाठी जागा राखीव असणार आहेत. या २१ जागांसाठी जिल्हा परिषदेच्या ५० सदस्यांना मतदान करावे लागणार आहे.

शहरी भागातून ३ जागा निवडून द्याव्या लागणार आहेत. यामध्ये जिल्ह्यातील वेंगुर्ले, सावंतवाडी आणि मालवण या तीन नगरपरिषदांमधून प्रत्येकी एक सदस्य निवडण्यात येणार आहे. यासाठी एकूण ५४ मतदार म्हणजेच तीनही पालिकेचे नगरसेवक मतदान करणार आहेत. तसेच जिल्ह्यातील दोडामार्ग, कुडाळ, देवगड, कणकवली, वैभववाडी या नगरपंचायतीमधील एकूण ८५ नगरसेवक मतदान करणार आहेत.

या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून जिल्हा नियोजनकडील वार्षिक आराखड्यातील सुमारे दीडशे कोटी निधी खर्चाचे नियोजन करणाऱ्या या समितीवर निवडून येण्यासाठी अनेकजण इच्छुक असून ही निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक होणार? याची चर्चा रंगू लागली आहे. जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसचे सदस्य सर्वाधिक असलेतरी नगरपरिषद व नगरपंचायतीमध्ये विरोधकांचे वर्चस्व लक्षात घेता ही निवडणूक अतिशय चुरशीची होईल, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: sindhudurgnagari konkan news district management election