परिचारिकांना स्मार्ट कार्ड बंधनकारक 

तुषार सावंत - सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 21 डिसेंबर 2016

कणकवली - रुग्णांना चांगली आणि विश्‍वासार्ह सेवा मिळावी तसेच परिचारिकांना कायदेशीर संरक्षण मिळावे, म्हणून परिचारिकांना स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या संकेतस्थळावर 31 मार्च 2017 पूर्वी ही नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. 

कणकवली - रुग्णांना चांगली आणि विश्‍वासार्ह सेवा मिळावी तसेच परिचारिकांना कायदेशीर संरक्षण मिळावे, म्हणून परिचारिकांना स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या संकेतस्थळावर 31 मार्च 2017 पूर्वी ही नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. 

राज्यातील खासगी रुग्णालय आस्थापनात परिचारिकेचा युनिफॉर्म परिधान करून नर्स म्हणून दर्शवत काही ठिकाणी रुग्णांचे आरोग्य धोक्‍यात आणले गेले. त्यामुळे राज्यस्तरातील आस्थापनांना प्रशिक्षित व नोंदणीकृत परिचारिकांकडून रुग्णसेवा तीही सुरक्षित मिळावी यासाठी महाराष्ट्र परिचार्या परिषदेने जनजागृती मोहीम राबविली. या अनुषंगाने या सर्व परिचारिकांना जुन्या प्रमाणपत्रासोबतच स्मार्ट कार्ड वितरित करण्यात येणार आहे. सुरक्षित रुग्णसेवा आणि परिचारिकांना सक्षम करणे, कायदेशीर सुरक्षितता देणे यासाठी परिचारिका कायद्यात सुधारणाही करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून परिचारिका शिक्षण व सेवा स्मार्ट करण्यात आली आहे. परिचारिकांना प्रशिक्षित करून त्यांना नोंदणीकृत करण्यासाठी स्मार्ट कार्ड हे ओळखपत्र म्हणून वितरित केले जात आहे. यासाठी प्रत्येक परिचारिकेला कौन्सिलच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. अशी नोंदणी न करता परिचारिका व्यवसाय केल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो. 

महा-ई-सेवा केंद्रावर नोंदणी 
दरम्यान ही नोंदणी महा-ई-सेवा केंद्रावरही केवळ 20 रुपये फी आकारून नोंदविली जात आहे. या नोंदणीनंतर परिचारिकेला स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया डिजिटल असून कॅशलेसही आहे. स्मार्ट कार्ड प्राप्त झाल्यानंतर परिचारिका व्यवसाय अधिकृत आणि कायदेशीर सुरक्षित मानला जाणार आहे. संकेतस्थळावर नोंदणी करताना स्वतःचा युजर आयडी आणि पासवर्ड सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक परिचारिकेची राहणार आहे. परिचारिका व्यवसाय करताना स्मार्ट कार्ड सोबत बाळगणे बंधनकारक असून रुग्णाने मागणी केल्यास हे स्मार्ट कार्ड रुग्णाला दाखविणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

Web Title: Smart card binding nurses