सर स्टीफनवर वीर सावरकरांनी केली होती मात

सर स्टीफनवर वीर सावरकरांनी केली होती मात

रत्नागिरी - मुंबई गव्हर्नर सर लेस्ली स्टीफन रत्नागिरीत आला होता तेव्हा सावरकरांच्या पोहण्याची परीक्षा घेण्याची हुक्की त्याला आली. त्यांनी त्यांच्यासोबत पोहोण्याची स्पर्धा करावी, असे सुचवले. किल्ले रत्नदुर्गाजवळ ही स्पर्धा झाली. त्या वेळी सावरकरांनी ‘तुम्ही समुद्रात पुढे गेल्यावर खूण करा, त्यानंतर मी उडी मारतो’ असे सांगितले व पंधरा मिनिटांतच स्टीफनला गाठले.

दिल्ली विद्यापीठातील डॉ. प्रा. हरींद्र श्रीवास्तव यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये याचे व रत्नागिरीतील वास्तव्याचे अनेक संदर्भ दिले आहेत, अशी माहिती बाबासाहेब परुळेकर यांनी ‘सकाळ’ला दिली.

मुस्लिम कैद्यांच्या तक्रारीवरून कलेक्‍टर एम. के. शेख यांनी अहवाल पाठवला आणि मुंबई गव्हर्नर सर लेस्ली स्टीफन १९३० मध्ये चौकशीला आले. मार्सेलिस येथील ऐतिहासिक उडी घेऊन पोहणाऱ्या वीर सावरकरांच्या पोहोण्याच्या कौशल्याची स्टीफनला माहिती होती म्हणूनच त्याने शर्यत लावली. स्टीफन यांच्या डायरीत या प्रसंगाची नोंद आहे. १९३७ मध्ये सावरकरांच्या मुक्ततेसाठी स्टीफन व लॉर्ड ब्रेबॉर्न यांनी योगदान दिले होते.

डॉ. श्रीवास्तव यांनी वीर सावरकरांच्या कार्यावर प्रबंध लिहून दिल्ली व नागपूर विद्यापीठातून पीएचडी मिळवली. ते १९८५ मध्ये रत्नागिरीत आले होते आणि पतितपावन मंदिरातर्फे त्यांचा सत्कारही केला होता, अशी आठवण मंदिर संस्थेचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब परुळेकर यांनी ‘सकाळ’ला सांगितली.

सूर्य-सागराचे आकर्षण

रत्नागिरीत स्थानबद्ध असताना ते नेहमी पांढऱ्या समुद्रावर जाऊन सूर्यास्त पाहायचे. सूर्य, सागराकडे एकटक पाहत, भान हरपून जात. किती वेळ मी इथे आहे?  मला वाटतं मी इथे कित्येक वर्षे बसलो आहे, असे सावरकर म्हणत. सुधाकरशेठ मलुष्टे यांच्याकडची तळणीतली लाल जिलेबी उगवत्या सूर्याची रक्तवर्ण आभा जणू काही जिलेबीच्या परातीत परावर्तित झाली आहे, असेही ते म्हणायचे.

अंदमानात आंघोळीसाठी अर्धी घागर पाणी
अंदमानात बंदिवान असताना सावरकरांना आंघोळीसाठी अर्धी घागर मिळायची; पण शिरगावात विष्णुपंत दामले मास्तरांच्या घरच्या वास्तव्यात रहाटावरून काढलेल्या दहा-बारा घागऱ्या डोक्‍यावर घेऊन आंघोळ करत, अशीही आठवण परुळेकर यांनी सांगितली.

सावरकरांचे भाष्य
‘‘मी समुद्रपुत्र आहे. लाटांच्या उदरातून जन्मलो, आज मला जोजवणाऱ्या या पाळण्याकडे तेव्हापासून तर पाहत आलेलो नाही ना? रंगांची उधळण करत समुद्रात अस्तंगत होणारा सूर्यही असाच समुद्रपुत्र असावा. त्यामुळेच सायंकाळची ही सूर्य-समुद्र भेट नेहमीच आकर्षित करत आली आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com