शुकनदीचे पात्र कोरडे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

वैभववाडी - शुकनदीचे पात्र बहुसंख्य गावात कोरडे पडले आहे. काही ठिकाणी डोहात उरलेले पाणीही खालावत आहे. यामुळे या नदीच्या पाण्यावर अवलंबुन असलेली शेकडो एकर ऊसशेती संकटात आली आहे. त्यामुळे खांबलवाडी धरणाचे पाणी तातडीने शुकनदीच्या पात्रात सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांतुन होवु लागली आहे. 

वैभववाडी - शुकनदीचे पात्र बहुसंख्य गावात कोरडे पडले आहे. काही ठिकाणी डोहात उरलेले पाणीही खालावत आहे. यामुळे या नदीच्या पाण्यावर अवलंबुन असलेली शेकडो एकर ऊसशेती संकटात आली आहे. त्यामुळे खांबलवाडी धरणाचे पाणी तातडीने शुकनदीच्या पात्रात सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांतुन होवु लागली आहे. 

तालुक्‍यातील बारा गावांसाठी जलवाहिनी ठरलेल्या शुकनदीचे पात्र बहुसंख्य ठिकाणी पुर्णपणे आटले आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासुन पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. शुकनदी पात्रातील मोठा पाणीसाठा असलेल्या कोंडीदेखील आटत चालल्या आहेत. त्यामुळे या नदीवर अवलंबुन असलेली शेकडो एकर ऊसशेती संकटात येण्याची शक्‍यता आहे.

सांगुळवाडी, वाभवे, एडगाव, सोनाळी, कुसुर, नापणे, उंबर्डे कातकरवाडी, तिथवली या गावातील ऊसशेतीकरीता शुकनदीच्या पाण्याचा वापर केला जातो; परंतु या नदीचे पाणी आटल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पुढील आठ ते दहा दिवसात शुकनदीचे पात्र पुर्णपणे कोरडे पडण्याची शक्‍यता आहे. 

शेतकऱ्यांनी ऊसशेतीचे नुकसान टाळण्यासाठी आतापासुनच खांबलवाडी धरणाचे पाणी शुकनदीला सोडावे, अशी मागणी करण्यास सुरूवात केली आहे. या धरणाचे पाणी सोडल्यामुळे गेल्यावर्षी धोक्‍यात आलेली पाच ते सहा गावातील ऊसशेती वाचण्यास मदत झाली होती. त्यामुळे तत्काळ पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधुन जोर धरू लागली आहे. 

धोक्‍यात आलेले 
ऊसाचे क्षेत्र 
तिथवली- 65 
नापणे- 50 
कुसुर- 30 
सोनाळी- 25 
उंबर्डे- 15 
एडगाव- 3 
वाभवे- 4 
सांगुळवाडी -15 
(आकडेवारी हेक्‍टरमध्ये) 

खांबलवाडी धरणाचे पाणी बुधवारपासून (ता.2) शुकनदीत सोडण्यात येणार आहे. आठवड्यातुन एकदा हे पाणी सोडले जाणार आहे. शेतीचे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने त्यामध्ये आवश्‍यकतेनुसार वाढही करण्यात येईल. 
- एस. बी. आरडे,
शाखा अभियंता, लघु पाटबंधारे विभाग 

भीषण पाणीटंचाईचे संकेत 
शुकनदीच्या पात्रातील पाणी कमी झाले की नदीपात्रालगतच्या अनेक गावातील विहिरीच्या पाण्याची पातळी कमी होवु लागते. त्यामुळे शुकनदीचे पात्रातील पाणी कमी होणे किंवा कोरडे पडणे हे भीषण पाणीटंचाईचे संकेत मानले जाते. त्यामुळे पुढील महिन्यात काही गावांना पाणीटंचाईची झळ बसण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: Sindudurg News Suk River water scarcity