कोकणात ‘अँग्री यंग मॅन’प्रमाणे एन्ट्री

कोकणात ‘अँग्री यंग मॅन’प्रमाणे एन्ट्री

सावंतवाडी - नारायण राणेंची कोकणात झालेली एन्ट्रीच ‘अँग्री यंग मॅन’सारखी होती. त्यावेळच्या टिपिकल राजकारणाला कंटाळलेल्या तरुणाईच्या मनातील आक्रोश व्यक्त करण्यासाठीचा मार्ग राणेंनी सिंधुदुर्गात दाखविला. त्यांचा हाच फॉर्म्युला राणेंना कोकणच्या राजकारणात हिट ठरविणारा ठरला.

अमिताभ बच्चन यांचे चित्रपट याच स्थितीतील क्रांती घडविणारे चित्र दाखविणारे होते. साहजिकच आपल्या मनातील उद्वेग व्यक्त करण्यासाठीचे व्यासपीठ म्हणून तरुणाई त्याकडे आकर्षित झाली. चित्रपट हिट झाले आणि बच्चन सुपरस्टार ठरले. त्यांची क्रेझ आजही कायम आहे. राणेंचा प्रवास काहीसा असाच म्हणावा लागेल.

मुंबईच्या राजकारणात अडकलेल्या शिवसेनेला राज्यस्तरावर जायचे होते. मुंबईतील शिवसेनेमध्ये बहुसंख्य कोकणातील चाकरमानी होते. बरेचसे नेते मूळ कोकणातलेच. पण, कोकणात मात्र शिवसेना रुजण्याचे नाव घेत नव्हती. अखेर बाळासाहेबांनी चाकरमान्यांना ‘गावाकडे चला’ असा आदेश दिला. यामुळे मुंबईच्या राजकारणात स्थिरावलेले चाकरमानी आपल्या गावाकडे भगवा फडकविण्यासाठी रवाना झाले. या मोहिमेचे नेतृत्व आपसुक राणेंच्या हाती आले.

राणेंचे वरवडे हे गाव कणकवली तालुक्‍यातील. १९९० च्या दरम्यान त्यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात प्रवेश केला. त्या काळात काँग्रेस आणि समाजवादी यांच्या छोट्या-छोट्या बालेकिल्ल्यांमध्ये कोकण विखुरलेले होते. व्हाईट कॉलर समाजातील, गावातील पिढ्यान्‌पिढ्या वजनदार असलेल्या ज्येष्ठांच्या हातात इथले राजकारण होते. नेता कायमच नेतृत्व करणारा तर कार्यकर्ता आयुष्यभर प्रचाराच्या मागे लागलेला असे इथल्या राजकारणाचे स्वरूप होते. प्रत्येक निवडणुकीत रसाळ भाषणे व्हायची. मात्र प्रश्‍न तिथेच राहायचे. राणेंनी इथल्या राजकारणाची नस ओळखली. संथ सुरू असलेल्या राजकारणात भगवी आक्रमकता निर्माण केली.

सिंधुदुर्ग किल्ल्यावर भगवा झेंडा उभारण्यासाठी झालेल्या आंदोलनाच्या रूपाने त्यांना या आक्रमकतेची सुरवात करण्याची संधी मिळाली. त्यांची शैली बघून काँग्रेस, समाजवादी घराण्यामधील तरुण राणेंकडे आकर्षित होऊ लागले. त्यांनी प्रस्थापितांपेक्षा प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या तरुणांना जास्त संधी द्यायला सुरवात केली. या तरुणांसाठी राणे म्हणजे अंतिम नेतृत्व बनले. जसे बाळासाहेबांसाठी राणे होते, तसे राणेंना मानणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांची फौज सिंधुदुर्गाच्या गावागावात निर्माण होऊ लागली. ज्येष्ठांकडून तरुणाईकडे राजकारण सरकू लागले. याबरोबरच समाजवादी आणि काँग्रेसचे बालेकिल्ले ढासळू लागले.

१९९१ च्या दरम्यान काँग्रेसचे पदाधिकारी श्रीधर नाईक यांची हत्या झाली. यात राणेंचे नावही आले. खरेतर शांत कोकणमध्ये राजकीय हत्येचा हा गाजलेला पहिलाच प्रकार. त्या काळात राज्यभरातील प्रसारमाध्यमांनी हा विषय लावून धरला. मात्र, सिंधुदुर्गवासीयांनी यानंतरच्या काळात राणेंना आणखी ताकद दिली. सिंधुदुर्गातील या ताकदीच्या बळावर राणेंनी मुंबईच्या आणि राज्याच्या राजकारणात आपले वजन वाढविले. शिवसेनेत असेपर्यंत त्यांची ताकद वाढतच राहिली.

कोकणचे साम्राज्य हातात...
राणेंनी सिंधुदुर्गाच्या राजकारणात प्रवेश केला. ते या भागातील पहिले आमदार बनले. त्यांच्या बरोबर आणि पाठोपाठ शंकर कांबळी, गणपत कदम, रामदास कदम, रवींद्र माने, शिवराम दळवी अशा किती तरी चाकरमान्यांनी आपले वजन निर्माण केले. मात्र, त्या सगळ्याचे नेतृत्व कायमच राणेंकडे राहिले. अगदी शिवसेना प्रमुखही कोकणबाबत कोणताही निर्णय घ्यायचा असल्यास राणेंमार्फतच घेत असत. यामुळे कोकणातील शिवसेनेची सूत्रे अप्रत्यक्षरित्या राणेंच्याच हातात राहिली. यामुळे शिवसेना सोडताना राणेंना सिंधुदुर्गातील जवळपास अख्खी संघटना सोबत नेणे शक्‍य झाले. त्या काळात शिवसेनेला अक्षरशः कार्यकर्ते शोधण्याची वेळ आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com