सहा गावांतून भात, 29 गांवातून नागली हद्दपार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

दृष्टीक्षेपात राजापूर 

एकूण महसूली गावे - 237 
भातपिके असलेली गावे - 231 
नागरी पिके असलेली गावे - 208 

भातशेती करीत नसलेली राजापूरात गावे 
जांभारी, जैतापूर-बाजारवाडी, कातळी, दळे-तुळसुंदेवाडी, कुवेशी-तुळसुंदेवाडी, जुवै जैतापूर

राजापूर  - तालुक्‍यात भातशेतीसह नागली पिकाची सरासरी पैसेवारी 75 पैसे एवढी समाधानकारक राहिली आहे. गेल्या तीन वर्षामध्ये खरीप हंगामात भातशेतीची पैसेवारी चांगली आहे. मात्र तालुक्‍यातील सहा गावांतून भातशेती तर 29 गावांतून नाचणी हद्दपार झाल्याचे खेदजनक चित्र पुढे आले आहे. 

गावामध्ये उत्पादित केलेल्या पिकासह त्या गावची उत्पादकता स्पष्ट करण्यासाठी दरवर्षी महसूल विभागातर्फे पिकांची पैसेवारी निश्‍चित केली जाते. गावच्या पिकाच्या उत्पादकतेची पैसेवारी निश्‍चित करताना त्याचवेळी गावची आणि त्या अनुशषंगाने तालुक्‍याची उत्पादकता निश्‍चित करणारी तालुक्‍याची पैसेवारी निश्‍चित होते. गेल्या तीन वर्षामध्ये केलेल्या पैसैवारी निश्‍चितीमध्ये तालुक्‍याची पैसेवारी 75 पैसै अशी समाधानकारक आहे. 

तालुक्‍यातील लोकांचे उत्पन्नाचे महत्त्वाचे आणि शाश्‍वत साधन भातशेतीच आहे. 237 महसूली गावांपैकी सहा गावांमध्ये भातशेती सोडून देण्यात आली आहे. भातशेतीबाबत हळूहळू उदासिनता वाढत असताना नाचणीसारख्या नागली पिकाबाबतही फारशी वेगळी स्थिती नाही. तालुक्‍यातील 208 गावांमध्ये शेतकऱ्यांकडून नागली पिक घेतले जाते. मात्र 29 गावांमध्ये नागलीही हद्दपार झाली आहे. नव्या पिढीने शेतीकडे उत्पन्नाचे साधन म्हणून पाहण्यास सुरवात केली आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती केल्यास त्याद्वारे उत्पादनासह उत्पन्नाचा टक्का वाढविणे शक्‍य आहे, असे तालुक्‍यातील काही ठिकाणी यशही प्राप्त झाले आहे. मात्र शेती करायची असा नव्या पिढीचा दृष्टीकोन तयार होणार कसा, हा खरा प्रश्‍न आहे. त्यामुळे दिवसेंदिवस भातशेती कमी होत चालली आहे.

Web Title: Six cities of rice, 29 cross-country village

टॅग्स