शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी साकडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यातील आरोग्य असुविधेचा प्रश्‍न कायमचा निकाली काढण्यासाठी सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारावे, असे साकडे आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना घालण्यात आले.

जिल्ह्यात या मागणीसाठी जनमताचा रेटा तयार करण्याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समिती स्थापन झाली असून, त्यांच्यामार्फतच हे निवेदन दिले गेले. ‘सकाळ’ने ही संकल्पना मांडली होती. याचे जिल्हाभरातून स्वागत होत आहे.

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यातील आरोग्य असुविधेचा प्रश्‍न कायमचा निकाली काढण्यासाठी सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारावे, असे साकडे आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना घालण्यात आले.

जिल्ह्यात या मागणीसाठी जनमताचा रेटा तयार करण्याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समिती स्थापन झाली असून, त्यांच्यामार्फतच हे निवेदन दिले गेले. ‘सकाळ’ने ही संकल्पना मांडली होती. याचे जिल्हाभरातून स्वागत होत आहे.

सिंधुदुर्गात वैद्यकीय सुविधांचा वानवा आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावण्याचे प्रसंगही घडत आहेत. गंभीर आजारी रुग्णांना उपचारासाठी गोव्याच्या गोवा मेडिकल कॉलेजवर अवलंबून राहावे लागत आहे. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा पर्याय असल्याची संकल्पना ‘सकाळ’ने २८ डिसेंबर २०१७ ला मांडली होती.

या संकल्पनेचे अनेक सामाजिक कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरीक यांनी स्वागत केले. आजच्या (ता. १५) ‘सकाळ’मध्ये ही संकल्पना अधिक तपशीलांसह मांडण्यात आली. यासाठी जनमताचा रेटा तयार करण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

या सर्व पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी असणाऱ्या व्यक्ती एकत्र येऊ लागल्या आहेत. त्याचा पहिला टप्पा म्हणून आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीही स्थापन करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्गात आरोग्यविषयीचा प्रश्‍न अत्यंत गंभीर बनला आहे. गावोगाव आरोग्यकेंद्र याच्या जोडीला जिल्हा, उपजिल्हा, तालुका रुग्णालये उभी आहेत; मात्र यात पुरेसे तज्ज्ञ डॉक्‍टर नाहीत. यंत्रणा असली तरी ती चालवायला तंत्रज्ञ नाहीत. यातच माकडताप, लेप्टो आदी तापाच्या साथीने माणसे किड्या मुंग्यांसारखी मरत आहेत. ऋतुचक्रानुसार साथीचे आजार ठरलेलेच असल्याने त्यामुळे होणारे मृत्यू हा प्रश्‍न गंभीर असूनही शासन याकडे दुर्लक्ष करत आहे. महामार्गावर अपघातांचे प्रमाण जास्त आहे; मात्र वेळीच उपचार मिळत नसल्याने यातील अनेकांना प्राण गमवावे लागतात. जिल्ह्यात रिक्तपदांवर नियुक्‍त्या होत नाहीत. जाहिराती आल्यातरी या ठिकाणी यायला डॉक्‍टर तयार नसतात.

यात पुढे नमूद आहे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हा यावरचा उपाय आहे. यामुळे एकाच छत्राखाली वैद्यकीय उपचार, तज्ज्ञ उपलब्ध होणार आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पडवे येथे मेडिकल कॉलेज उभारण्याच्यादृष्टीने स्वागतार्ह पाऊल टाकले आहे. हे मेडिकल कॉलेज सुरु झाल्यावर जिल्हावासियांना दिलासा मिळणार आहे; मात्र जिल्ह्यातील भौगोलिक रचना, गोरगरीबांच्या उपचारासाठीची गरज याचा विचार करता या ठिकाणी आणखी शासकीय मेडिकल कॉलेज आवश्‍यक आहे. यामुळे ५०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय मिळणार आहे. यातून मार्ग काढण्याच्यादृष्टीने शासनाने प्रभावी पावले उचलावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी ॲड. शामराव सावंत, ॲड. नीता सावंत, ॲड. सुप्रिया केसरकर, नारायण परब, प्रवीण परब, लक्ष्मण नाईक, विजय पालकर, अभय किनळोसकर, अभिलाष देसाई, डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, अँड्रू फर्नांडीस, दीपक गावकर आदी उपस्थित होते.

एकत्र येण्याचे आवाहन
ही मागणी पूर्ण करण्यासाठी लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. जनमताचा रेटा निर्माण झाल्याशिवाय या ठिकाणी आरोग्य सुविधा सुधारणार नाहीत. त्यादृष्टीने विविध सामाजिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, विविध पक्षाचे पदाधिकारी, सर्वसामान्य नागरीक आदींनी एकत्र यावे आणि ही मागणी लावून धरावी अशी अपेक्षा या वेळी कृती समितीच्यावतीने व्यक्त करण्यात आली.

Web Title: sindhudurgnagari konkan news government medical college