कोकणसाठी स्वतंत्र विद्यापीठ हवे - महेंद्र नाटेकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

सिंधुदुर्गनगरी - कोकणी माणूस बुद्धिवान आणि प्रतिभाशाली असतानाही केवळ पुरेशी शैक्षणिक सुविधा न मिळाल्याने कोकणची पीछेहाट होत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यांसाठी स्वतंत्र कोकण विद्यापीठ व्हावे, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे, अशी माहिती स्वतंत्र कोकण संघटनेचे अध्यक्ष प्रा. महेंद्र नाटेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

सिंधुदुर्गनगरी - कोकणी माणूस बुद्धिवान आणि प्रतिभाशाली असतानाही केवळ पुरेशी शैक्षणिक सुविधा न मिळाल्याने कोकणची पीछेहाट होत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यांसाठी स्वतंत्र कोकण विद्यापीठ व्हावे, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे, अशी माहिती स्वतंत्र कोकण संघटनेचे अध्यक्ष प्रा. महेंद्र नाटेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

स्वतंत्र कोकण विद्यापीठाच्या मागणीबाबत आज येथील पत्रकार कक्षात प्रा. नाटेकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रा. कृष्णा दळवी, प्रा. गजानन परूलेकर, प्रा. शांताराम राणे, प्रा. श्रीपाद परब आदी उपस्थित होते. या वेळी प्रा. नाटेकर म्हणाले, ‘‘कोकणात स्वतंत्र विद्यापीठ नसल्याने येथील विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठावर अवलंबून राहावे लागते; मात्र या विद्यापीठात संपूर्ण देशातून विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यामुळे हे विद्यापीठ भारतीय विद्यापीठ झाले आहे.

या विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अनेक पटीने वाढली आहे. त्यामुळे या विद्यापीठाचे प्रशासन कोलमडू लागले आहे. शिवाय आता या विद्यापीठाच्या कारभारात सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. मुलांचे निकाल अद्याप प्रलंबित आहेत. या गोंधळी कारभारामुळे  सर्वाधिक नुकसान कोकणी विद्यार्थ्यांचे होत आहे. मुंबई विद्यापीठात देशभरातील विद्यार्थी येत असल्याने त्या ठिकाणी कोकणातील गरीब होतकरु आणि बुद्धिवान विद्यार्थी स्पर्धेत टिकत नाहित. विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रात अनेक विद्यापीठ आहेत. एकट्या सोलापूर जिल्ह्यासाठी एक विद्यापीठ आहे. त्यामुळे बुद्धिमत्ता असलेल्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या कोकणच्या जिल्ह्यांसाठी स्वतंत्र कोकण विद्यापीठ होणे आवश्‍यक आहे.’’

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कोकणात वनस्पती, वनौषधी, खनिजे आणि जैवविविधता आहे. त्यामुळे येथे संशोधनाला भरपूर वाव आहे. मात्र मुंबई विद्यापीठाने अद्याप त्या दृष्टीने कोणतीही पावले उचलली नाहित. मुंबई विद्यापीठाच्या कारभारातील गोंधळ पाहता त्यात सुधारणा झाली तरी कोकणच्या बहुसंख्य समस्या कायम राहणार आहेत. त्यामुळे कोकणचा विचार पाहता सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांसाठी रत्नागिरी या मध्यवर्ती ठिकाणी स्वतंत्र कोकण विद्यापीठ व्हावे अशी मागणी स्वतंत्र कोकण संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रा. नाटेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मागणी मान्य न झाल्यास सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

विद्यापीठ झाले तर...
जगातील पहिल्या दोनशे विद्यापीठांच्या गणनेत भारतातील एकाही विद्यापीठाची गणना होत नाही ही शरमेची बाब आहे; मात्र दहावी आणि बारावीचा स्वतंत्र कोकण बोर्ड निर्माण झाल्यापासून हा बोर्ड राज्यात आघाडीवर आहे. त्याचप्रमाणे स्वतंत्र कोकण विद्यापीठ मंजूर झाल्यास हे विद्यापीठ जगातील दोनशे विद्यापीठांच्या गणनेत आघाडीवर राहील, असा विश्वास प्रा. नाटेकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

Web Title: sindudurg news Konkan needs an independent university