चिपळुणात पाण्याचा वापरही ‘स्मार्ट’ होणार

चिपळुणात पाण्याचा वापरही ‘स्मार्ट’ होणार

पालिकेचे प्रयत्न - पाणी मुरते कोठे तेही शोधणार; नगराध्यक्षांनी घातले लक्ष

चिपळूण - पाणीगळती आणि पाणीचोरी थांबविण्यासाठी स्मार्ट मीटर बसविण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. तत्पूर्वी, पाणी योजनेतील गळती काढून शहरातील नागरिकांना मुबलक पाणी पुरवण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. नळ-पाणी योजनेचे पाणी नक्की कुठे मुरते, याकडे नगराध्यक्षांनी विशेष लक्ष दिले आहे. 

चिपळूण शहरात घरगुती आणि व्यावसायिक मिळवून ७ हजार २०० ग्राहक आहेत. या ग्राहकांच्या नळांना मीटर बसविण्यासाठी पालिकेने निधीची तरतूद केली आहे. पालिका मीटर बसविताना प्रत्येक ग्राहकाच्या नळाला बसविणार की इमारतीला बसविणार याची उत्सुकता नागरिकांना आहे. नळांना स्मार्ट मीटर बसविल्यानंतर पाणी चोरी उघडकीस येण्यास मदत होणार असून पालिकेचे उत्पन्न वाढण्यासही मदत होणार आहे. जितके पाणी तितके बिल आल्यामुळे नागरिकांमध्ये गरजेनुसार पाणी घेण्याची मानसिकता निर्माण होईल; मात्र पाण्याचा अधिक वापर करणाऱ्यांना चाप बसणार आहे. पिण्याच्या पाण्याने वाहन धुणे, घराच्या भिंती धुणे, सडा मारणे असे प्रकार बंद होणार आहेत.

पाणी म्हणजे मालमत्ता असून ती उधळण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे, या गैरसमजामुळे पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होतो. कोयनेचे पाणी वाशिष्ठीला मिळत असल्यामुळे चिपळुणात पाण्याची भरपूर उधळपट्टी होते; मात्र उन्हाळ्यात कोयनेच्या पाण्यावरही मर्यादा आल्यामुळे शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. वेगवेगळ्या भागातील महिला पालिकेत पाण्याविषयी तक्रारी घेऊन येत आहेत. बाजारपेठेत जलवाहिनी फुटल्याची तक्रार आल्यानंतर नगराध्यक्षांनी तातडीने तक्रारीच दखल घेऊन जलवाहिनी दुरुस्त करून घेतली. पुरेसे पाणी मिळवण्यासाठी अनेक नागरिकांनी घरातील नळांनाच छोटे पंप बसवले आहेत. काहीजण पिण्याच्या पाण्यावर बगीचा फुलवतात. वॉटर मीटर बसल्यानंतर या गैरप्रकाराला आळा बसणार आहे. 

कमी दाबाच्या प्रश्‍नावर लवकरच तोडगा
शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी पाजण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहे. या कामात येणारे अडथळे मोठे आहेत. काही मनोवृत्तीचे तर काही नैसर्गिक आहेत. मुरणाऱ्या पाण्याचा शोध घेण्यास आम्ही सुरवात केली आहे. नागरिकांची तक्रार आल्यानंतर खातेप्रमुखांना तातडीने तक्रारीची दखल घेण्याची सूचना केली. पाणी व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी संयुक्तपणे गळती शोधतात. कमी दाबाने मिळणाऱ्या पाण्यावर लवकरच मार्ग काढला जाईल, अशी माहिती नगराध्यक्ष सौ. सुरेखा खेराडे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com