नगरमधील सहा जणांच्या टोळीला अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

चिपळूण - नगर जिल्ह्यातील सहा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने खेड येथे चारचाकी गाडींसह अटक केली. दापोली, खेड, चिपळूण येथे चोऱ्या केल्याची कबुली या टोळीने दिली आहे.

चिपळूण - नगर जिल्ह्यातील सहा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने खेड येथे चारचाकी गाडींसह अटक केली. दापोली, खेड, चिपळूण येथे चोऱ्या केल्याची कबुली या टोळीने दिली आहे.

सोमनाथ ज्ञानदेव गायकवाड (वय ३८), ज्ञानदेव प्रभाकर बडे (३८), गणेश ऊर्फ संदीप दिनकर झिंझुळे (२६), आजीनाथ भगवान पवार (३२), नागेश वारकू पवार (२६), जगन्नाथ मुरलीधर वाघ (५०, सर्व रा. ता. पाथर्डी, अहमदनगर) अशी त्यांची नावे आहेत.

सहा महिन्यांत रत्नागिरी जिल्ह्यात घडलेल्या चोऱ्यांप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून चोरांचा शोध सुरू होता. पोलिस निरीक्षक शिरीष सासने, उपनिरीक्षक सागर पवार व त्यांच्या पथकाने दापोली, खेड व चिपळूण, देवरूख पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये घडलेल्या सर्व गुन्ह्यांचा आढावा घेतला. उपलब्ध माहितीच्या आधारे संशयितांची रेखाचित्रे तयार करण्यात आली. ते वेळोवेळी रत्नागिरी, रायगड, नाशिक, सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर या ठिकाणी वावरत असल्याचे समोर आले. 

त्यांना पकडण्यासासाठी सापळा रचण्यात आला. चार दिवस त्यांची शोधमोहीम सुरू होती. शनिवारी (ता. ८) काही संशयित खेड परिसरात फिरत असल्याचे समजले. त्यावरून खेड परिसरातील बस स्थानक, रेल्वेस्थानक, भरणे नाका या ठिकाणी पोलिसांनी शोध घेतला असता भरणे नाका या ठिकाणी मोटार (एमएच-१६-एटी-५११७) ही संशयास्पदरित्या फिरताना आढळून आली. पथकातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी त्या गाडीला थांबवून गाडीतील व्यक्तींची पडताळणी केली असता दापोली बस स्थानक परिसरातील प्राप्त झालेले सीसीटीव्ही फुटेजमधील संशयित आणि वाहनातील संशयित यांच्यात साम्य आढळून आले. या सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी दापोली, खेड व चिपळूण बसस्थानक या ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यामुळे शनिवारी चार वाजता त्यांना अटक करण्यात आली.

 

Web Title: Six people arrested in Ratnagiri