रत्नागिरी जिल्ह्यातील सहा गावे होणार कॅशलेस

राजेश कळंबटे
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

रत्नागिरी - ग्रामीण भागात बॅंकिंगचे जाळे पसरविण्याबरोबर कॅशलेस व्यवहार वाढीसाठी भारतीय डाक विभागाकडून (पोस्ट) जिल्ह्यातील 11 गावातील प्रत्येक कुटुंब इंडियन पोस्ट पेमेंट्‌स बॅंकेचे (आयपीपीबी) खातेदार झाले आहेत. त्यापैकी 6 गावांमध्ये कॅशलेस व्यवहाराला सुरवात झाली आहे.

रत्नागिरी - ग्रामीण भागात बॅंकिंगचे जाळे पसरविण्याबरोबर कॅशलेस व्यवहार वाढीसाठी भारतीय डाक विभागाकडून (पोस्ट) जिल्ह्यातील 11 गावातील प्रत्येक कुटुंब इंडियन पोस्ट पेमेंट्‌स बॅंकेचे (आयपीपीबी) खातेदार झाले आहेत. त्यापैकी 6 गावांमध्ये कॅशलेस व्यवहाराला सुरवात झाली आहे.

गावांमध्ये असा चालतो व्यवहार

देशातील जास्तीत जास्त गावांमधील व्यवहार डिजिटल करण्यासाठी केंद्र सरकारने सक्षम ग्राम योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत ग्रामस्थांसह तेथील व्यवसायिकांचे आयपीपीबीचे खाते उघडले जाते. यामध्ये दुकानदारांना ऍप दिले जाते. त्यासाठी क्‍युआर कार्ड दिले जाते. बचत खाते असलेल्या ग्रामस्थांनाही क्‍युआर कार्ड देण्यात येते. या कार्डला आर्थिक व्यवहारांमध्ये सुरक्षितता राहण्यासाठी ओटीपी क्रमांक दिला जातो.

असे आहेत डिजिटल होण्याचे फायदे 

गावांमधील सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने केले जातात. ग्रामस्थांना शहरामध्ये आर्थिक व्यवहार करण्यासाठी जावे लागत नाही. त्यामुळे वेळेत बचत होण्याबरोबर जाण्या-येण्याच्या खर्चातही बचत होते. सर्व अनुदाने, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्या, या खात्यावर वर्ग करण्याचे नियोजन असून वीजबिले, विमा अशा सर्व सुविधा या खात्यातून भरणे शक्‍य होणार आहे. येथील ग्रामस्थांचा विश्वास व डाक विभागाचे सहकार्य यातून काही महिन्यांमध्ये गावातील सर्व व्यवहार डिजिटल करणे शक्‍य होत आहे.

या योजनेंतर्गत रत्नागिरीतील 11 गावांनी सहभाग नोंदविला आहे. यापैकी 6 गावांमधील 1465 कुटुंबांची 2713 इंडियन पोस्ट पेमेंट्‌स बॅंकेमध्ये खाती आहेत. यामध्ये तुळसणी गावातील 500 कुटुंबीयांची 818 खाती, कर्धेमधील 350 जणांचे 667, आरेमधील 150 कुटुंबीयांची 367, वेरवली खुर्दे 135 कुटुंबांची 339, म्हामुरवाडी मजगाव 160 कुटुंबांची 310 खाती, तेरे 170 कुटुंबांची 212 खाती आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six villages will be cashless in Ratnagiri district