निर्यात, पर्यटन वृध्दीसाठी आराखडा तयार करा - सुधांशू पांडे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून तसेच निर्यात व पर्यटन वृद्धीसाठी एक सर्वसमावेशक आराखडा केंद्र शासनाकडे पाठवावा, अशी सूचना केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागाचे सह सचिव सुधांशू पांडे यांनी येथे आयोजिक बैठकीत केली.

सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुंदर सागर किनारे आहेत. नैसर्गिक साधन संपत्तीची विपुलता आहे. फळांचा राजा हापूस आंबा तसेच येथील काजूला जगभरातून मागणी आहे. या पार्श्‍वभूमीवर कृषी व पर्यटन विभागाने आपले प्रस्ताव तयार करावेत. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून तसेच निर्यात व पर्यटन वृद्धीसाठी एक सर्वसमावेशक आराखडा केंद्र शासनाकडे पाठवावा, अशी सूचना केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागाचे सह सचिव सुधांशू पांडे यांनी येथे आयोजिक बैठकीत केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन सभागृहात आयोजित या बैठकीस केंद्र शासनाच्या उद्योग विभागाचे सह सचिव अनिल अगरवाल, राजीव अगरवाल, केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांचे स्वीय सहाय्यक विनय पिंगळे, खासगी सचिव अमित भोळे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, अधिक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव शेळके, उद्योग व्यवस्थापक संतोष कोलते, कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. मंदार गिते, तसेच जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

केंद्राच्या वाणिज्य विभागाच्या विविध योजना आहेत. शेतमालाच्या निर्यातीसाठी याचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रस्ताव पाठवावा, सेंद्रीय शेतीसाठी उपयुक्त तसेच फळातील रासायनिक अंशाचे प्रमाण शोधण्यासाठी जिल्ह्यात एक अद्ययावत प्रयोगशाळा उभारता येईल. याबाबतही सविस्तर प्रस्ताव पाठवावा.

- सुधांशू पांडे 

जी. आय. मानांकनासाठीही प्रस्ताव पाठविण्याची सूचना उद्योग विभागानचे सह सचिव राजीव अगरवाल यांनी या बैठकीत केली. प्रारंभी जिल्हाधिकारी चौधरी यांनी पर्यटन, कृषी अंतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

Web Title: Sindudurg News Sudhanshu Pande press