ग्रीन रिफायनरी विरुद्ध नारायण राणे मैदानात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

मालवण - ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका ही दुटप्पी आहे. शिवसेनेचेच उद्योगमंत्री असताना ते या प्रकल्पाला का परवानगी देत आहेत. त्यामुळे याबाबत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाणार येथे जाहीर सभा घेत या प्रकल्पाबाबत जनतेची फसवणूक करणाऱ्या शिवसेनेचा खरा चेहरा उघड करणार असल्याचे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी रात्री येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

मालवण - ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका ही दुटप्पी आहे. शिवसेनेचेच उद्योगमंत्री असताना ते या प्रकल्पाला का परवानगी देत आहेत. त्यामुळे याबाबत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाणार येथे जाहीर सभा घेत या प्रकल्पाबाबत जनतेची फसवणूक करणाऱ्या शिवसेनेचा खरा चेहरा उघड करणार असल्याचे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी रात्री येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

येथील नीलरत्न निवासस्थानी पत्रकारांशी श्री. राणे यांनी संवाद साधला. या वेळी तालुकाध्यक्ष मंदार केणी, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळू कोळंबकर, दीपक पाटकर, मोहन वराडकर, शर्वरी पाटकर, ममता वराडकर, यतीन खोत, अभय कदम, दिलीप वायंगणकर, जाबीर खान, राजू बिडये, भाई मांजरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. 
श्री. राणे म्हणाले, ‘‘रिफायनरी प्रकल्पात शिवसेनेची भूमिका दलालाची आहे. तेथील जमिनी शिवसेना नेत्यांनीच एजंट बनून विकल्या आणि आता तेथील कामे मिळविण्यासाठी त्यांचा विरोध सुरू आहे. 

सुरुवातीस एन्‍रॉन त्यानंतर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि ग्रीन रिफायनरी प्रकल्प. एकीकडे विरोध करायचा आणि दुसरीकडे कामे मिळवायची हा शिवसेनेचा धंदा आहे, अशी टीका त्यांनी केली. रिफायनरी प्रकल्प विरोधकांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहणार आहे. यासाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाणारचा दौरा करून शिवसेनेचा खरा चेहरा जनतेसमोर आणणार आहे.’’

ते म्हणाले, ‘‘उद्धव ठाकरे आंगणेवाडीच्या यात्रोत्सवासाठी येत असताना त्यांनी कोकणासाठी शिवसेनेने दिलेले योगदानही यानिमित्ताने सिंधुदुर्गवासीयांसमोर जाहीर करावे. मराठी माणसासाठी शिवसेना सांगणाऱ्यांनी मराठी माणसांना किती नोकऱ्या दिल्या, किती बेरोजगारांना आधार दिला, हेही स्पष्ट करावे. केंद्रीय मंत्री असलेल्या अनंत गीते यांचे केंद्रात आणि राज्यात काय योगदान आहे? ते केंद्रीय मंत्री असल्याचे कोणालाही माहीत नसल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेने फक्‍त भाजपच्या मंत्रिमंडळात सहभागी असलेल्या आपल्या मंत्र्यांची बेकारी घालविली आहे.’’

कुडाळ येथील आपल्या पत्रकार परिषदेतील टीकेनंतर पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजनची बैठक घेण्याची आठवण झाली. पालकमंत्री विकासकामांसाठी कोट्यवधी रुपये आणले, असे सांगत आहेत त्यामुळे या निधीची आकडेवारी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जाहीर करण्यास सांगावी. नुसती आकडेवारी सादर करून निधी उपलब्ध होत नसतो. नियोजनच्या बैठकीत महाराष्ट्र स्वाभिमानचे सदस्य आकडेवारीचा फुगा फोडतील, असा इशारा श्री. राणे यांनी दिला.

विविध महोत्सव घेणार
येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महोत्सव घेण्यास सत्ताधारी अपयशी ठरल्याचे गेल्या तीन वर्षांत दिसून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा सिंधू महोत्सव, बाल, कला, क्रीडा तसेच नाट्य महोत्सव यासारखे उपक्रम घेतले जाणार आहेत. एप्रिल, मे महिन्यांत हे महोत्सव घेतले जातील. त्याची रूपरेषा मधल्या काळात जाहीर केली जाईल. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍याला यात सहभागी करून घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Sindudurg News Narayan Rane against Green Refinery